shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वॉशिंग्टनच्या सुंदर गोलंदाजीने भारताने इंग्लंडला रोखले ; आता फलंदाजांची सत्वपरीक्षा !



                 अँडरसन -तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटीचे पहिले तीन दिवस दोन्ही संघ अक्षरश: बरोबरीत होते. मात्र चौथ्या दिवशी सुपर संडेला खेळाने आपले रंग बदलत आधी इंग्लंडला संकटात टाकले तर खेळाच्या शेवटी भारतालाही अडचणीत ढकलून पाचव्या दिवशी प्रेक्षकांना मनोरंजक कामगिरीचे संकेत दिले.

                भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला  तेव्हा भारताने ४ बाद ५८ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता होती. इंग्लंड आणि भारताचा पहिला डाव प्रत्येकी ३८७ धावांवर संपला. दुसऱ्या डावात इंग्लिश संघाने केवळ १९२ धावा केल्यामुळे भारताला १९३ धावांचे माफक लक्ष्य मिळालेले. खेळ थांबला तेव्हा केएल राहुल ४७ चेंडूत ६ चौकारांसह ३३ धावांवर नाबाद होता. 

                 विजयी लक्षाचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात धक्कादायक झाली. संघाच्या अवघ्या पाच धावा असताना जोफ्रा आर्चरने यशस्वी जयस्वालला जेमी स्मिथकरवी यष्ट्यांमगे झेलबाद केले. तो खाते न उघडताच बाद झाला, यामध्ये आर्चरच्या कर्तत्वापेक्षा जयस्वालच्या हाराकिरीचाच मोठा वाटा होता. यानंतर केएल राहुल आणि करुण नायर यांनी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही काही चांगले फटके मारले आणि दुसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत ३६ धावा जोडल्या. मात्र ब्रायडन कार्सने ही भागीदारी तोडली. त्याने नायरला पायचितच्या जाळ्यात फसवले. येथे फलंदाजच स्वतः बाद होण्यास कारणीभूत होता. चेंडूचा टप्पा ओळखण्यात नायर अपयशी ठरला. जम बसतोय असे वाटत असताना ३३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १४ धावा काढून परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार शुभमन गिल पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. त्यालाही कार्सने पायचित केले. दिवसाच्या शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बेन स्टोक्सने रात्रीचा रखवालदार म्हणून आलेल्या आकाश दीपला त्रिफळाचित  केले. आकाशने ११ चेंडूत खेळून फक्त एक धाव केली. इंग्लंडकडून कार्सेने दोन तर आर्चर आणि स्टोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला.

                तत्पूर्वी रविचंद्रन आश्विनची गादी चालविणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडला १९२ धावांवर गुंडाळले. एक वेळ इंग्लंडचे फलंदाज मोठी खेळी करतील असे वाटत होते, पण बुमराहसह बाकीचे गोलंदाज निष्प्रभ ठरत असताना रूट, स्मिथ, स्टोक्स व बशीरला आपले शिकार बनवत इंग्लंडच्या मनसुंब्यांवर पाणी फेरले.

                 त्या आधी सकाळी इंग्लंडने चौथ्या दिवसाची सुरुवात बिनबाद दोन धावांवरून केली. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी दिवसाची सुरुवात केली खरी मात्र पहिल्या सत्रात मोहम्मद सिराजने धुमाकूळ घातला आणि बेन डकेट आणि ऑली पोप यांना पॅव्हेलियनमध्ये पाठविले. डकेटने १२ तर पोपने चार धावा केल्या. यानंतर नितीश कुमार रेड्डीने जॅक क्रॉलीला यशस्वी जयस्वालकडून झेलबाद केले. तो ४९ चेंडूत २२ धावा काढून  परतला. आकाश दीपने या सत्रात इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्याने हॅरी ब्रूकचा २३ धावांवर त्रिफळा उडविला.

                 दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले. त्याने प्रथम जो रूटला बाद केले. त्याने ९६ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ४० धावा केल्या. यानंतर त्याने जेमी स्मिथला आपला बळी बनवले. तोही आठ धावा काढल्यानंतर बाद झाला. सुंदरने तिसऱ्या सत्रातही आपला फॉर्म कायम ठेवत बेन स्टोक्स (३३) आणि शोएब बशीर (२) यांना बाद केले. तर  बुमराहने ख्रिस वोक्स (१०) आणि ब्रायडन कार्स (१) यांना बाद केले.  जोफ्रा आर्चर पाच धावा करून नाबाद राहिला. भारताकडून सुंदरने दुसऱ्या डावात चार तर बुमराह आणि सिराजने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर, नितीश रेड्डी आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

                  या संपूर्ण सामन्यात पंचांची कामगिरी अगदी खालच्या दर्जाची झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियन पंच पॉल रायफेल जरा जास्तच आघाडीवर होता. त्याचा प्रत्येक निर्णय जाणूनबुजून भारताला त्रास देण्याच्या उद्देशाने दिल्याचे जाणवत होते. पहिले दोन कसोटी व या सामन्याचे पहिले तीन दिवस दोन्ही संघ खेळीमेळीने वागत होते. मात्र तिसऱ्या दिवशी शेवटचे पाच मिनिट क्रॉली व डकेटने केलेल्या वेळकाढूपणामुळे दोन्ही संघातील वातावरण तापविण्यास कारणीभूत ठरले. त्याचा परिणाम संपूर्ण चौथ्या दिवसात दिसला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना जेरीस आणले व शेवटी बदला म्हणून इंग्लिश खेळाडूही जशास तसे वागत असल्याचे दिसत होते.

                  आता पाचव्या दिवसाच्या ९८ षटकात इंग्लंडला विजयासाठी सहा बळी व भारताला १३५ धावा हव्या आहेत. जो संघ आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवेल तो सामना जिंकेलच मात्र मालिकेत २-१ असा आघाडीवर जाईल. मागच्या दौऱ्यात भारत लॉर्डसवर जिंकले होते मात्र आता परिस्थिती सोपी नाही. धावा थोड्या दिसत असल्या तरी इंग्लंड संघ भारताला सहजा सहजी जिंकू देणार नाही.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close