shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाकिस्तानच्या नव्या गुणवत्तेचेही पितळ उघडे !


                   आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ? ही म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे. तिचा प्रत्यय पाकिस्तानी क्रिकेटच्या बाबत शब्दशः तंतोतत जुळताना दिसून येत आहे. पाक  संघाला मागील काही दिवसांपासून सातत्याने पराभवानंतर पराभवाचा सामना करावा लागत आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड संघाने तिरंगी एकदिवसीय मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता.  यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यातही पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानला पहिल्या फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. त्या नंतर पाकिस्तानने आपल्या वनडे व टी २० संघात मोठे बदल केले. एवढेच नाही तर टी२० चा कर्णधारही बदलला. मोहम्मद रिझवानला काढून सलमान अली आगाला नेतृत्वाच्या बोहल्यावर चढविले, नवीन खेळाडू संघात घेतले. इतकेच नाही तर अडगळीत पडलेले मोहम्मद हॅरीस, शादाब खान सारखे खेळाडूही परत बोलावले पण फरक शुन्य, अशी सामन्यानंतर त्यांची अवस्था दिसून येते. याचा अर्थ त्यांच्याकडे पर्यायी खेळाडूच नाहीत हे सिद्ध होतेय. विद्यमान मालिकेतील सलगच्या दोन पराभवा नंतर तर हे पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेसमोर आले.

                    पाकिस्तान संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दोन सामनेही गमावले आहेत.  ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला.  टीम सेफर्टने शानदार खेळी खेळली आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना प्रत्येकी पंधरा षटकांचा खेळवला गेला.  न्यूझीलंड संघाचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.  अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि ९ बाद १३५ धावाच करू शकला.  पाकिस्तानकडून कर्णधार सलमान अली आगाने २८ चेंडूत ४६ धावांची शानदार खेळी केली, तर उपकर्णधार शादाब खानने १४ चेंडूत २६ धावा केल्या.  शाहीन शाह आफ्रिदीने १४ चेंडूत २२ धावांची खेळी केली.  न्यूझीलंडकडून जेकब डफी, बेन सियर्स, जिमी नीशम आणि ईश सोधीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

                    त्यानंतर न्यूझीलंड संघ १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला, पहिल्या षटकात एकही धाव झाली नाही तेंव्हा वाटलं वाटलं होतं की, पाकिस्तान या सामन्यात सकारात्मक कामगिरी करेल. मात्र तसे काही झाले नाही. उलट न्यूझीलंडनेच पहिलं षटक निर्धाव खेळूनही १३.१ षटकात ५ बाद १३७ धावा करून सामना खिशात घातला व मालिकेतील आघाडी २-० अशी वाढवली. न्यूझीलंडसाठी टीम सेफर्ट २२ चेंडूत ४५, फिन ऍलन २६ चेंडूत ३८ तर  मिचेल हेने १६ चेंडूत २१ धावा करून पाकिस्तानी गोलंदाजांच्या शिडातली हवाच काढून घेतली.  हरिस रौफने दोन, तर मोहम्मद अली, खुशदिल शाह आणि जहन्नाद खान यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.  आता मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी २१ मार्च रोजी ऑकलंडमध्ये होणार आहे.  जर पाकिस्तानने तो सामना जिंकला नाही तर मालिका संपण्यापूर्वीच यजमान न्यूझीलंडकडे जाईल.

                     शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज म्हटले जाते, परंतु शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीचे टीम सेफर्टने अक्षरशः हसे केले.  शाहीन आफ्रिदीच्या दुसऱ्या षटकात न्यूझीलंडच्या या धडाकेबाज सलामीवीराने  तब्बल चार षटकार ठोकले.  पावसामुळे १५-१५ षटकांच्या झालेल्या या सामन्यात टीम सेफर्टने शाहीन शाह आफ्रिदीला लक्ष्य केले आणि त्याच्या षटकात चार षटकारांसह एकूण २६ धावा शब्दशः लुटल्या.  यामुळे १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगलीच गती मिळाली.  याचा पुरेपूर फायदा उर्वरित फलंदाजांनी घेतला.  मात्र, त्याच सामन्यातील पहिल्याच षटकात टीम सेफर्टला शाहीनविरुद्ध एकही धाव काढता आली नाही. शाहिन आफ्रिदीची झालेली पिटाई बघून इतरही गोलंदाजांची गाळण उडाली व त्याचा परिणाम सामन्याचा निकाल त्यांच्या विरोधात गेला.


                   तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १५ षटकांत ९ गडी गमावून १३५ धावा केल्या.  यानंतर न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा २ षटकांत १८ धावा झाल्या होत्या.  यानंतरही किवी सलामीवीर थांबले नाहीत.  टीम सेफर्टने शाहीन शाह आफ्रिदीला लक्ष्य केले आणि एक-दोन नव्हे तर चार षटकार मारले आणि डावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात एक दुहेरी धावाही घेतल्या.  अशा प्रकारे शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीची मर्यादा स्पष्ट केली.  फिन ऍलनने डावाच्या दुसऱ्या षटकात आणि महंमद अलीच्या पहिल्या षटकात तीन षटकार ठोकले.

                   एकंदर बघता पाकिस्तानकडे सध्या तरी कोणताही नवीन गुणवान खेळाडू नाही. तसेच जुन्या व अनुभवी खेळाडूंना इतके सामने खेळूनही आपल्यातली प्रतिभा दाखविता येत नाही. याचा अर्थ सरळ निघतो की, पाकिस्तानी क्रिकेटची उलटी गिनती सुरू झाली असून अंत कधीही होऊ शकतो.



@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close