प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील वरपगाव संत श्री नागेशपुरी महाराज,संत श्री रामकृष्ण महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. पूर्वीपासूनच पंचक्रोशीमध्ये गावातील युवकांनी आपल्या बौद्धिक क्षमता विविध क्षेत्रांमध्ये दाखवलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व असो, वकील क्षेत्रामध्ये गल्लीपासून दिल्ली पर्यंत गावातील कार्यरत विधीज्ञ असो, तसेच शहरी भागातून संस्थेचे जाळे निर्माण करणारे युवक, व्यवसायामध्ये गरुड भरारी घेणारे व्यावसायिक, नोकरीमध्ये आपली वेगळी छाप सोडणारे नोकरदार असोत,सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक असोत असे विविध क्षेत्रांमध्ये अनेक जणांनी आपला वेगळा ठसा निर्माण करुन वरपगाव चे नाव विविध क्षेत्रात मोठे केले आहे.
आज लागलेल्या एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेच्या निकालात गावातीलच चि .हर्षवर्धन प्रवीण देशमुख,कुमारी रिचा बालासाहेब देशमुख,कु. रेश्मा संतोष देशमुख यांनी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होऊन मोठे यश संपादन केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हे तीनही विद्यार्थी यांनी विविध ठिकाणच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे.
हर्षवर्धन चे वडील जय भवानी कन्या प्रशाला चे मुख्याध्यापक असून रेशमाचे वडील कृषी सेवा केंद्राचे मालक आहेत तसेच रिचा चे वडील स्टेशनरी व्यवसायात आहेत. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या पालकांच्या पाल्यांनी उल्लेखनीय संपादन केले आहे.
वरील मुलांनी यश मिळवल्यानंतर ग्रामपंचायत वरपगाव गावच्या वतीने उपसरपंच ऍड बाबुराव देशमुख तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावकरी यांच्यावतीने विद्यार्थी व पालकांचे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या त्यांनी आपल्या आयुष्यात गोरगरीब जनतेची सेवा करावी अशी अपेक्षा गावातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.
वरपगावच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील या यशामुळे वरपगावच्या वैभवात निश्चितच भर पडली आहे.

