जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
देशात २००५ ते २०१४ या काळात कोळसा खाणी घोटाळा प्रचंड गाजला होता. सी. ए. जी. च्या अहवालानुसार हा घोटाळा जवळजवळ १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा होता. यात अनेक मान्यवर विशेषतः तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील मोठे मंत्री, अधिकारी आणि व्यावसायिक गुंतले होते. हा घोटाळा उघडकीस आणणारे आणि या घोटाळ्यामुळे देशातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला पायउतार व्हायला लावणारे एक व्यक्तिमत्त्व होते, ते म्हणजे हंसराज अहिर.
नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात पोटापाण्यासाठी आलेले हंसराजभैय्या चंद्रपुरातच स्थिरावले आणि तिथेच राजकारणात सक्रिय झाले. २००४ मध्ये लोकसभेत आल्यावर त्यांनी कोळसा खाण घोटाळा शोधून काढला. त्यामुळे त्यांचे आणि पर्यायाने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशभरात झाले होते. अशा या लढाऊ पाण्याच्या व्यक्तिमत्वाचा माझा परिचय तर झालाच, आणि नियमित संबंधही आले, ते त्यांच्या या कोळसा घोटाळ्यावर पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने. ते संबंध आता चांगल्या मैत्रीत परिवर्तित झालेले आहेत.
२००४ पर्यंत केंद्रात भाजप नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता होती. २००४ मध्ये सत्ता परिवर्तन झाले. भाजप प्रमुख विरोधी पक्ष झाला. मग विदर्भातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वात एक समिती नेमली. जावडेकर दर महिन्यात विदर्भात यायचे. इथल्या समस्यांचा आढावा घ्यायचे आणि त्याचा केंद्रात पाठपुरावाही करायचे. त्यावेळी त्यांच्यासोबत हंसराज भैय्या सहकारी म्हणून राहत होते. जावडेकर प्रत्येक नागपूर भेटीत एक पत्रपरिषद घ्यायचे. त्यावेळी त्यांच्यासोबत भैय्या देखील असायचे. भैय्यांचा माझा परिचय तेव्हाच पहिल्यांदा झाला. हळूहळू परिचय वाढू लागला.
याच काळात त्यांनी त्यांना केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या सल्लागार समितीत काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी कोळसा खाण घोटाळा शोधून काढला. हा कोळसा घोटाळा म्हणजे प्रचंड हिमनग होता. भैय्यांना त्याचे एक टोक दिसले आणि ते हळूहळू खोलात जाऊ लागले. दरवेळी जावडेकरांसोबत होणाऱ्या पत्र परिषदांमध्ये ते त्याची माहिती देऊ लागले. आम्हा पत्रकारांसाठी इंटरेस्ट वाढू लागला.
२०१४ मध्ये देशात सत्ता परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. त्या मंत्रिमंडळात भैय्यांना रसायन आणि उर्वरक या खात्याचे राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. मग भैय्या स्वतंत्रपणे कार्यरत झाले. नागपुरातील राज्य आणि केंद्र शासनाचा संयुक्त उपक्रम असलेला महाराष्ट्र अँटिबायोटिक्स हा कारखाना बंद पडला होता. तो पुनरुज्जीवीत करण्यासाठी भैय्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र अजून तरी तो पुनरुज्जीवीत होऊ शकलेला नाही.
नागपूरच्या लाखे प्रकाशनने माझी काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. लाखे प्रकाशनचे चंद्रकांत लाखे यांची त्यामुळे माझी चांगलीच मैत्री झाली आहे. कधीतरी गप्पांमध्ये लाखेंना मी बोललो होतो की केंद्रात इतके घोटाळे होतात. एखाद्या घोटाळ्यावरच आता मला पुस्तक लिहायचे आहे. २०१६ मध्ये एक दिवस लाखेंचा मला फोन आला. कोळसा घोटाळ्यावर तुम्ही पुस्तक लिहिता का असा प्रश्न त्यांनी मला केला. मी लगेच होकार दिला. मग त्यांनी मला हंसराज भैय्यांचा संपर्क करून दिला. दोन दिवसांनीच भैय्या नागपुरात येणार होते. मग त्यांच्याशी फोनवर बोलून मी भैय्यांना रविभवन विश्रामगृहात भेटायला गेलो. यापूर्वी पत्र परिषदांमध्ये त्यांना अनेकदा भेटलो होतो. मात्र एकट्यात त्यांची माझी ती पहिलीच भेट होती. मी माझा परिचय करून देऊ लागलो, तर भैय्या लगेच मला म्हणाले "अविनाशजी मी तुम्हाला चांगला ओळखतो, आणि लाखे साहेबांचे तुमच्याबाबत माझे सविस्तर बोलणे झाले आहे”. मग त्यांनी मला बसवून घेतले. त्या दिवशी त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली आणि कामाला सुरुवात झाली? त्यांनी मला घोटाळ्यासंदर्भात काही माहिती देखील दिली. कोयला घोटाला संसार से संसद से सडक तक नामक भारतीय जनता पक्षाने प्रकाशित केलेली एक पुस्तिका देखील त्यांनी मला दिली. मग लवकरात लवकर काम पुढे कसे नेता येईल याचे नियोजन झाले.
नंतर दर आठवड्याला भैय्या नागपूरला आले की मी त्यांना रवी भवनला जाऊन भेटू लागलो. दुसऱ्या भेटीत मी साधारणतः पुस्तकाचे स्वरूप कसे असावे आणि त्यात काय काय मुद्दे चर्चेला घेतले जावे याचा आराखडा तयार करून नेला होता. त्यात पुस्तकाचे शीर्षक काय असावे त्यावरही विचार करून एक पाच सहा नावे प्रस्तावित केली होती. त्यावर चर्चा करून मी आणि भैय्यांनी "काळ्या कोळशाची काळी कहाणी" हे एक शीर्षक निश्चित केले. इतरही आराखड्यावर मग आमची चर्चा झाली आणि कामाला गती आली.
यासाठी लागणारी माहिती मिळवायची तर दिल्लीत जाऊन बसावे लागणार होते. तसे मी भैयांना बोलताच त्यांनी मला "तुम्ही कधी येता ते कळवा, पुढची सगळे व्यवस्था मी करतो" असे सांगून आश्वस्त केले. मी त्यांना माझ्या येण्याचा दिवस कळवताच लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन आला आणि त्या दिवशीचे माझे विमानाचे तिकीट बुक केले असल्याचे त्यांनी कळवले. दिल्लीच्या विमानतळावर पोहोचताच त्यांची कार माझ्या स्वागतासाठी आलेली होतीच. त्यांच्याच बंगल्यावर माझी निवासाची व्यवस्था केली होती.
दिल्लीच्या चार-पाच दिवसांच्या मुक्कामात दररोज सकाळी उठलो की मी ब्रश करून सोबत माझी कागदपत्रांची बॅग घेऊन भैय्यांच्या बंगल्यावरील ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन बसत असे. तिथेच मी चहा घ्यायचो. तोवर भैया देखील उठून आपल्या बेडरूम मधून बाजूच्याच ऑफिसच्या रूममध्ये येऊन बसलेले असायचे. त्या खोलीत ते आले की बेल वाजवून खानसाम्याला विचारायचे "ते नागपूरचे अविनाशजी उठले का?" मी बाहेर चहा घेत बसलो आहे असे त्यांना कळले की लगेच ते आत बोलवायचे. मग जवळजवळ तासभर तरी आमची चर्चा व्हायची. त्या दिवशीचा माझा कार्यक्रम ठरायचा. मग सकाळी साडेदहाच्या सुमारास भैय्या कार्यालयात जायला निघायचे. त्यावेळी बंगल्यावरच्या स्वीय सहाय्यकाला माझ्याबाबत ते सर्व सूचना देऊन जात असत. त्यामुळे दुपारी मग संसद भवनात जायचे किंवा कोळसा मंत्रालयात जायचे, की मग चांदणी चौकात जाऊन या संदर्भात लागणारी काही पुस्तके विकत आणायची, त्याची सर्वच सोय झालेली असायची. प्रत्येक वेळी त्यांची गाडी हजर असायची. संसद भवनाच्या लायब्ररीत बसून मी या संदर्भात बरेच संदर्भ जमा केले. मग रात्री साडेआठ ते साडेनऊ पुन्हा आमची बैठक होत असे. ते माझ्याशी दिवसभरातील माहितीची देवाणघेवाण करायचो.
भैय्यांकडे या कामासाठी दिल्लीला जाण्याचा चार-पाच वेळा तरी योग आला. दरवेळी भैय्या अशीच सोय करायचे. मग कधी नागपुरात आले की विमानतळावरून एक तर रविभवंन किंवा मग भाजपचे धंतोलीतील कार्यालय येथे ते थोडा वेळ थांबायचे. तिथे फोन करून मला बोलावून घ्यायचे. मग आमची चर्चा होत असे.
याच दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात देखील काही फेरबदल झाले होते. त्यामुळे भैय्यांचेही रसायन व उर्वरक हे खाते बदलून ते गृहराज्यमंत्री झाले होते. त्यामुळे त्यांची व्यस्तता अधिकच वाढली होती.
दरवेळी दिल्लीला जायचे म्हटले की भैय्या विमानाचे तिकीट बुक करायचे. मी एकदा त्यांना बोललो की मी रेल्वेने येत जाईल. त्यावर त्यांचे उत्तर दिले "तुम्ही माझे पाहुणे आहात, तुमची सर्व सोय मी करणारच". आणि खरोखरच ते सर्व सोय अगदी नेटकी करायचे
याच काळात एकदा भैय्यांसोबत दिल्लीला जाण्याचा योग आला. त्या दिवशी आम्ही सकाळी साडेनऊच्या विमानाने जायचे ठरवले होते. त्यानुसार मी नागपूर विमानतळावर पोहोचलो. मात्र भैय्यांना चंद्रपूरहून यायला थोडा उशीर झाला. त्यामुळे विमान सुटून गेले. मग दुपारी दीडच्या विमानाने जायचे ठरले. गाडी रवी भवन कडे वळली आणि तिथेच काही अधिकार्यांना बोलावून भैयांनी एक बैठक घेतली. हे सर्व आटोकून आम्ही दुपारी बाराच्या सुमारास पुन्हा विमानतळावर पोहोचलो. विमान घ्यायला थोडा वेळ होता मग व्हीआयपी रूम मध्ये बसून काहीतरी पोट पूजा करूया असा आमचा निर्णय झाला. भैय्यांनी सोबतच्या माणसाला सांगून एअरपोर्ट उपहारगृहातून काही स्नॅक्स बोलावले. त्याचा आस्वाद घेत असतानाच मोबाईलवर माझा पुतण्या ज्ञानेश पाठकचा फोन आला. आदल्याच दिवशी माझ्या माझा वाढदिवस झाला होता. ज्ञानेशने मला वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा माझा वाढदिवस कालच झाला असे मी त्याला सांगितले. समोर असलेल्या भैय्यांनी मला विचारले " कोण बोलतोय" मी माझा पुतण्या ज्ञानेश असे सांगताच ते म्हणाले मला फोन द्या मी त्याच्याशी बोलतो. मग ज्ञानेशला सांगितले मी विमानतळावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासोबत बसलो आहे ,आणि ते तुझ्याशी बोलताहेत, तर तो नको काका राहू दे म्हणाला. पण मीच त्याला सांगत भैय्यांच्या हातात फोन दिला. मग भैय्या त्याला बोलले की तुझ्या काकांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ते छान केले. कारण काल त्यांचा जन्मदिवस होता. आज ते एक दिवसांनी वाढले. म्हणून त्यांचा वाढदिवस. असे भैयांनी सांगताच ज्ञानेशलाही हसु आवरले नाही.
या दरम्यान एक दिवस भैय्या मी राहतो त्या वस्तीत लक्ष्मी नगरला एका कार्यक्रमासाठी येणार होते. तिथून तुम्ही माझ्या घरी या असे निमंत्रण मी त्यांना दिले. ते लगेच तयार झाले. त्या रात्री सुमारे आठ वाजता ते घरी देखील आले. मग माझी पत्नी सौ.अनुरुपा,मुलगी दिव्येशा यांच्याशी त्यांनी परिचय करून घेतला. त्यांच्या बॉडीगार्डला सांगून आमच्या सोबत फोटो देखील काढून घेतला. आता तुम्ही अविनाशजींच्या मागे लागून दिल्लीला या, तिथे पुढची सर्व व्यवस्था मी करतो, त्या परिसरात फिरून या असे आग्रहाचे आमंत्रण त्यांनी अनुरूपा आणि दिव्येशाला दिले. नंतरही या दरम्यान भैय्या दोन-तीनदा अचानक असे घरी येऊन गेले. ते घरी यायचे तेव्हा गृहराज्यमंत्री असल्यामुळे त्यांच्यासोबत सुरक्षारक्षकांचा मोठा ताफा असायचा. तो सर्व ताफा घरासमोर उभा राहिला की मग शेजाऱ्या पाजा-यांमध्ये चर्चा सुरू व्हायची.
या पुस्तकासाठी लागणारी माहिती मिळवण्याकरिता बराच वेळ गेला. त्यामुळे लेखन पूर्ण व्हायलाही वेळ गेला. डिसेंबर २०१८ मध्ये पुस्तकाचे काम अंतिम टप्प्यात आले असतांना नेमका माझा स्कूटर अपघात झाला. त्यामुळे काही काळ मी घरीच होतो. मग भैय्यांच्याच सहकार्याने माझा पत्रकार मित्र सुनील कुहीकर याला सह लेखक म्हणून सोबत घेतले आणि उर्वरित काम आम्ही पूर्ण केले. त्यामुळे मार्च २०१९ मध्ये काळ्या कोळशाची काळी कहाणी हे पुस्तक प्रकाशित झाले.
नेमकी त्याच काळात लोकसभा निवडणूक आचारसहिता लागू झाली होती. त्यामुळे पुस्तकाचा प्रकाशन समारंभ करता आला नाही. मग लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरू झाली. यावेळी नेमकी भैय्यांना नशिबाने साथ दिली नाही. या निवडणुकीत ते पराभूत झाले. दोन दिवसांनी नागपुरात आले असताना त्यांची माझी भेट झाली. त्यावेळी त्यांनी निवडणुकीत कोणत्या टप्प्यावर कशी गडबड झाली त्याचे साद्यंत वर्णन मला केले होते. अर्थात पत्रकार म्हणून सगळेच काही मला बाहेर प्रसिद्ध करणे शक्य नव्हते. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईत झालेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मग काळ्या कोळशाची काळी कहाणी हे पुस्तक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
नंतर लगेचच विधानसभा निवडणुका आल्या. यादरम्यान भैय्यांनी वर्धेत बोलताना नरेंद्र मोदींचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. त्यावरून बरेच राजकारण तापवले गेले होते. तेव्हा असा उल्लेख करण्यात चुक ते काय म्हणून मी एक लेख लिहिला होता. तो प्रकाशित झाल्यावर ते वृत्तपत्र घेऊनच मी भैय्यांना भेटायला गेलो. त्यावेळी सर्व उपस्थित त्यांना माझी ओळख करून देत अविनाशजी माझी बाजू लढवणारे पत्रकार आहेत असे सांगितले होते.
२०१९ च्या डिसेंबर महिन्यात सी ए ए आणि एन आर सी यांच्या विरोधात खूप वातावरण तापले होते. त्यावेळी मी भारत विकास परिषद या संघटनेच्या नापुरातील एका शाखेचा अध्यक्ष होतो. सी ए ए आणि एन आर सी याची बाजू मांडणारे काही कार्यक्रम आयोजित करावे अशी सूचना भारतीय विकास परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ने दिली होती. त्यामुळे जानेवारी २०२० मध्ये मी आमच्या शाखेतर्फे ख्यातनाम पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे सी ए ए आणि एन आर सी, नेमके वास्तव समजून घ्या, या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यादिवशी मुंबईत मी निरगुडकरांशी बोलून सर्व काही निश्चित केले आणि सहज म्हणून नरिमन पॉईंटच्या भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचलो. तिथे दारातच भैय्या भेटले. त्यांना जेव्हा सहज मी सांगितले की मी निरगुडकरांचे असे व्याख्यान ठेवले आहे. तेव्हा भैय्या लगेच म्हणाले अविनाशजी मला दोन दिवस आधी आठवण द्या ,मी व्याख्यानाला नक्की येईल. मग मी भैय्यांना विनंती केली की व्याख्यानाचे अध्यक्ष स्थान तुम्हीच भूषवा. भैय्या लगेच तयार झाले. ठरल्याप्रमाणे ते कार्यक्रमाला आले आणि त्यांनी दणदणीत अध्यक्षीय भाषण देखील केले.
नंतरही अधून मधून भैय्यांच्या भेटी होतच होत्या. एकदा माझेच काही काम होते. त्यावेळी त्यांनी दसऱ्याच्या दिवशी मी सकाळी दिल्लीहून नागपूरला परत येतो आहे, त्या दिवशी आपण भेटू, असा मला निरोप दिला. दसऱ्याच्या दिवशी सकाळी मी त्यांना दोनदा फोन केला. पण त्यांनी उचलला नाही. नंतर मी आंघोळीला गेलो. बाहेर येऊन बघतो तो मोबाईलवर भैय्यांचे दोन मिस्ड कॉल्स दिसले. मी लगेच फोन लावला आणि कुठे भेटायला येऊ असे विचारले. तेव्हा भैय्या लगेच उत्तरले अहो मीच तुमच्या घरी पोहोचलो आहे, तुमच्या घरासमोरच आहे. त्यांनी असे म्हणतात मी बाहेर गेलो तर दारासमोर त्यांचा ताफा थांबला होता. मग ते घरात आले आणि छान तासभर गप्पा झाल्या, चहापाणी झाले.
२०२१ मध्ये भैय्यांच्या थोरल्या मुलाचे चंद्रपूरला लग्न झाले. त्याच्या स्वागत समारंभाची निमंत्रण पत्रिका मला पाठवली होती .त्यावेळी आम्ही उभयता चंद्रपूरला गेलो ही होतो. नंतर मुलीच्या लग्नाचीही पत्रिका होती. मात्र त्याच दिवशी अयोध्येत रामा मंदिराचे लोकार्पण असल्यामुळे नागपुरातल्या बातम्या मला देणे गरजेचे होते. म्हणून जाता आले नाही. नंतरही प्रसंगा प्रसंगातून आमच्या भेटी होतच आहेत. याच दरम्यान त्यांना अन्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपदही दिले गेले. मला आठवते एकदा काही कामाने त्यांना विमानतळावर भेटायचे ठरवले होते. मी विमानतळावर पोहोचलो. त्यावेळी ते आत जाऊन बसले होते. मला आज जाणे शक्य नव्हते म्हणून मी त्यांना फोन केला. तर केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असणारा हा माणूस माझ्या प्रेमापोटी व्हीआयपी रूम मधून बाहेर येऊन मला भेटला होता. मधल्या काळात मी पंचनामा नावाचे न्यूज पोर्टल चालवत होतो. कोरोना काळात त्यावर भैय्यांची एक मुलाखत देखील मी प्रसारित केली होती.
असे हे हंसराजभैय्या अहिर हे सर्वार्थाने माझ्या तुलनेत मोठेच व्यक्तिमत्व आहे. मात्र तरीही त्यांनी माझ्याशी मैत्र जपले आहे हे मी माझे भाग्यच समजतो.