श्रीरामपूर / प्रतिनिधी:
कोपरगांव - नाटक आणि नाट्यकलावंत हे समाजप्रबोधन करणारे एक प्रभावी माध्यम असून कोपरगांव येथील नाट्यलेखक शंकरराव जोर्वेकर यांनी कलासागर व कलारंजन नाट्य संस्थेचा आयोजित केलेला स्नेहमेळावा शिस्तबद्ध झाला असून नाटक आणि अशा नाट्यसंस्था ह्या नवोदित कलावंतांना प्रेरणादायी असल्याचे मत सौ. अरुणाताई शिवाजीराव बारगळ यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगांव येथे नाट्य कलावंतांचा मेळावा, सत्कार सोहळा संपन्न झाला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अरुणाताई बारगळ बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव बारगळ, सेवाभावी व्यक्तिमत्त्व काकासाहेब कोयटे, नाटककार डॉ. तिरमुखे, डॉ. गद्दे , डॉ. मयूर जोर्वेकर आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती. दीपप्रज्वलन आणि नटराज प्रतिमा पूजन झाल्यावर संयोजक शंकरराव जोर्वेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक , पाहुण्याचा परिचय करून व सर्वांचा पुष्पहार, गुलाब गुच्छे, शाल देऊन सत्कार केले. पतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कोयटे,ज्येष्ठ कलावंत भाऊसाहेब पोटभरे, सुखदेव सुकळे,, प्रा. शिवाजीराव बारगळ, आदीसह नाट्य कलावंत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शंकरराव जोर्वेकर यांनी नाटकातील संवाद सादर करून सर्वांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. मयूर जोर्वेकर, सौ. गौरी जोर्वेकर आदिंनी केले. याप्रसंगी नाट्य कलावंतांना गौरव चिन्हे देऊन सन्मानीत करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नाटककार शंकरराव जोर्वेकर हे कोपरगांव आणि जिल्ह्यातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेत प्रामाणिक शैक्षाणिक कार्य करून अनेक विद्यार्थी घडविले. कलासागर, कलारंजन नाटय संस्थेचे ते तपस्वी व्यक्तिमत्त्व असून डॉ. मयूर जोर्वकर, सौ. गौरीताई जोर्वेकर आणि सर्व परिवार त्यांच्या या कार्यात योगदान देत आहेत असे सांगून डॉ. उपाध्ये यांनी विविध नाटकात, एकांकिकामध्ये केलेल्या अभिनयाच्या आठवणी सांगितल्या.
हेमचंद्र भवर यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित साहित्य शोध, दिव्यत्वाचे चिंतन, साहित्याचे दीपस्तंभ आदी पुस्तके देऊन उपस्थित सर्वांचा गौरव केला. शंकरराव जोर्वेकर यांचा काकासाहेब कोयटे, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुष्पहार, पुस्तके देऊन नाट्य कार्याबद्दल सत्कार केला तर शंकरराव जोर्वेकर यांनी डॉ. उपाध्ये यांच्या श्रीरामपूरातील वाचन चळवळ कार्याबद्दल सत्कार केला.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111