सेनगाव, दि. १८ मार्च (प्रतिनिधी : विश्वनाथ देशमुख)
सेनगाव शहरातील अत्यंत गरिब आणि अपघातामुळे अपंगत्व आलेल्या कैलास सुदामा गवळी यांना पत्रकारांच्या पुढाकाराने व गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या सहकार्याने तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली.
काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात गवळी यांचा एक पाय निकामी झाल्याने त्यांची हालचाल पूर्णतः थांबली होती. त्यामुळे त्यांना घरातच बसून राहण्याची वेळ आली होती. त्यांच्या या परिस्थितीची दखल घेत पत्रकार महादेव हरण आणि मी स्वतः, पत्रकार विश्वनाथ देशमुख, यांनी पुढाकार घेतला. गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांची भेट घेऊन गवळी यांना तातडीने तीन चाकी सायकलची गरज असल्याचे सांगितले.
गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत सायकल उपलब्ध करून दिली. नगरसेवक अमोल तिडके आणि भाजप युवा शहराध्यक्ष गजानन उफाड यांच्या हस्ते कैलास गवळी यांना सायकल सुपूर्त करण्यात आली.
यावेळी पत्रकार महादेव हरण, गजानन उगीरे आदी उपस्थित होते.
सायकल मिळाल्यामुळे कैलास गवळी यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. ही सायकल मिळाल्यामुळे आता कैलास गवळी यांना स्वतःच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी थोडेसे का होईना, स्वावलंबी होण्याचा आधार मिळाला आहे.