shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयसीसी स्पर्धा जिंकून सलग दुसऱ्या प्रारूपातून रोहित निवृत्त होणार ?


              चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या लढतीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे प्रारूपातील आपल्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो. दीर्घकाळ एक कुशल फलंदाज आणि कर्णधार म्हणून भारतीय संघाला सेवा देणाऱ्या रोहित शर्मासाठी ही शेवटची मर्यादित षटकांची आयसीसी स्पर्धा असू शकते.  भारत या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.  हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत अपराजित राहिली आहे.  जर भारत ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला, तर महेंद्रसिंग धोनीनंतर एकापेक्षा जास्त आयसीसी स्पर्धा जिंकणारा हिटमॅन हा दुसरा भारतीय कर्णधार ठरेल. रोहित शर्मा निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्याशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय जाहिर करू शकतो.

       रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता.यानंतर रोहित आणि विराट कोहली यांनी खेळाच्या सर्वात लहान प्रारूपात निवृत्ती घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित असा निर्णय घेऊ शकतो आणि सामन्याच्या निकालाची त्यात कोणतीही भूमिका राहणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितकडूनच अधिकृत माहिती येईल.
       भारतीय क्रिकेटमध्ये असे दिसून आले आहे की निवडकर्ते कोणत्याही मोठ्या खेळाडूच्या भविष्याबाबत निर्णय घेत नाहीत, उलट खेळाडू स्वत: बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबद्दल बोलतात.  भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर कर्णधार रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतो पण निवृत्तीबाबतचे प्रश्न टाळण्यासाठी तो अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला आला नाही हे समजण्यासारखे आहे. त्याच्या जागी उपकर्णधार शुभमन गिलने पत्रकारांना संबोधित केले आणि सांगितले की कोणत्याही खेळाडूच्या निवृत्तीबाबत ड्रेसिंग रूममध्ये कोणतीही चर्चा सुरू नाही. यावर गिल म्हणाला, आम्ही याबाबत बोललो नाही.  आमची सर्व चर्चा फक्त सामना जिंकण्यावर झाली आहे आणि आम्हाला फक्त हा सामना जिंकायचा आहे. 
           रोहितने या विषयावर केवळ माझ्याशीच नाही तर संघात कुणाशीही चर्चा केली आहे.  मला वाटते की रोहितही फक्त फायनल जिंकण्याचा विचार करत आहे.  उपकर्णधार गिल म्हणाला, मला वाटते की रोहित प्रथम चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यावर भर देत आहे.  सामना संपल्यानंतर तो याबाबत निर्णय घेऊ शकतो, पण मी संघातील कोणाकडूनही याबाबत काहीही ऐकले नाही. 
        पीटीआयच्या वृत्तानुसार, कोहली आणि रोहित वनडेतून एकत्र निवृत्त होणार नाहीत हे निश्चित आहे.  टी-२० विश्वचषकानंतर हे घडले कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या फॉरमॅटमध्ये साध्य करण्यासाठी त्याच्याकडे दुसरे काहीही शिल्लक नव्हते.  जर आपण इतर फॉरमॅटबद्दल बोललो तर कोहलीची नजर कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्यावर आहे.  त्याचे समकालीन फलंदाज स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विल्यमसन यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.  कसोटी क्रिकेटपटू म्हणून कोहली यापुढे खेळणार हे निश्चित आहे आणि यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात त्याची गरज भासणार आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगल्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे सिडनी येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलेल्या रोहितबाबतही असेच म्हणता येणार नाही.
       रोहित वनडेतून निवृत्त होऊन कसोटी क्रिकेटमध्ये कायम राहील, की घरच्या भूमीवर एकदिवसीय सामने खेळून त्याला अलविदा करण्याची संधी दिली जाईल, याचे उत्तर भविष्यात दडलेले आहे पण भारताचे भविष्यातील वेळापत्रक पाहिल्यास डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला घरच्या मैदानावर एकही वनडे सामना खेळावा लागणार नाही.  याचा अर्थ असा होईल की जर भारतीय कर्णधार बांगलादेशातील एकदिवसीय मालिका, श्रीलंकेतील आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळला नाही तर त्याला ९ मार्चनंतर पुढील एकदिवसीय सामने डिसेंबरमध्येच खेळण्याची संधी मिळेल.  २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तो संघात राहणार नाही, असे रोहितला वाटत असेल, तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर या फॉरमॅटमध्ये खेळत राहील का?  या प्रश्नाचे उत्तर रविवारी बऱ्याच अंशी स्पष्ट होईल. 
       रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत ५५ एकदिवसीय सामने खेळले असून ४१ जिंकले आहेत.  या कालावधीत, संघाने बारा सामने गमावले आणि एक सामना टाय अनिर्णित राहिला.  राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ७९ सामने खेळले आणि ४२ जिंकले.  अशा परिस्थितीत रोहित शर्माला द्रविडची बरोबरी करण्याची संधी आहे.  रोहितला भारताचा पाचवा सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याचीही संधी आहे.
       जर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेतेपद मिळवून देऊन रोहित निवृत्त झाला तर टी२० पाठोपाठ वनडेमध्येही देशाला आयसीसी करंडकाचा विजेता बनवून निवृत्त होणारा रोहित जगातला पहिला विश्वजेता कर्णधार असेल व तो तहहयात विश्वविजेता म्हणूनच गणला जाईल.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close