चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही पाकिस्तानची खराब कामगिरी कायम राहिली. पहिल्या टी २० सामन्यात, न्यूझीलंडने पाकिस्तानला १८.४ षटकात अवघ्या ९१ धावांत गुंडाळले. या प्रारूपातील पाकची किवींविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात किवी संघाने १०.१ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात ९२ धावा केल्या आणि सामना नऊ गडी राखून जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
ख्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज जेकब डफी आणि काइल जेमिसन यांच्या धारदार गोलंदाजीचा सामना पाकिस्तानच्या फलंदाजांना करताच आला नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजां नंतर, फलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. पाककडून मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदने मात्र सलामीवीर टीम सेफर्टला अर्धशतक झळकविण्या पासून रोखले, सेफर्ट २९ चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ४४ धावा करून बाद झाला. यानंतर फिन ॲलन आणि टिम रॉबिन्सन यांनी संघाला विजयाकडे नेले. ॲलन १७ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९, तर रॉबिन्सन १५ चेंडूंत एका षटकाराच्या मदतीने १८ धावा करून नाबाद राहिला.
तत्पूर्वी कर्णधार मायकेल ब्रेसवेलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने खाते न उघडता मोहम्मद हॅरीस आणि हसन नवाज यांच्या विकेट्स गमावल्या फटाफट गमावल्या तेंव्हा पाकिस्तानचा धावफलक कोराच होता. तेंव्हा अर्थातच दोन्ही सलामीवीर धावलेखकाला कुठलाही त्रास न देता डग आऊटमध्ये परतले होते. त्याचा परिणाम असा झाला की, पडझड थांबलीच नाही. पॉवर प्ले मध्ये १४ धावात चार प्रमुख फलंदाज गमवावे लागलेल्या पाकिस्तानला त्यानंतर सावरताच आले नाही. पाकिस्तानकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यांच्या सहा फलंदाजांनाही दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि दोन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून खुशदिल शाहने ३० चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ३२ धावा केल्या तर कर्णधार सलमान अली आगा १८ व जहांदाद खानने १७ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडसाठी, डफीने ३.४ षटकांत १४ धावांत चार बळी घेतले, तर जेमिसनने चार षटकांत आठ धावांत तीन बळी घेतले, ज्यात एका निर्धाव षटकाचाही समावेश होता. याशिवाय ईश सोधीने दोन आणि झकारी फॉक्सला एक बळी मिळाला.
या सामन्यात पाकिस्तानची कामगिरी इतकी खराब झाली होती की न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच टी-२० मध्ये ते शंभर पेक्षा कमी धावांत सर्वबाद झाले. सन २०१६ मध्ये या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची किवीविरुद्धची किमान धावसंख्या १०१ धावा होती.
मागील काही दिवसांपासून पाकिस्तान म्हणजे पराभव असे समिकरण बनले आहे. त्याचा अनुभव संपूर्ण जगाला क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यात, कोणत्याही मालिकांत, स्पर्धांत बघायला मिळाला आहे, मग ते सामने कोठेही खेळले जावोत. जगातला कोणताही संघ आपला देश सोडून कुठे जिंकला नाही तरी मायदेशात घरच्या खेळपट्टयांवर स्वतःच्या प्रेक्षकांसमोर जिंकतोच जिंकतो. पण पाकिस्तानची परिस्थिती तशीही नाही. बाहेर सोडाच पण घरच्या सर्वांगीन अनुकूल वातावरणातही पराभव त्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. क्रिकेट बोर्डाचे चेअरमन बदला, प्रशिक्षक नवे नेमा, कर्णधारांची संगीत खुर्ची खेळा, स्वतःच्या मर्जीतले खेळाडू निवडा, खेळपट्टया मनासारख्या बनवा तरीही पराभवाचे शुक्लकाष्ट पाकिस्तानचा पिच्छा सोडायलाच तयार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील भ्रष्टाचाराच्या किडीने पोखरलेले राजकारण. भ्रष्ट राजकारण्यांने क्रिकेट मंडळात केलेला शिरकाव, क्रिकेटचा ओ की ठो न समजणाऱ्या मंडळींना मोठमोठया पदावर बसवून पैशांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातो व शिवाय ते लोक भ्रष्टाचार करतात तो भाग अलाहिदाच ! तेथील अधिकाऱ्यांना क्रिकेटपटूंपेक्षा जास्त मानधन मिळते. मग क्रिकेटचा विकास कसा होणार हा प्रश्नच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत इतर संघांनी फिरकी गोलंदाजांची फौज उभी करून खेळपट्टयांचा फायदा उचलला तेव्हा पाकने आपल्या संघात एकच निष्णात फिरकीपटू निवडला. तर न्यूझीलंडमधील जलदगती गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टया व वातावरणासाठी तब्बल पाच फिरकी गोलंदाज निवडून पाकिस्तानी थिंक टॅंकने आपल्या अकलेचे दिवाळे कसे निघाले आहे हे क्रिकेट जगताला स्वतःच दाखवून दिले.
गुणवान खेळाडूंना डावलून आपल्या मर्जीतील खेळाडूंना निवडणे, खेळवणे हि पाक क्रिकेटमधील आता सवयीची बाब बनली आहे. देशांतर्गत क्रिकेटचा ढाचाच तेथील असमंजस क्रिकेट अधिकाऱ्यांनी बंद करून टाकल्याने नवीन क्रिकेटपटू निर्माण कसे होणार ? नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयोजक पाकिस्तान होते, मात्र त्याचा कवडी इतकाही फायदा त्यांना झाला नाही. उलट त्यांच्या संघाची ढिसाळ कामगिरी व संयोजनातील असंख्य त्रुटी त्यांच्या इज्जतीचे लक्तरे जगाच्या वेशीवर टांगून गेल्या. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल होऊन संघाची गाडी पुन्हा रूळावर आणली जाईल असे वाटत होते. मात्र एखाद्या अर्धवट प्रशिक्षित डॉक्टरने कराव्या अशा मलमपट्टी प्रमाणे पाकिस्तानी निवड समितीने न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या वनडे संघात कुठलाही बदल न करता टी२० संघाचा कर्णधार बदलला व नवे खेळाडू टाकले. खरे तर चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे स्वरूपातील होती, अन् बदल केले टी२० संघात. यावरून पाकिस्तानचं क्रिकेट किती सुरक्षित हातात आहे याचा अंदाज येतो.
परदेशी संघ आपल्या देशात आल्यावर यजमान देश स्वतःचा मजबूत व भक्कम संघ निवडतो. पण यजमान न्यूझीलंडने आपल्या तिसऱ्या फळीतील खेळाडूंना पाकिस्तान समोर उतरवले व त्यांनी पाकिस्तानचा पहिल्या टी२० सामन्यात कसा फज्जा उडविला हे आपण वर वाचलेच आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंना न्यूझीलंडने भारतात आयपीएल खेळायला पाठवून पाकिस्तानच्या क्रिकेटींग पॉवरचे जगासमोर अक्षरशः हसे केले. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकच्या पराभवावर चर्चा करताना भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावस्करांनी पाकला भारताची तिसऱ्या दर्जाची टीम सहज हरवेल असे वक्तव्य केले, तेंव्हा पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकच्या चांगलेच जिव्हारी लागले होते व रागाच्या भरात " बटाटा फेम " इंझमाम गावस्करांविषयी वाईट बोलला होता. यावरून असे दिसते की, झालेल्या चुकांतून शिकायची व त्या चुका स्विकारण्याची मानसिकताही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंत दिसत नाही. उलट भारत कसा बेईमानी करून जिंकतो हे दाखविण्यातच ते स्वतःचे रक्त आटवत बसतात.
पाकिस्तानच्या प्रत्येक पराभवानंतर तेथील सोशल मिडीया, प्रसारमाध्यमे, टीव्ही, यु ट्यूब चॅनेल्सवर बसणाऱ्या तज्ञ मंडळींना त्यांच्या पराभवांचे शवविच्छेदन करायला आता शब्दच राहिलेले दिसत नाही. कारण नेहमी वापरून वापरून वापरून त्यांचा शब्दसाठाही संपल्या सारखा दिसतो व त्यांच्या रागाचा पाराही उतरल्यासारखा वाटतो. कारण सततचे पराभव व त्याच त्याच चुका पाहून तेथील क्रिकेट शौकिन व तज्ञांच्या सहनशिलतेचा अंत झाल्यासारखे दिसते.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२