shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयसीसीचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारी कर्णधार मॅग लॅनिंग डब्ल्यूपीएलमध्ये पुन्हा हतबल !



                   नॅट सिव्हर ब्रंटच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा आठ धावांनी पराभव करून अंतिम सामना जिंकला.  यासह मुंबईने पुन्हा एकदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकविण्यात यश मिळविले.  स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीचा विजेतेपदाचा सामना शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला.  या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करावी लागल्यानंतर मुंबईने २० षटकात ७ बाद १४९ धावा केल्या.  प्रत्युत्तरात दिल्लीला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली.  अशाप्रकारे मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकविले.  याआधी हरमनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत दिल्लीचाच पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. 

                  दिडशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला आपल्या फलंदाजांची साथ मिळाली नाही.  अवघ्या ४४ धावांवर संघाने चार विकेट गमावल्या.  कर्णधार मेग लॅनिंग तेरा धावा करून बाद झाली तर शेफाली वर्मा फक्त चार धावांवर परतली. यानंतर अमेलिया कारने जेस जोनासनला यस्तिका भाटियाकडे झेलबाद केले.  तिलाही केवळ तेरा धावाच करता आल्या.  दिल्लीकडून मारिजन कापने सर्वाधिक ४० धावांची खेळी खेळली.  तिच्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने ३० धावा केल्या.  तर ॲनाबेल सदरलँड दोन, सारा ब्राइस पाच , मिन्नू मणीने चार धावा केल्या.  निकी प्रसाद २५ धावांवर तर श्री चरणी तीन धावांवर नाबाद राहिल्या.  मुंबईतर्फे नॅट सिव्हर ब्रंटने तीन तर अमेलिया कारने दोन गडी बाद केले.  तर शबनम इस्माईल, हिली मॅथ्यूज आणि सायका इशाक यांना प्रत्येकी एक यश मिळाले.                                               पुरुषांच्या आयपीएल प्रमाणेच महिला प्रीमियर लीगमध्येही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला अंतिम सामन्यानंतर ऑरेंज कॅप दिली जाते.  मुंबई इंडियन्सची बॅटर नॅट सिव्हर ब्रंट या बाबतीत आघाडीवर होती.  इंग्लंडच्या या बत्तीस वर्षीय खेळाडूने पाच अर्धशतकांच्या मदतीने दहा डावात सर्वाधिक ५२३ धावा केल्या.  चालू मोसमात तिची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८० होती.  दुसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबीच्या एलिस पेरीने ३७२ धावा केल्या.

                  ज्याप्रमाणे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, त्याचप्रमाणे स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज पर्पल कॅपची दावेदार असते.  न्यूझीलंडची २४ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अमेलिया कारने तिचीच सहकारी हेली मॅथ्यूजला मागे टाकून पर्पल कॅप जिंकली.  या स्पर्धेत ती सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज होती.  तिने ७.७५ च्या इकॉनॉमी रेटने १८ बळी घेतले.  तर, मुंबईची हीली ८.२२ च्या सरासरीसह  १८ बळी घेऊनही विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर राहिली.

                 आपल्या कुशल नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला पाच वेळा विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या मेग लॅनिंगला शनिवारी आशा होती की, तिच्या नेतृत्वाखाली ती दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवेल.  पण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबईने तिचे स्वप्न साकार होऊ दिले नाही आणि लॅनिंगला सलग तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले.  डब्ल्यूपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणारी लॅनिंग सन २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार बनली आणि वयाच्या २१ व्या वर्षी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणारी ऑस्ट्रेलियाची सर्वात तरुण कर्णधार बनली.  लॅनिंग ही ऑस्ट्रेलियाची सर्वात यशस्वी महिला कर्णधारही आहे.  तिने तिच्या कारकिर्दीत एकूण सात आयसीसी विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या आहेत, त्यापैकी तिच्या नेतृत्वाखाली पाच विजेतेपदे पटकविले आहेत. 

                  लॅनिंगने १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच टी-२० आणि दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत.  सन २०१२ मध्ये तिने प्रथम खेळाडू म्हणून टी२० विश्वचषक जिंकला आणि एक वर्षानंतर सन २०१३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.  आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दोन विश्वचषक विजेत्या संघांचा भाग असलेल्या लॅनिंगने सन २०१४ मध्ये लहान वयातच महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली. त्यानंतर तिच्या कारकिदीने महत्त्वपूर्ण वळण घेतले.  त्याच वर्षी  तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने  प्रथमच टी २० विश्वचषक जिंकला.  लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सन २०१४, २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकले, तर सन  मध्ये एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीही जिंकली.  पुरुष आणि महिला दोघांसाठी सर्वाधिक विश्वचषक जिंकणारी लॅनिंग ही जगातील पहिली कर्णधार ठरली.  तिच्या शिवाय इतर कोणत्याही कर्णधाराला दोनपेक्षा जास्त विश्वचषक ट्रॉफी जिंकता आलेली नाहीत.  शनिवारी मुंबई इंडियन्सला पराभूत करून तिला आणखी एक करंडक जिंकण्याची संधी होती, परंतु अंतिम फेरीत दिल्लीची कामगिरी अत्यंत खराब राहिल्यामुळे लॅनिंगला आणखी एक चषक पटकविता आला नाही. 


                   लॅनिंगने नोव्हेंबर, सन २०२३ मध्ये आपली शानदार आंतरराष्ट्रीय कारकीर्द थांबविण्याचा निर्णय घेतला होता.  तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २४१ सामने खेळले.  लॅनिंगने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी आठ हजारपेक्षा अधिक धावा केल्या.  कर्णधार म्हणून तिने १८२ सामन्यांत ऑस्ट्रेलियाची धुरा सांभाळली. 

                   हरमनप्रित भले भारताला आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकली नसली तरी तिच्या नेतृत्वात तिने तिन पैकी दोन वेळा जगातील सर्वात जास्त आयसीसी करंडक पटकविणाऱ्या लॅनींग सारख्या कर्णधाराला दोनदा गुडघे टेकायला लावत मुंबई इंडियन्सला डब्ल्यूपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. विशेष म्हणजे हरमनच्या भारतीय संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृती मंधानाने सन २०२४ च्या डब्ल्यूपीएलचे विजेतेपद आरसीबीला मिळवून दिले होते, तेही मॅग लॅनींगच्या दिल्ली कॅपिटल्सला नमवूनच. कदाचिति नियतीने उगविलेला हा आगळावेगळा सूडच म्हणावा लागेल !

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close