ज्वलनशील गॅस बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरण्याचा प्रकार उघड.
एरंडोल (दि. ८ फेब्रुवारी) – शहरातील एरंडोल ते रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे वाहने भरण्यासाठी वापरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगेश नगराज महाजन (वय १९, रा. बालाजी मढी, एरंडोल) याच्यावर BNS 2023 कायदा कलम 287 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा प्रकार आणि पोलिसांची कारवाई.
दि. ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.४० वाजताच्या सुमारास, पोलीस हवालदार सचिन किरण पाटील यांनी एरंडोल शहरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. या कारवाईत ४ भरलेले इंडेन कंपनीचे गॅस सिलेंडर (₹८,००० किंमत), ४ रिकामे भारत गॅस सिलेंडर (₹४,००० किंमत) आणि गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन (₹१०,००० किंमत) असा एकूण ₹२२,००० किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
सुरक्षेचा मोठा धोका...
गॅस सिलेंडरचा असा बेकायदेशीर वापर मोठा अपघात घडवू शकतो आणि मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. गृहवापरासाठी असलेले एलपीजी सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही आरोपीने हा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
तपास सुरू...
या प्रकरणी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा धोकादायक प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


