shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिसऱ्या दिवसअखेर लॉर्डसवर दोन्ही संघ तुल्यबळ


                कोणत्याही कसोटी क्रिकेट सामन्याचा तिसरा दिवस निर्णायक असतो हे आपणास ठाऊकच आहे. परंतु लॉर्डस जरा वेगळंच चित्र बघायला मिळालं. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दोन्ही ० संघ समान पातळीवर उभे होते. दोन्ही संघांचे पहिले डाव प्रत्येकी ३८७ धावांवर संपुष्टात आले. असे प्रकार खास करून कसोटी क्रिकेटमध्ये दुर्मिळ असतात. असाच समान धावसंख्येचा सामना याच दोन संघात सन १९८६ मध्ये हेडिंग्ले कसोटीत झाला होता. तेंव्हा कपिलदेवचा भारतीय संघ व माईक गॅटींगचा इंग्लिश संघ पहिल्या डावात प्रत्येकी ३९० धावांवर बाद झाले होते. असा प्रकार हा कसोटी क्रिकेटमधला नववा प्रसंग आहे. आता उर्वरीत दोन दिवसात जो संघ आपले कौशल्य पणास लावेल त्याच्या पदरी यशाची शिदोरी लागेल. खास करून भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला लवकर उखडले तर भारताची विजयाची संधी वाढेल, पण याच्या उलट घडलं तर निकाल इंग्लंडच्याही बाजूने झुकू शकतो.


                या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर केएल राहुलचे शतक आणि उपकर्णधार रिषभ पंत आणि अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या अर्धशतकांनंतरही, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला आघाडी घेता आली नाही. भारताचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला. इंग्लंडनेही पहिल्या डावात अशीच धावसंख्या उभारली होती. जडेजा फलंदाजी करत असताना भारतीय संघ आघाडी घेण्यात यशस्वी होईल असे वाटत होते, परंतु त्याच्या बाद झाल्यानंतर संघाने नियमित अंतराने उर्वरित विकेट गमावल्या. भारताचे शेवटचे चार गडी तर अकरा धावांतच बाद झाले. त्यामुळे भारताला इंग्लंड पेक्षा सरस ठरता आले नाही. हेडिंग्लेतही दोन्ही डावात भारताचा डाव असाच कोसळला होता.

               दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद दोन धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा जॅक क्रॉली दुसऱ्या आणि बेन डकेट नाबाद होते. भारताला मोठे लक्ष्य मिळू नये म्हणून चौथ्या दिवशी इंग्लंडचा डाव लवकर गुंडाळण्याची जबाबदारी आता भारतीय गोलंदाजांवर असेल. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, लॉर्ड्सवरील वातावरण तणावपूर्ण झाले आणि भारतीय खेळाडूंनी वेळ वाया घालवल्याबद्दल जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांच्यात बाचाबाची झाली.

               त्याआधी, भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ ३ बाद १४५ धावांवर सुरू केला. केएल राहुल आणि पंत यांनी भारताचा डाव पुढे नेला. सुरुवातीच्या सत्रात केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी शानदार कामगिरी केली. पंतने अर्धशतक झळकविले, पण तो उपहारापूर्वी शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. जलद धावा चोरण्याचा प्रयत्न करताना पंत बाद झाला. पंतने ११२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ७४ धावा काढल्या. पंत आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली.  भारताने पहिल्या सत्रात १०३ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. भारताने सुरुवातीच्या सत्रात ४.५८ च्या धावगतीने फलंदाजी केली.

                 उपहारानंतर राहुलने त्याचे दहावे कसोटी शतक पूर्ण केले, परंतु शतक झळकविल्यानंतर राहुलने आपली विकेट गमावली. राहुल १७७ चेंडूत १३ चौकारांसह १०० धावा काढल्यानंतर बाद झाला. दिलीप वेंगसरकर यांच्यानंतर लॉर्ड्सवर एकापेक्षा जास्त शतके करणारा राहुल हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. त्यानंतर रविंद्र जडेजाने नितीश कुमार रेड्डीसह खेळाची सूत्रे हाती घेतली आणि दोन्ही फलंदाजांनी उपयुक्त भागीदारी केली, ज्यामुळे भारताची धावसंख्या ३०० धावांच्या पुढे गेली. बेन स्टोक्सने नितीश रेड्डीला बाद करून भारताला सहावा धक्का दिला. नितीश आणि जडेजा यांच्यात ७२ धावांची भागीदारी झाली.

                 भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने अर्धशतक ठोकले. जडेजाने ८७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दौऱ्यातील जडेजाचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. जडेजाच्या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या ३५० धावांच्या पुढे गेली. रविंद्र जडेजाच्या रूपाने भारताला सातवा धक्का बसला. जडेजा शानदार फलंदाजी करत होता पण १३१ चेंडूत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७२ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. जडेजाने वॉशिंग्टन सुंदरसोबत ५० धावांची भागीदारी केली. जडेजा बाद झाला तेव्हा भारताचा स्कोअर ३७६ धावांवर होता. म्हणजेच, भारतीय संघ आघाडी घेण्यापासून फक्त १२ धावा दूर होता, परंतु भारताने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि आघाडी मिळवू शकला नाही. भारताने शेवटचे चार विकेट ११ धावांच्या अंतराने गमावले आणि त्यामुळे त्यांना आघाडी मिळविता आली नाही.

                  भारताकडून नितीशने ३०, वॉशिंग्टन सुंदरने २३ आणि आकाश दीपने सात धावा केल्या, तर बुमराहला खातेही उघडता आले नाही आणि सिराजही खाते न उघडता नाबाद परतला. त्याआधी, भारताने दुसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वाल (१३), करुण नायर (४०) आणि शुभमन गिल (१६) यांच्या विकेट गमावल्या होत्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने तीन, तर जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

                 राहुलने दुसऱ्या दिवशी आपले अर्धशतक पूर्ण केले होते आणि तीच गती कायम ठेवत तिसऱ्या दिवशी शतक फटकावले. राहुलने १७६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवरील हे त्याचे दुसरे कसोटी शतक आहे. यासह, लॉर्ड्सवर एकापेक्षा जास्त शतके करणारा राहुल दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. 

                दिलीप वेंगसरकर यांनी भारतासाठी लॉर्ड्सवर सलग तीन दौऱ्यात तीन कसोटी शतके झळकविली आहेत. लॉर्ड्सवर एकापेक्षा जास्त शतके झळकविणाऱ्या वेंगसरकरांच्या यादीत राहुल सामील झाला. या बाबतीत राहुलने लॉर्ड्सवर प्रत्येकी एक शतक ठोकणाऱ्या राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली सारख्या फलंदाजांना मागे टाकले आहे.

                 लॉर्ड्सवर एकापेक्षा जास्त कसोटी शतके करणारा राहुल हा जगातील तेरावा फलंदाज आहे. या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतके ठोकण्याचा विक्रम भारताच्या दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे, ज्यांनी तीन शतके केली आहेत. त्याच वेळी, वॉरेन बार्डस्ली, डॉन ब्रॅडमन, बिल ब्राउन, जॉर्ज हेडली, गॅरी सोबर्स, गॉर्डन ग्रीनिज, मॉर्टन क्रो, महेला जयवर्धने, ग्रॅमी स्मिथ, हाशिम अमला आणि स्टीव्ह स्मिथ यांनीही केएल राहुलप्रमाणे लॉर्ड्सवर प्रत्येकी दोन शतके झळकविली आहेत. 

                केएल राहुलचे इंग्लंडमधील हे चौथे शतक आहे, जे इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाच्या कोणत्याही फलंदाजाने ठोकलेले दुसरे सर्वाधिक शतकं आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ इंग्लंडमध्ये पाच शतकांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे. राहुल हा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सात देशांमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. या यादीत त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली आहेत.

               भारतीय संघाला उरलेल्या दोन दिवसात झालं गेलं विसरून इंग्लंडला झटपट गुंडाळून कमीत कमी धावांचं लक्ष स्वतःसाठी घ्यायचे आहे. चौथ्या दिवशी बुमराह आणि कंपनीला आपले सर्व कसब पणाला लावावे लागेल, मात्र त्यांना क्षेत्ररक्षकांनी योग्य साथ देणे गरजेचे आहे. अन्यथा सुटलेल्या झेलांप्रमाणे हा सामनाही भारताच्या हातून निसटू शकतो.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close