श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रोजा म्हणजे पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडणे नव्हे, रोजा डोळ्यांचा, जीब्हेचा, कानांचा, हातापायांचा सुद्धा आहे.आदर्श माणूस,आदर्श कुटुंब व आदर्श समाज निर्मिती हाच रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजेदार माणसाचे बोलणे, ऐकणे, पहाणे,वागणे आणि देवाण- घेवाण आदर्शवत असली पाहिजे. इंद्रियावर ताबा असायला हवा अन्यथा रोजा ठेवून जो खोटे बोलतो, खोटे वागणे सोडत नाही त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाह ला काडी मात्र गरज नसल्याचे व हेच प्रेषितांना अपेक्षित असल्याचे डॉ. रफिक सय्यद यांनी रोजा इफ्तार कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील जामा मस्जिद याठिकाणी हिंदू - मुस्लिम यांच्या संयुक्तिक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ते बोलत होते.
इस्लाम व रोजा याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.संभाजी बोरुडे उपस्थित होते .
कलमा, नमाज, जकात, रोजा आणि हज हे इस्लामचे मूळ स्तंभ असल्याचे सांगून डॉक्टर सय्यद पुढे म्हणाले की, रमजान या पवित्र महिन्यात रोजे अदा केले जातात. सूर्य उगवण्याच्या दीड तास अगोदर पासून रोजाची सुरुवात होऊन सूर्यास्तानंतर इफ्तार ने याची सांगता होते. दरम्यानच्या काळात परमेश्वराचे नामस्मरण, इबादत (प्रार्थना) केली जाते. केवळ उपाशी रहाणे म्हणजे रोजा नव्हे. तर रोजेदारावर अनेक बंधने असतात. त्यांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक असते तरच रोजा पूर्ण होतो. रोजा असताना रोजेदाराने आपले डोळे, कान, हात, पाय, जीव्हा आदींवर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाईट बोलणे, वाईट ऐकणे, हाताने, पायाने कोणाला त्रास देणे असे प्रकार घडल्यास त्याला रोजा म्हणता येणार नाही. आपल्यापासून इतरांना त्रास होईल असे कृत्य आपल्याकडून होता कामा नये याचीही पुरेपूर काळजी घ्यावी लागते. पवित्र ग्रंथ कुराणचा दाखला देत त्यांनी म्हटले आहे की, जीवनाचे सार्थक करा ज्यांच्यात वाद आहेत ते मिटवा. भावा - भावात असलेले मतभेद मिटवा. त्यांना जोडण्याचे काम करा .घोटाळे बेइमानी करू नका, परोपकार करा, चांगले कर्म करा ते तुमच्या बरोबर येणार आहेत.या शिकवणी नुसार पालन केले तर तुमच्या रोजाचे व जीवनाचे सार्थक होईल व या पवित्र महिन्यात आचरणात आणलेल्या प्रत्येक चांगल्या सवयीचे तुम्ही आदी व्हाल. ज्यामुळे तुम्हास कायम चांगले वागण्याची सवय लागेल. डॉक्टर नाही होता आले, इंजिनिअर नाही होता आले, वकील नाही होता आले तरी चालेल किमान चांगले माणूस झालात तरी खूप असे सांगून त्यांनी मानवी जीवनाचा खरा अर्थ सांगितला.
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड.
बोरुडे यांनी आज प्रथम वेळेस या पवित्र ठिकाणी आल्याचा आनंद तर झाला आहेच, मुस्लिम समाजाच्या लोकांनी सर्व समाजातील लोकांना एकत्रित बोलावून प्रेषितांना अपेक्षित असा जीवन जगण्याचा मार्ग दाखवून या अमृततुल्य ‘डोस ‘ बरोबरच इतक्या प्रेमाने जवळ बसवून स्वतः घेत असलेल्या रोजाचा प्रसाद अर्थात आपल्या घासातील घास आम्हालाही दिला हा भाई चारा पाहून आपण भारावून गेलो आहोत. असे सांगत बोरुडे म्हणाले बाहेर ज्याप्रमाणे मुस्लिमांबद्दल गैरसमज पसरवून हे वाईट आहेत असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र इथे आल्यानंतर वेगळीच पवित्रता आणि बंधुभाव व प्रेम पहायला मिळाले याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगून हे कार्यक्रम वारंवार व्हावेत त्यामुळे आपा-पसातील प्रेम आणखी वृध्दींगत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली .यावेळी अनेक हिंदू बांधवांनी पवित्र रमजान व रोजा निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व इफ्तार कार्यक्रमाची सांगता झाली.मुस्लिम बांधवांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचे व प्रेमाने दिलेल्या इफ्तार पार्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111