शहरातील सलोखा कायम राहण्यासाठी प्रार्थना करण्याचे यात्रेकरुंना आवाहन
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहर हे सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळून वसवलेले शहर आहे. या शहराच्या ज्या परंपरा जुन्या जाणत्या लोकांनी निर्माण केल्या,त्या जतन करण्याचे काम श्रीराम तरुण मंडळ गेली अनेक वर्ष करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षी देखील शहरातील जे मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जात आहेत त्यांना निरोप देण्याचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
श्रीराम मंदिर चौकात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते अहमदभाई जहागीरदार होते. यावेळी पत्रकार अनिल पांडे, माजी नगरसेवक नितीन पिपाडा, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, बुरहान भाई जमादार, संजय यादव, ॲड.आदेश दुशिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी सांगितले की, श्रीरामपूर शहरातील रामनवमी व उरूस एकत्र साजरा करण्याचा निर्णय शहराचे प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र महाराज उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहरातील प्रमुख लोकांनी घेतला आणि शहरांमध्ये सर्व धर्मीय सलोखा राहावा असे प्रयत्न आतापर्यंत सर्वांनीच केलेले आहे. तीच परंपरा पुढे राखत श्रीराम तरुण मंडळ सर्व धर्मीयांना सोबत घेऊन काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या वर्षी हज यात्रेला जाणारे श्रीराम तरुण मंडळाचे मार्गदर्शक,ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण व इतर सर्व सहकारी यांचा सत्काराचा व निरोपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
हज यात्रेला जाणाऱ्या सर्व भाविकांनी शहराच्या सलोख्यासाठी मक्का आणि मदिना येथे अल्लाह च्या दरबारात विशेष प्रार्थना करावी अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी श्रीराम तरुण मंडळ हे सर्वांना सोबत घेऊन शहरांमध्ये काम करीत आहे. शहराचा धार्मिक,शैक्षणिक, सामाजिक सलोखा राखण्याचे काम अशोक उपाध्ये व त्यांचे सर्व सहकारी करीत असतात. आजचा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे असे सांगून शहरातील सर्व धर्मीयांचा एकोपा वाढवणारा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व हज यात्रेकरुंच्या वतीने त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
अध्यक्षीय भाषणात अहमदभाई जहागीरदार यांनी शहराचे वातावरण अलीकडच्या काळात बदलत असले तरी सलोखा आणि एकता यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने श्रीरामपूरमध्ये सर्वांचा सलोखा कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करून हज यात्रेनंतर परत येणाऱ्यांनी सर्व संकेत पाळून जीवन जगावे असे आवाहन केले. पत्रकार अनिल पांडे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी हज यात्रेस जाणारे ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, मतीन शेख हैदराबाद वाले, माजी मुख्याध्यापक फारूक शाह, बेगु पटेल सर, माजी नगरसेवक सलीम शेख, फिरोज तांबोळी, रियाज अब्दुल पठाण,अंजर युसूफ पठाण, रफिक अल्लारखा मेमन, सोहेल मुसानी आदींचा मान्यवरांच्या हस्ते हाज यात्रेकरुंचा रुमाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री राजू सोनवणे, गौतम उपाध्ये, राजेंद्र उंडे, आयाज तांबोळी, राजेंद्र लचके, सोमनाथ चापानेरकर, रमाकांत पाथरकर, राजेंद्र पाटणी, सतीश शहाणे,जयराम उपाध्ये, विलास कुऱ्हे, अमोल भस्मे, शशिकांत कडुस्कर सर, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, रविंद्र कांबळे, नाजीम शेख, अमन मंसूरी, जाफरखान, अशोक गवारे, संजय यादव, मंजूर मलिक, अर्षद मलिक, मुस्ताक तांबोळी, दीपक कदम, जयश सावंत, सय्यद जाकीर सर, इजाज पठाण, जाफरखान आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक उपाध्ये यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111