shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सनरायझर्सने केला लखनौच्या आयपीएल मोहिमेचा अस्त

       सनरायझर्स हैद्राबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा गडी राखून पराभव केला आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता दाखविला. अशाप्रकारे रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला पाचवा संघ बनला. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्या नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत सात गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैद्राबादने १८.२ षटकांत चार बाद २०६ धावा केल्याव सामना जिंकला. त्यांच्याकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ५९ धावा केल्या. लखनौकडून दिग्वेश राठीने दोन तर विल्यम ओ'रोर्क व शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक बळी मिळविला.

                 लक्ष्याचा पाठलाग करताना हैद्राबादने या सामन्यात धक्कादायक सुरुवात केली. अथर्व तायडे १३ धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माने ईशान किशनसह डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ८२ धावांची भागीदारी झाली. २० चेंडूत ५९ धावा करून अभिषेक बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने दिग्वेश राठीकरवी झेलबाद केले.  त्यानंतर ईशान किशनला हेन्रिक क्लासेनची साथ मिळाली. दोघांनीही काही चांगले फटके मारले आणि ४१ धावा जोडल्या. किशन २८ चेंडूत ३५, तर क्लासेन ४७ धावा काढून बाद झाले. दरम्यान, कामिंदू मेंडिस ३२ धावा काढून रिटायर्ड हर्ट झाला. तो हॅमस्ट्रिंगशी झुंजत असल्याचे दिसून आले. अनिकेत वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी प्रत्येकी पाच धावांवर नाबाद राहिले.

                 त्याआधी, मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी स्फोटक फलंदाजी करून लखनौला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ११५ धावांची भागीदारी झाली, ती हर्ष दुबेने मोडली. त्याने मार्शला ३९ चेंडूत ६५ धावांवर बाद केले. दरम्यान हर्षल पटेलने मार्करमला त्रिफळाचित केले. तो ३८ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकविले. लखनौकडून निकोलस पूरनने ४५ धावा केल्या तर कर्णधार रिषभ पंतची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. त्याने फक्त सात धावा केल्या. आयुष बदोनी तीन, अब्दुल समद तीन आणि शार्दुल ठाकूर चार धावा करून बाद झाले. तर, आकाश दीप सहा धावांवर नाबाद राहिला आणि रवी बिश्नोई खाते न उघडताच नाबाद परतला. हैद्राबादकडून ईशान मलिंगाने दोन तर हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

                  सनरायझर्स हैद्राबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठी यांच्यात मैदानावर चकमक झाली. खरंतर अभिषेकला बाद केल्यानंतर दिग्वेशने नोटबुक सेलिब्रेशन केले, जे अभिषेकला आवडले नाही. तंबूत परतण्यापूर्वी तो दिग्वेशकडे गेला आणि त्याचा राग व्यक्त केला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. मात्र, कर्णधार रिषभ पंत आणि पंचांनी येऊन दोघांना वेगळे केले आणि प्रकरण शांत केले. 

                   दिग्वेश राठीने हैद्राबादला दुसरा धक्का देत अभिषेक शर्माला आपला बळी बनवले. अभिषेक चांगली फलंदाजी करत होता आणि त्याने अर्धशतक ठोकले असता दिग्वेशच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरने त्याला झेलबाद केले. अभिषेकने त्याच्या डावात २० चेंडू खेळले आणि चार चौकार आणि सहा षटकार मारले. तथापि, अभिषेकला बाद केल्यानंतर दिग्वेशने पुन्हा एकदा अगोदरच वादग्रस्त ठरलेले नोटबुक सेलिब्रेशन केले. यापूर्वी त्याला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. दिग्वेशच्या या कृत्यामुळे अभिषेक खूप संतापलेला दिसत होता. दिग्वेशही रागाने अभिषेककडे धावला आणि त्याला डग आऊटमध्ये परतण्याचा इशारा करू लागला. मैदानावरील पंच आणि लखनऊच्या इतर खेळाडूंनी दोघांनाही वेगळे केले, त्यानंतर अभिषेक परत गेला. कदाचित या घटनेनंतर बीसीसीआय राठीवर शिस्तभंगाची कारवाई करेल.

                 लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतचा आयपीएल २०२५ मध्येही वाईट काळ सुरूच आहे. सोमवारी सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध ६ चेंडूत सात धावा काढून तो बाद झाला.  ईशान मलिंगाने स्वतःच्याच गोलंदाजीवर एक शानदार झेल घेत पंतचा डाव संपविला. रिषभ पंत एकेरी धावसंख्येवर बाद होऊन एका अवांछित क्लबचा भाग बनला. पंत आयपीएल २०२५ मध्ये सातव्यांदा एकेरी अंकात बाद झाला आणि एका हंगामात सर्वाधिक वेळा सिंगल डिजीटमध्ये बाद होणारा चौथा कर्णधार बनला.

                आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा सिंगल डिजिटमध्ये बाद होण्याचा विक्रम इऑन मॉर्गनच्या नावावर आहे. २०२१ च्या हंगामात, कर्णधार मॉर्गन ११ वेळा एकेरी अंकात बाद झाला. या यादीत गौतम गंभीर दुसऱ्या स्थानावर आहे, जो २०१४ च्या हंगामात ८ वेळा एकाच अंकात बाद झाला.

                कर्णधार म्हणून आयपीएल हंगामात एकेरी धावसंख्येवर  बाद होण्याचे सर्वाधिक होणारे खेळाडू असे आहेत. ओएन मॉर्गन (२०२१) -११ वेळा, गौतम गंभीर (२०१४) - आठ वेळा. रोहित शर्मा (२०१७) - आठ वेळा. रिषभ पंत (२०२५) - ७ वेळा, रोहित शर्मा (२०२३) -सात वेळा, अ‍ॅडम गिलख्रिस्ट (२०१०) -सात वेळा,  ब्रेंडन मॅक्युलम (२००९) -सात वेळा.

                सर्वाधिक तब्बल २७ कोटींना खरेदी केलेल्या रिषभ पंतने त्याच्या आयपीएल इतिहासातील चालू हंगामात सर्वात वाईट कामगिरी केली. तो आयपीएल २०२५ मध्ये सात वेळा एकेरी अंकात बाद झाला. याआधी त्याची सर्वात वाईट कामगिरी २०१७ मध्ये होती, जेव्हा तो ६ वेळा एकेरी अंकात बाद झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये पंत पाच वेळा अशा प्रकारे बाद झाला होता. 

               रिषभ पंतची बॅट कदाचित शांत राहिली असेल, परंतु सोमवारी विद्यमान आयपीएलच्या ६१ व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळविले. सनरायझर्सने एवढी मोठी धावसंख्या लिलया पार करून स्वतःची साख राखणारा विजय मिळविला.  पण स्पर्धेतून बाद होणाऱ्या संघात स्वतः सोबत लखनौलाही ओढून घेतले. यामुळे मुंबईच्या मार्गातला एक काटा सहज कमी झाला. गुजरात, पंजाब, बंगळुरू यापूर्वीच प्ले ऑफ मध्ये पोहोचले हे आपणास ज्ञान असेलच.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close