shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विपराज- आशुतोष ठरले दिल्लीचे संकटमोचक


              अठराव्या आयपीएल सत्रातील चौथा सामना रोमांचकारी होता.  एकेकाळी अशक्य वाटणारे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सने तीन चेंडू शिल्लक असताना गाठले.  प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत आठ बाद २०९ धावा केल्या.  प्रत्युत्तरात दिल्लीने १९.३ षटकांत नऊ गडी गमावून लक्ष्य गाठले.  या विजयात दिल्लीच्या दोन नवोदित खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.  यामध्ये आशुतोष शर्मा याच्याशिवाय विपराज निगमचाही समावेश आहे.  आशुतोषने ३१ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावांची खेळी केली.  मात्र, सुरुवातीला त्याला २१ चेंडूत केवळ २६ धावा करता आल्या.  पण शेवटच्या दहा चेंडूत त्याने रुद्रावतार धारण केले व दिल्लीला विजयाचा पैलतिर पार करून दिला. मात्र सामन्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देण्याचे काम विपराज निगमने केले. 

                   दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने ६५ धावांत पाच गडी गमावले. त्यानंतर आशुतोष मैदानात आला. त्याने ट्रिस्टन स्टब्ससोबत ४८ धावांची भागीदारी केली. स्टब्स आऊट होताच दिल्लीच्या आशा मावळल्याचे लक्षणं दिसत होते, कारण आशुतोषला मोठे फटके मारता येत नव्हते. तेराव्या षटकात स्टब्स बाद झाल्यानंतर विपराज फलंदाजीला आला. तेव्हा धावसंख्या सहा बाद ११३ अशी होती. ट्रिस्टन स्टब्स २२ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. विपराजने पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा केल्या, पण त्यानंतर त्याने गणितच बदवलले. आयपीएल पदार्पणातच विपराजने १५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेट २६० होता. दिग्वेश राठीने त्याला सिद्धार्थकरवी झेलबाद केले. मात्र, तो परतल्यानंतर दिल्ली संघाने दमदार पुनरागमन केले होते. या सामन्यात विपराजने एक विकेटही घेतली. विपराजने एडन मार्करामला बाद केले.

                   वयाच्या विसाव्या वर्षी, विपराज निगमने वरिष्ठ क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती केली आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला ५० लाख रुपयांच्या लिलावात त्यांच्या संघात समाविष्ट केले. विपराज निगम, राशिद खानपासून प्रेरित झालेला लेगस्पिनर आहे. फिरकीला अनुकूल पृष्ठभागांवर मारक वळणासाठी ओळखले जाते. युपी टी२० लीगमध्ये लखनौ फाल्कन्ससाठी त्याने खूप चांगली कामगिरी केली. या लीगमध्ये त्याने १२ सामन्यांमध्ये ११.५० च्या स्ट्राइक रेटने आणि ७.४५ च्या इकॉनॉमीने २० बळी मिळविले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सन २०२४-२५ च्या हंगामात उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. खालच्या ऑर्डरमध्ये तो मोठे फटकेही मारू शकतो. त्याच्याकडे खालच्या ऑर्डरमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि त्याने हे आपल्या आयपीएल पदार्पणात दाखवून दिलेच.
                जेव्हा त्याने उत्तर प्रदेशसाठी सर्व फॉरमॅटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्या देशांतर्गत कारकीर्दीला सुरुवात झाली. सन२०२४-२५ हंगामात, तो यूपीसाठी तीन प्रथम-श्रेणी सामने, पाच लिस्ट-ए सामने आणि सात टी२० सामने खेळला. या काळात त्याने १०३ धावा केल्या आणि नऊ गडी बाद केले.  

               या सामन्याचा दिल्लीसाठी गोड शेवट करणारा दुसरा खेळाडू आहे आशुतोष शर्मा. गेल्या मोसमात आशुतोष पंजाब किंग्ज कडून खेळला होता आणि गेल्या मोसमात त्याने गुजरात टायटन्स विरुद्धही अशीच कामगिरी केली होती.  पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर नेण्यात आशुतोषने महत्त्वाची भूमिका बजावली.  त्या सामन्यातही आशुतोषने प्रभावशाली खेळाडू म्हणून प्रवेश केला होता आणि शशांक सिंगसोबत त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.  मात्र, पंजाबने या मोसमात आशुतोषला कायम ठेवले नाही आणि दिल्लीने त्याला विकत घेतले. १५ सप्टेंबर १९९८ रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे जन्मलेल्या आशुतोषला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे.  मध्य प्रदेशातील नमन ओझा याचा तो मोठा चाहता आहे.  रतलाममध्ये जन्मल्यानंतर त्याने इंदूरमध्ये शिक्षण घेतले.  त्याने मध्य प्रदेशसाठी पदार्पण केले.  मात्र सन २०२० मध्ये चंद्रकांत पंडित प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांना संघ सोडावा लागला.  त्याचा एकमेव आधार म्हणजे त्यांचे बालपणीचे प्रशिक्षक भूपेन चौहान, ज्यांच्या पाठिंब्याने त्याला कठीण काळात प्रेरित केले.  सन २०२३ मध्ये आशुतोषचे प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड गेले.  यानंतर त्याने रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला.  भारताकडून खेळलेला यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझाने आशुतोषला इथपर्यंत पोहोचण्यात खूप मदत केली.

                 विद्यमान आयपीएल सत्रातील सर्वात महागडा खेळाडू व लखनौचा कर्णधार रिषभ पंत त्याला मिळालेल्या सर्वाधिक २७ कोटी रकमेला जागला नाही. या सामन्यात शुन्याचा धनी बनलेला पंत यापूर्वी दिल्लीचा कर्णधार होता. मात्र आपल्या जुन्या संघातील खेळाडूंनी त्याच्या कमकुवत बाबी हेरून आल्या पावली परत पाठविले. एकवेळ लखनौ २५० चा टप्पा पार करेल असे वाटत होते पण दिल्लीच्या गोलंदाजांनी निर्णायक टप्प्यात अप्रतिम मारा करून लखनौला २०९ धावांत रोखले व कसोटीच्या क्षणी विपराज व आशुतोष संकटमोचक बनले. त्यामुळेच हमखास होऊ घातलेला पराजय विजयात परावर्तित झाला.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close