अवकाळी पावसाने व पुराने नुकसानग्रस्त पिकांचे व मालमत्तांचे पंचनामे करून भरपाई द्यावी- हर्षवर्धन पाटील
-जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी चर्चा
इंदापूर : प्रतिनिधी दि.25/5/25
इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी (दि.25) झालेल्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने शेती पिकांचे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच नीरा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे, फळबागांचे व मालमत्तांचे तात्काळ पंचनामे सुरु करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.25) केली. या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी रविवारी संपर्क साधून चर्चा केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील भिगवण, सणसर परिसरातील सुमारे 12 ते 15 गावांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये जांब, कुरवली, चिखली, सणसर, उद्धट, लाकडी, निंबोडी, शेटफळ गढे, मदनवाडी, भिगवण, भिगवन स्टेशन आदी गावांसह आणि निरा नदीकाठच्या पूरग्रस्त गावांचा समावेश आहे. या सर्व परिसरातील नागरिकांच्या राहत्या घरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे 200 ते 250 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेती पिके, फळबागा, घरे व मालमत्तांचे पंचनामे हे कृषी, महसूल, ग्रामविकास खात्याने तातडीने पूर्ण करावेत, एकही शेतकरी पंचनाम्या पासून वंचित राहू नये, अशी सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस द्राक्षे, डाळिंब, केळी, पेरू आदी या फळबागांचे तसेच मका, कांदा, भुईमूग, चारा पिकांसह शेतातील इतर सर्व उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावातील शेतातील माती वाहून गेली आहे, तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे सरकारने विना विलंब पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
सदरच्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पुलांची हानी झाली आहे, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच शेतातील अनेक ठिकाणची माती वाहून गेली आहे, त्याचप्रमाणे पशुधनाचे नुकसान झाले आहे. या सर्वांचेही पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, नीरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांमधील लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. तसेच जनतेला काही अडचण आल्यास माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
_____________________________