देहरे: गावात मागील तीन दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः दहशत माजवली आहे. रात्रीच्या अंधारात चोरांची टोळी सक्रिय होत असून, गाड्या लंपास करणे, घरे फोडणे आणि मौल्यवान वस्तू पळवणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर पोलीस अद्याप चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी आतापर्यंत चार दुचाकी चोरी केल्या असून, दोन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे, काही घरांमध्ये कुटुंबीय झोपेत असतानाच चोरी झाल्याने नागरिक अधिक भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून घरमालकांना धमकावल्याची माहिती समोर येत आहे.
घटनांनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, रात्रीच्या गस्तीसाठी विशेष पथक तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून केवळ चौकशी सुरू असून, ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी संघटित होण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. आता पाहावे लागेल की, पोलीस या गुन्हेगारांना कधी आणि कसे अटक करतात!

