shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रंगतदार आयपीएल दुसऱ्या पर्वात आणखी रोचक ठरणार ?



                अठराव्या आयपीएल सत्राचा दुसरा टप्पा १७ मे पासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे तो एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. तथापि, जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगच्या पुनरागमनाबद्दल चाहते उत्सुक आहेत. गुजरात टायटन्स संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर, आरसीबी दुसऱ्या स्थानी असून पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुरुवातीच्या सामन्यात मागे पडल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने जबरदस्त पुनरागमन केले, सध्या ते पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. याचे श्रेय संघाचा सलामीवीर रोहित शर्मालाही जाते, ज्याने पहिल्या पाच सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले आणि गेल्या पाच सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकविली. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये मुंबईच्या कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर रोहितने बऱ्यापैकी धावा केल्या आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की कर्णधारपद सोडल्यापासून त्याची सरासरी आणि स्ट्राइक रेट वाढला आहे. 

                सन २०१७ ते २०२३ पर्यंत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना, रोहितने १०० डावांमध्ये २४.६ च्या सरासरीने आणि १२७.४ च्या स्ट्राईक रेटने २३३७ धावा केल्या. या काळात त्याने १३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. त्याच वेळी, त्याने ९४ षटकार मारले. सन २०२४ पासून आतापर्यंत रोहितने २५ डावांमध्ये ३१.१७ च्या सरासरीने आणि १५०.९ च्या स्ट्राईक रेटने ७१७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने ४० षटकारही मारले आहेत. म्हणजे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्यावरील दबाव कमी झाला आहे आणि तो मुक्तपणे फलंदाजी करत आहे. या आयपीएलमध्ये मुंबई संघ त्याचा वापर एक प्रभावशाली खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) म्हणून जास्त करत आहे आणि त्याचा त्याला फायदा झाला आहे. तो मैदानावर क्षेत्ररक्षण करताना थकत नाही आणि फलंदाजी करताना त्याची ऊर्जा वापरतो. 

                रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने सन २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये जेतेपद पटकविले आहे. तथापि सन २०२४ मध्ये मुंबई संघ व्यवस्थापनाने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवले. गेल्या वर्षी मुंबईची कामगिरी खूपच खराब होती. मात्र या वर्षी संघाची कामगिरी चांगली होत आहे. रोहितने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने गेल्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. लीग स्पर्धापैकी तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आता तो भारताकडून फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. 

                    गुजरात टायटन्सने सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ मध्ये एक अद्भुत विक्रम केला आहे. त्यांच्या तीन फलंदाजांनी या हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जो आयपीएलच्या इतिहासात पहिलाच प्रसंग आहे. याआधी, एकाच फ्रँचायझीच्या दोन खेळाडूंनी ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे असे अनेक वेळा घडले आहे, परंतु गुजरातच्या शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोश बटलर यांनी सर्वांना मागे टाकत एक नवीन विक्रम रचला आहे.

                  कर्णधार गिलने ११ डावात ५०८ धावा केल्या आहेत तर त्याचा सलामीचा जोडीदार साई सुदर्शनने ५०९ धावा केल्या आहेत आणि तो स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच जोश बटलरने ११ डावांमध्ये ५०० धावा केल्या आहेत आणि या हंगामात तो पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या तिघांच्या उत्कृष्ट फलंदाजी कामगिरीमुळे, गुजरात सध्या ११ सामन्यांत १६ गुणांसह आघाडीवर आहे. नेट रन रेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांच्या मागोमाग आहे. या हंगामात गुजरात संघ त्यांच्या शेवटच्या तीन लीग सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सशी खेळणार आहे. जीजीला उर्वरित सामने जिंकून टॉप २ मध्ये स्थान मिळविण्याची आशा असेल, ज्यामुळे त्यांना ३ जून रोजी होणाऱ्या आयपीएल फायनलसाठी पात्र ठरण्याच्या दोन संधी मिळतील.

                  दरम्यान गुजरातला मोठा धक्का बसेल कारण, बटलर इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे उपलब्ध राहणार नाही. त्याच्या जागी कुसल मेंडिसची निवड होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या या आंतरराष्ट्रीय खेळाडूने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळला होता, त्याने पाच डावांमध्ये १६८.२३ च्या स्ट्राईक रेटने १४३ धावा केल्या होत्या. मेंडिस त्याच भूमिकेत चपखल बसत असल्याने, जीटी व्यवस्थापन त्याला आणण्यास उत्सुक आहे,  परंतु त्याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. आयपीएल प्लेऑफपूर्वी कागिसो रबाडा देखील फ्रँचायझी सोडेल, परंतु जेराल्ड कोएत्झी उपलब्ध असल्याने संघाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मा संघात आहेतच.

                   मिचेल ओवेन इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी पंजाब किंग्ज मध्ये सामील झाला आहे. बोटाच्या फ्रॅक्चरमुळे ग्लेन मॅक्सवेल स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर पंजाबने ओवेन या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूला ३ कोटी रुपयांना जोडले. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मधील त्याच्या वचनबद्धता पूर्ण केल्यानंतरच ओवेन पंजाब संघात सामील होईल असे आधी सांगण्यात आले होते. तो बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीचा भाग होता. पण २३ वर्षीय खेळाडूने पीएसएल अर्ध्यावर सोडले आहे, तर झल्मीला अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. आयपीएल आणि पीएसएल दोन्ही स्पर्धा १७ मे रोजी पुन्हा सुरू होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सीमापार तणावामुळे या दोन्ही लीग मध्यंतरी थांबविण्यात आल्या होत्या.


                   बिग बॅश लीग २०२४-२५ मधील  प्रभावी कामगिरीनंतर ओवेन प्रसिद्धीच्या झोतात आला. होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. ओवेनने अंतिम सामन्यात ३९ चेंडूत शतकही केले. त्याच्या खेळीमुळे हरिकेन्सने डेव्हिड वॉर्नरच्या सिडनी थंडरचा पराभव करून त्यांचे पहिले बीबीएल विजेतेपद जिंकले. ओवेनने ४२ चेंडूत सहा चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या. या शतकाच्या जोरावर हरिकेन्सने ३५ चेंडू शिल्लक असताना १८३ धावांचे लक्ष्य गाठले. २०२५ च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये, ओवेनने पेशावर झल्मीसाठी सात डावांमध्ये १४.५७ च्या सरासरीने आणि १९२.४५ च्या स्ट्राईक-रेटने १०२ धावा केल्या.

                  पंजाबला प्ले ऑफ मध्ये स्वतःचे स्थान निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. सध्या गुणांकणात तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रेयस अय्यरच्या संघाचा पुढील सामना रविवार, १८ मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सशी होईल. पंजाबने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यातील ७  जिंकले आहेत. पंजाबला ३ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे आणि १ सामना अनिर्णीत राहिला आहे. पंजाबचे सध्या १५ गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +०.३७६ आहे.

                 आयपीएलचा नियोजित कार्यक्रम भारत - पाक युध्दामुळे लांबला असल्याने काही परदेशी खेळाडू आपापल्या राष्ट्रीय संघांच्या सेवेसाठी जात असल्याने शेवटच्या टप्प्यात ते आयपीएलमध्ये दिसणार नाही. मात्र त्यांचे संघ नवीन शिलेदारांना घेऊन आपला मोर्चा पुढे चालू ठेवणार आहे. प्रत्येक संघाची नव्याने बांधणी झाली असल्याने दुसऱ्या पर्वात वेगळा खेळ बघायला मिळून गुणतालिकेत उलथापलथ होऊ शकते. त्यामुळे आधीच रंगतदार ठरत असलेली आयपीएल आणखीच रोचक ठरू शकते.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close