shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहित शर्माची कसोटी कारकिर्द ऐरणीवर ?


               ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची स्थिती चांगली दिसत नाहीये.  पहिल्या डावात १८० धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय संघाची आघाडीची फळी ढासळली आणि एकाच सत्रात पाच विकेट्स गमावल्या.  या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड दमदार फलंदाजी करत होता, त्या खेळपट्टीवर यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे फलंदाज संघर्ष करताना दिसले. 

                भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला  ३३७ धावांत गुंडाळले, तरीही कांगारू संघ १५७ धावांची आघाडी घेण्यात यशस्वी झाला. स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १२८ धावांवर पाच गडी गमावले.  भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा २९ धावांनी मागे आहे.  यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत २८ धावा आणि नितीश रेड्डी १५ धावांसह नाबाद उपस्थित होते.  ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी दोन, तर मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली.

                 पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करणाऱ्या भारतीय टॉप ऑर्डरला ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने दम भरलेला दिसत होता.  पहिल्या डावातही भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान बॅटरीसमोर आपली क्षमता सिद्ध करू शकले नाहीत आणि शनिवारी दुसऱ्या डावातही असेच काहीसे पाहायला मिळाले.  ॲडलेड ओव्हलच्या याच खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली होती, तर बोलँड, कमिन्स आणि मिचेल स्टार्क या त्रिकुटासमोर भारतीय फलंदाज गारद झाले.  या सामन्यात वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची कमजोरी स्पष्टपणे दिसून आली.  तथापि, पंत हा एक फलंदाज आहे ज्याने जोखीम पत्करली आणि काही चांगले शॉट्स खेळले. 

                भारतीय संघाला आता पंत आणि नितीश यांच्याकडून आशा आहेत. सततच्या पडणाऱ्या पडत्या विकेट्समध्ये रिषभ पंतनेच निर्भयपणा दाखवला आणि सतत मोठे फटके खेळून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.  पंतने आतापर्यंत २५ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार मारले आहेत.  भारताला मोठी आघाडी घ्यायची असेल, तर पंत आणि नितीश यांना करिष्माई भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढावे लागेल. या सामन्यात भारतीय संघासाठी कदाचित काहीच उरले नाही, परंतु पंतने साथ दिली आणि दुसऱ्या टोकाला तळाच्या फलंदाजांनी त्याला साथ दिली आणि संघ मोठी आघाडी घेण्यात यशस्वी झाला तर भारत सामन्यात पुनरागमन करू शकतो.  यानंतर संघाला सावरण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर असेल. 

                या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  गुलाबी चेंडू वेगवान गोलंदाजांना खूप मदत करतो आणि नवीन चेंडूने फलंदाजी करणे सोपे नसते.  असे असतानाही भारतीय कर्णधार रोहितने फलंदाजीचा निर्णय घेतला.  पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रातच भारतीय संघाची फलंदाजी ढासळली.  त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला फलंदाजीत फारशी अडचण आली नाही.  खासकरून हेड ज्याने उघडपणे गोलंदाजांना त्रास दिला आणि १४० धावांची खेळी खेळली. अशा परिस्थितीत रोहितने खेळपट्टी समजून घेण्यात काही चूक केली का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.  तसेच भारताची फलंदाजी खराब होती आणि ते ऑस्ट्रेलियन गोलंदाजां समोर टिकू शकले नाहीत. न्युझिलंड विरुद्ध बंगलोर कसोटीतही पावसाच्या सावटात रोहितसारखा कसलेला कर्णधार खेळपट्टी समजू शकला नव्हता व त्यानंतर भारताची ४६ धावांवर नामुष्कीजन्य बोळवण झाली. आताही तशीच परिस्थिती असून संघाच्या परवडीला खास करून कर्णधार म्हणून रोहित शर्मा व त्याच्या हा मध्ये हा मिसळणारा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभिर व त्याची सपोर्ट टिमच जबाबदार आहे.  या सामन्यात भारत हरला तर रोहितच्या नेतृत्वात सलगा चौथा कसोटी पराभव असेल व त्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलचे दरवाजे बंद होण्यास सुरुवात होऊ शकते.

                 एकंदर सध्या तरी रोहित शर्मा कर्णधार म्हणून निकम्मा ठरत आहे तर फलंदाज म्हणून सफसेल फेल ! अशा परिस्थितीत त्याच्या गैरहजेरीत पर्थ कसोटीत यश मिळवून देणाऱ्या जसप्रित बुमराहाच्या गळ्यात उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी नेतृत्वाची माळ घालून द्यावी. जेणेकरून बुलंद आत्मविश्वास वाढलेल्या बुमराहाच्या कलागुणांचा लाभ टिम इंडियाला घेता येईल. सध्या तरी रोहितला टिम इंडिया पासून दूर करणेच संघाच्या हिताचे ठरू शकते. तसे पहाल तर रोहित स्वतःच हुशार आहे. त्याने स्वतःहून चाणाक्षपणा दाखवून संघापासून दूर राहण्याची समजदारी दाखवायला हवी. पण तो करण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. जर त्याने पुढील तीन सामन्यात खेळण्याचा अट्टाहास दाखविला व फलंदाज आणि कर्णधार म्हणून फेल गेला, भारत मालिका हरला, डब्ल्यूटीसी फायनल हुकली तर रोहितची कसोटी कारकिर्द शंभर टक्के संपलीच समजा.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close