नगर / प्रतिनिधी:
२६ जानेवारी १९५० ला भारतात संविधान लागू झालं आणि भारतीय समाजाला माणूस म्हणून जगण्याची हमी मिळाली असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत साथी सुभाष वारे यांनी केले.
नगर शहरातील प्रबुद्धनगर, विद्या कॉलनी, कल्याण रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
संविधानाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेताना ते म्हणाले की ज्यांना संविधानाची खरी ताकद कळालेली आहे तोच ठराविक वर्ग संविधानाला विरोध करत आहे, कारण त्यांच्या विशेष अधिकाराला बाधा येत आहे. म्हणूनच संविधानामुळे ज्यांना माणूस म्हणून जगण्याची हमी मिळाली त्या शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया, मजूर या सर्वांनीच संविधानाचे रक्षण करण्यासाठी जागृत असलं पाहिजे.
या कार्यक्रमांमध्ये २०२५ चा प्राचार्य रवींद्र पटेकर स्मृती संघर्षशील कार्यकर्ता पुरस्कार श्रीगोंदा येथील ज्येष्ठ नेते ऍड. संभाजीराव बोरुडे यांना प्रदान करण्यात आला. स्मृतीशेष प्राचार्य रवींद्र पटेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि वंचित शोषित वर्गांसाठी समर्पित केले होते. अतिशय गरीब कुटुंबातून पुढे येऊन संघर्ष करीत नगर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा खंदा नेता म्हणून प्राचार्य रवींद्र पटेकर यांनी काम केले.
सत्काराला उत्तर देताना ऍड. संभाजीराव बोरुडे यांनी पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून बहुजन समाजातील अंधश्रद्धा आणि अमानुष रूढी-परंपरा यावर प्रहार केला. दगड धोंड्याच्या देवापेक्षा ज्यांनी शोषणापासून मुक्ती दिली ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले खरे देव आहेत असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस् कॉलेज, पारनेर येथील प्रा. डॉ. हनुमंतराव गायकवाड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य विलास साठे सर यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय कॉम्रेड महेबूब सय्यद यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. शरद मेढे यांनी केले तर प्रकाश मेढे यांनी आभार मानले. मानपत्राचे वाचन आयु. मालती जाधव यांनी केले. यावेळी सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने रक्तगट तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आदर्श शिक्षक संतोष ढगे व त्यांचे बंधू मच्छिंद्र ढगे यांचा भीमगीतांचा सुरेल कार्यक्रम झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.एल बी जाधव, गवराम कदम, माजी मुख्याध्यापक विजय कदम, भाऊसाहेब आव्हाड, डॉ. सुरेखा गांगुर्डे, सोनाली देवढे-शिंदे, सुनील गुंजाळ, मधुकर थोरात, राजकुमार शिंदे, प्रा.अमन बगाडे , डाॅ. ऋषिकेश उदमले, डाॅ.बापू चंदनशिवे ,पवार सर.उघडे सर, हर्षदीप मेढे, आदित्य साळवे, उत्कर्ष साठे, हर्षल दावभट ,सरमद सय्यद , कुंडलीक अरवडे आदिंनी परिश्रम घेतले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111