अजीजभाई शेख / राहाता:
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध समस्या आणि आश्वासित मागण्यांवर शासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याने राज्यभरासह राहाता तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेकडून राहाता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन संघाकडून शासनाकडे वारंवार मागण्या मांडूनही त्या प्रलंबित आहेत. या धर्तीवर राज्यभरातील सर्व तहसीलदार यांना निवेदने देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सोपानराव कदम, सचिव सुनील गोरे व महासंघाच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुकाध्यक्ष डॉ. शरद दुधाट, सचिव श्याम जगताप, संजय ठाकरे, जवाहरलाल पांडे, अरुण कुळसुंदर, रणजीत पाटील आदींसह इतर शिक्षकांनी राहाता नायब तहसीलदार एच.जी. पाटील यांना निवेदन दिले. या मागण्यांमध्ये आयटी शिक्षकांचे समायोजन, अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा देणे, सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे, सन २००५ पूर्वी अर्धवेळ व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, वाढीव पदांचे समायोजन करणे, शिक्षकांच्या निवृत्तीचे वय ६० करणे, तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करणे, उपप्राचार्यांना पदोन्नती वेतन वाढ देणे, अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ होताना अर्धवेळ सेवेची वेतनवाढ देणे, अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करणे, शिक्षकांची रिक्त पदे भरणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यात यावा, एम.फील, पीएच.डी. धारक शिक्षकांना वेतनवाढ मिळावी, डीसीपीएस व एनपीएस धारक शिक्षकांना हिशेब व देय रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी ही निवेदने देण्यात आली आहेत.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111