shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२० वर्षांच्या रितेश खजिनदारचा बळी आणि अजून किती?अहिल्यानगर–शिर्डी–मनमाड राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा..?

देहरे | प्रतिनिधी
“फक्त गृपवर गप्पा मारण्यापेक्षा मैदानात या…” असा थेट इशारा देत देहरे परिसरात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कारण आहे – अहिल्यानगर–शिर्डी–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट, अर्धवट व मृत्यू ओढवणाऱ्या रस्त्यामुळे गेलेला आणखी एक निष्पाप जीव.
देहरे (ता. अहिल्यानगर) येथील रितेश चंद्रकांत खजिनदार (वय २०) हा अत्यंत हुशार, आध्यात्मिक विचारांचा, देशप्रेम व धर्मप्रेमावर विश्वास ठेवणारा तरुण आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा विद्यार्थी या भंगार महामार्गाचा बळी ठरला.
हा अपघात नाही, हा व्यवस्थेचा खून आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

🚧 ५ वर्षे काम सुरू, पण रस्ता कधी पूर्ण?
अहिल्यानगर–शिर्डी–मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू असल्याचे कागदावर दिसते, मात्र प्रत्यक्षात रस्ता आजही जीवघेणा आहे.
आजपर्यंत तीन ठेकेदारांनी अर्धवट काम करून पळ काढला, तर प्रत्येक वेळी केवळ डागडुजी करून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
📌 नागरिकांच्या म्हणण्यानुसार –
दहा वर्षांत २००० पेक्षा अधिक नागरिकांनी या महामार्गावर प्राण गमावले
तीन ते चार वेळा टेंडर प्रक्रिया
चार वेळा मोठा निधी खर्च
रस्ता मात्र कधीच पूर्ण नाही
खोदकाम करून रस्ता सोडून दिला जातो
निकृष्ट दर्जाचे साहित्य, शून्य देखरेख
आज ₹२५०० कोटींच्या निधीची चर्चा सुरू आहे, मात्र कामाची गुणवत्ता पाहता पुन्हा सहा महिन्यांत हीच परिस्थिती निर्माण होणार हे स्पष्ट दिसत आहे.
⚠️ रितेश एकटाच नाही – पुढचा नंबर कुणाचा?
आज रितेश गेला…
काल कोणी तरी गेला…
उद्या आपल्यापैकी कुणाचाही नंबर लागू शकतो, ही भीषण वस्तुस्थिती आहे.
या महामार्गावर तरुण-तरुणी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी रोज अपघातात मृत्युमुखी पडत आहेत.
मात्र जबाबदारी कुणाची?
ठेकेदार?
अभियंते?
लोकप्रतिनिधी?
की फक्त मृत नागरिक?

आंदोलनाचा इशारा – देहरे येथे रस्ता रोको
या पार्श्वभूमीवर देहरे (ता. अहिल्यानगर) येथे ३० डिसेंबर २०२५ रोजी रस्ता रोको आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.
या आंदोलनाला अनेक गावांतील ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा मिळत असून, ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण परिसराची लढाई असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिकांची ठाम भूमिका आहे —
“हे आंदोलन राजकारणासाठी नाही,
तर पुढचा रितेश वाचवण्यासाठी आहे.”

📣 थेट मागणी – दिल्लीपर्यंत आवाज जाणार!
संतप्त नागरिकांनी खालील ठोस मागण्या केल्या आहेत :
महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा
जबाबदार अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा
मृतांच्या कुटुंबांना योग्य भरपाई द्या
कायमस्वरूपी, दर्जेदार रस्ता तयार करा
🕯️ रितेशच्या मृत्यूने प्रशासन जागं होणार की अजून बळी हवेत?
हा प्रश्न आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा विचारतो आहे.
जय हिंद 🇮🇳
ही पाळी कोणावरही येऊ नये – म्हणूनच हे आंदोलन!
०००
close