फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट महिलांना देणार प्रेरणा -प्रकाश थोरात
नगर (प्रतिनिधी)- देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित फुले हा चित्रपट स्त्रियांना नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा चित्रपट सरकारने टॅक्स फ्री करावा व देशभरातील लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा, अशी मागणी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांनी केली आहे.
प्रकाश थोरात म्हणाले की, जगातील दुःख स्त्री-पुरुष विषमतेतून निर्माण झाले आहे. ही विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले. दीडशे वर्षांपूर्वीच त्यांनी स्त्री व दलितांच्या शिक्षणासाठी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा पाया घातला.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि वाचनालयांचे जाळे उभारले. 1854 मध्ये त्यांनी देशातील साक्षरता अभियानाची सुरुवात केली. विधवांच्या संगोपनासाठी 1863 मध्ये स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना करून हुंड्याशिवाय विवाहाची प्रथा रूढ केली. अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून जातिभेदाच्या विरोधात पहिले पाऊल उचलले. त्यांनी बालविवाह विरोधात आवाज उठवला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला प्रतिष्ठा दिली. स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह घडवून आणत जाती निर्मूलनाच्या चळवळीला स्वतःच्या घरातून सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कार्याची गाथा फुले या चित्रपटात मांडली असून, तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे प्रकाश थोरात यांनी सांगितले. या चित्रपटातून आजच्या महिलांना प्रेरणा व आत्मविश्वास वाढवणारी दिशा मिळेल आणि समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला नवे बळ मिळेल, असेही ते म्हणाले.