shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नव्या पर्वात केकेआरला अजिंक्य राहाणे जमेल ?


                इंडियन प्रिमियर लिग अर्थात आयपीएलच्या नव्या सत्रात केकेआरला गतविजेतेपद राखण्याचे शिवधनुष्य पेलवेल का ? या प्रश्नानेच नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. कारण गत सत्रात कोलकाता नाइट रायडर्सने दहा वर्षांचा दुष्काळ संपवून जेतेपद पटकविले होते.  श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने हे विजेतेपद पटकविले आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन बनले.  पण या मोसमात ना कर्णधार श्रेयस आहे ना प्रशिक्षक गौतम गंभीर.  अशा परिस्थितीत विजेतेपदाचा मार्ग सोपा होणार नाही.  तरीही हा संघ आयपीएल २०२५ जिंकण्याचा दावेदार आहे यात शंका नाही.

                   या मोसमातील मेगा लिलावात कोलकाताने मोठी जोखीम पत्करली.  विजयी कर्णधार श्रेयस अय्यरला कायम ठेवले नाही.  लिलावात अय्यरला विकत घेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला.  या आयपीएलमध्ये संघाला सर्वात स्वस्त किंमत मोजून मिळालेला कर्णधार म्हणून अजिंक्य राहाणे सारखा माजी भारतीय कर्णधार लाभला आहे.  तथापि, त्याच्या नेतृत्व क्षमतेवर कोणालाही शंका नाही. नव्या हंगामापूर्वी कोलकाताने अजिंक्य राहाणेला कर्णधार बनवले आहे,  केकेआरने त्याला अवघ्या दिड कोटी रुपयांत विकत घेतले आहे.  त्याच्याकडे अनुभव आहे जो संघासाठी उपयुक्त ठरेल. तसं पाहायला गेलं तर संघाच्या मेगा लिलावात विशेष काही झालं नाही.  संघाला जे खेळाडू विकत घ्यायचे होते ते विकत घेता आले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की, हवा तसा संघ ते तयार करू शकले नाही.  मात्र, तरीही हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.  सदर लेखात नव्या केकेआर चमूची माहिती आपणासाठी सादर करत आहोत.

                 या संघात टी२० क्रिकेटच्या जगतातील अनेक मोठी नावे आणि तुफानी फलंदाज आहेत.  यामध्ये आंद्रे रसेल, रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज यांच्या सारख्या खतरनाक फलंदाजांचा समावेश आहे.  या फलंदाजांसह संघाकडे स्फोटक फलंदाजांचा भरणा देखील आहे.  या संघात मातब्बर फलंदाजांची कमी नाही.  झंझावाती फलंदाजी व्यतिरिक्त, संघात असे फलंदाज आहेत जे स्थिर खेळू शकतात आणि परिस्थितीनुसार फलंदाजी करू शकतात. कर्णधार अजिंक्य राहाणे हा स्वतः युक्तीबाजीत तरबेज आहे.  उपकर्णधार व्यंकटेश अय्यरही या कौशल्यात नवखा असला तरी एवढया मोठ्या स्तरावर खेळण्याचा अनुभव त्याच्या पदरी मोठा आहे.  मनीष पांडे कोलकात्यात परतला आणि संघाला तो त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसावा अशी इच्छा आहे.  या संघात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीसारखे नावही आहे.  एकूणच, संघाकडे सामने जिंकू शकणारी फलंदाजी आहे आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.

                   वैविध्यपूर्ण फिरकी गोलंदाजी हेही संघाचे बलस्थान आहे.  सुनील नारायण सारखा फिरकी गोलंदाज मागील काही सत्रांपासून फलंदाजीतही दमदार सुरूवात करून देत असल्याने त्याच्या विषयी बोलणे ओघाने आलेच. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात दमदार कामगिरी केल्यानंतर वरुण चक्रवर्ती आत्मविश्वासाने भरलेला आहे.  यात मयंक मार्कंडे आणि मोईन अली महत्वाचे योगदान देऊ शकतात.

                   वेगवान गोलंदाजीती अनुभव व धारदारपणाचा अभाव ही या संघाची कमजोर बाजू दिसते.  मागच्या पर्वात मिचेल स्टार्कसारखा गोलंदाज होता, तो या हंगामात नाही.  हर्षित राणा चांगली कामगिरी करू शकतो.  एनरिक नॉर्कियाची तंदुरुस्ती चिंतेचा विषय आहे.  उमरान मलिकचा वेगवान गोलंदाजीतील वेगही मागच्या सत्रात ओसरलेला दिसला, म्हणून तर सनरायझर्स हैद्राबादने त्याच्यावर मोठा डाव लावला नाही. गोलंदाजीत आंद्रे रसेल पूर्वीसारखा साहाय्यभूत ठरेल असे सध्या तरी दिसत नाही.  वेगवान गोलंदाजीच्या प्रांतात केकेआर पुढे सर्वाधिक चिंता दिसते.

                  केकेआरकडे असे काही प्रतिभावान  खेळाडू आहेत की, ज्यांना ते भविष्यासाठी तयार करू शकतात.  अजिंक्य राहाणे हा संघाचा कर्णधार असला तरी तो दिर्घकाळ या पदावरच काय संघात राहिल याची कोणीही हमी देऊ शकत नाही. त्याची कारकीर्द फार मोठी नाही हे सर्वांनाच माहीत आहे.  अशा परिस्थितीत संघ त्याच्या कार्यकाळात भविष्यातील कर्णधार तयार करू शकतो, जो व्यंकटेश अय्यर असू शकतो.  त्याचप्रमाणे रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांना मोठ्या पल्ल्याचा खेळाडू म्हणून घडविले जाऊ शकते.  रमणदीपचा शेवटचा हंगाम दमदार होता. देशांतर्गत स्पर्धात या उजव्या हाताच्या फलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली आहे.

                  नवा कर्णधार आणि काही बदलांमुळे जेतेपद वाचविणे केकेआर साठी सोपे असणार नाही.  संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि त्यांच्या उर्वरित सहकाऱ्यांना कठोर रणनीती ठरवावी लागेल आणि पुढे कसे जायचे याचे योग्य नियोजन करावे लागेल.  नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात एकत्र राहणे आणि प्रत्येक खेळाडूला समजून घेणे हे संघासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

                  कोलकाता नाईट रायडर्स संघ असा आहे : -  अजिंक्य राहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्लाह गुरबाज, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश (उपकर्णधार) अय्यर, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्किया, हर्षित राणा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक, स्पेन्सर जॉन्सन व रोवमन पॉवेल.

                    जय मेहता, जुही चावला व शाहरूख खान यांच्या संयुक्त मालकीचा केकेआर संघ या सत्रात नव्याने जोमाने उतरेल यात कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. मात्र गत सत्रात मोठ्या कष्टाने मिळविलेले विजेतेपद राखणे अजिंक्य राहाणे व त्याच्या सवंगड्यांना जमेल का ? या प्रश्नावर आयपीएल विश्वात चर्चा मात्र रंगायला सुरुवात झाली आहे.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close