वेगवान गोलंदाज आवेश खानच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सचा दोन धावांनी पराभव केला. शनिवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एडन मार्कराम आणि आयुष बडोनी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावा केल्या, पण प्रत्युत्तरात राजस्थानला २० षटकांत ५ बाद १७८ धावाच करता आल्या. चालू मोसमातील लखनौचा हा पाचवा विजय आहे. आता ते दहा गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे राजस्थानची आठ पैकी सहा सामने गमावल्याने आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जयस्वाल आणि चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशी यांनी सलामीच्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या. एडन मार्करामने सूर्यवंशीला पंतकरवी त्रिफळाचीत केले. तो २० चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३४ धावा करून बाद झाला. त्याने कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर शार्दुल ठाकूरने नितीश राणाला तंबूचा रस्ता दाखविला. त्याने केवळ आठ धावा केल्या. त्यानंतर जयस्वाल ने रियान परागसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या.
अठराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आवेश खानने जयस्वालला त्रिफळाचित केले. ५२ चेंडूत ७४ धावा करून तो बाद झाला. याच षटकात आवेशने रियानलाही ३९ धावांवर पायचित केले. डावाच्या शेवटच्या षटकात विजयासाठी आर आरला नऊ धावांची गरज होती, पण आवेश खानने शिमरॉन हेटमायरला बाद करून त्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. ध्रुव जुरेल आणि शुभम दुबे अनुक्रमे सहा आणि तीन धावांवर नाबाद राहिले. लखनौकडून आवेशने तीन तर शार्दुल आणि मार्करामला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
याआधी या सामन्यात लखनौची सुरुवात खराब झाली होती. जोफ्रा आर्चरने मिचेल मार्शला बाद केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर संदीप शर्माने निकोलस पूरनला ११ धावांवर पायचित केले. त्याचवेळी कर्णधार रिषभ पंत पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने अवघ्या तीन धावा केल्या.
यानंतर एडन मार्कराम आणि आयुष बडोनी यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ४९ चेंडूत ७६ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान मार्करामने ४५ चेंडूत ६६ तर बडोनीने ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्यानंतर अब्दुल समदची बॅट डेथ ओव्हर्समध्ये गरजली, त्याने तिनेशच्या स्ट्राइक रेटने १० चेंडूत ३० धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने एकूण २७ धावा केल्या. डेव्हिड मिलर सात धावांवर नाबाद राहिला.
याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली. यासह तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. दुखापतीमुळे खेळत नसलेल्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या जागी त्याचा अंतिम संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने वयाच्या १४ वर्षे २३ दिवसात पदार्पण केले. या बाबतीत, त्याने १६ वर्षे आणि १५७ दिवसांच्या वयात पदार्पण केलेल्या रे बर्मनला मागे सोडले. वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने विद्यमान सत्रासाठी साठी गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात १.१० कोटी रुपयांना विकत घेतले होते. या खेळाडूची मूळ किंमत ३० लाख रुपये होती आणि तो त्याच्या मूळ किमतीच्या जवळपास चौपटीने विकला गेला. आयपीएल लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. बिहारच्या वैभवने वयाच्या १३ वर्षे आणि २४२ दिवसांत आयपीएल लिलावासाठी निवडलेला सर्वात तरुण खेळाडू म्हणून इतिहास रचला.
सूर्यवंशीचा क्रिकेट प्रवास वयाच्या नऊव्या वर्षी सुरू झाला, जेव्हा त्याला त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांच्याकडून प्राथमिक प्रशिक्षण मिळाले. त्याच्या वडिलांची क्रिकेटची आवड आणि त्याच्या स्वतःच्या समर्पणामुळे वैभवने इतक्या लहान वयात उल्लेखनीय यश मिळविले, ज्यामुळे तो भारतीय क्रिकेटमधील एक आशादायक प्रतिभा बनला.
वैभव हा तोच फलंदाज आहे ज्याने वयाच्या अवघ्या १२ वर्षे २८४ दिवसांत रणजी ट्रॉफीत २०२४ मध्ये पदार्पण केले होते. अशी कामगिरी करणारा तो चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला. सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंचे रेकॉर्ड त्याने मोडले. सचिन लहान वयातच रणजी क्रिकेटमध्ये मोठे नाव बनला होता व त्याने भारतीय युवा संघातही स्थान मिळवले होते.
राजस्थानसाठी ही चांगली बाब ठरत असताना त्यांना या सत्रात सहाव्या पराभवाचा स्विकार करावा लागला. तोही अशा वेळेस की, त्यांचा विजय निश्चित होता. या सामन्यात केवळ दोन धावांनी तर मागच्या सामन्यात दिल्लीविरूध्द मुळ सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. त्यातही महत्वाची बाब म्हणजे राहुल द्रविड व विक्रम राठोड सारखे दर्जेदार फलंदाज जे भारताचे अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक व फलंदाजी कोच राहिले आहेत. त्यांच्या कालखंडात संघ शेवटच्या निर्णायक टप्प्यात धावांसाठी मोताज होताना दिसत आहे. पर्यायाने जिंकलेले सामने त्यांच्या हातून निसटत आहे. तेंव्हा नाईलाजाने म्हणावेसे वाटते की, जिंकलेला सामना कसा हरावं हे राजस्थानकडून शिकावं.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.