जळगाव – जिल्हा नियोजन समिती जळगाव यांच्या निधीतून जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या एकूण १६ नव्या चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दि. ६ जुलै २०२५ रोजी करण्यात आले.
पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचणारी आधुनिक वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत 'डायल ११२', कायदा व सुव्यवस्था पथक, पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग तसेच सी.सी.आय.बी. विभागासाठी एकूण १६ वाहनांची खरेदी करण्यात आली. यात XUV 700 प्रकारच्या अत्याधुनिक १६ वाहनांचा समावेश आहे.
या वाहनांची एकूण किंमत ₹२,१२,४५,८५४ (दोन कोटी बारा लाख पंचेचाळीस हजार आठशे चौपन्न रुपये) असून, ही खरेदी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार GeM पोर्टलद्वारे पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे.
या लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत सुरळीत पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पोलीस दलाचे कार्य अधिक कार्यक्षम व गतिमान व्हावे, या उद्देशाने ही महत्त्वपूर्ण पायरी उचलण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या वाहनांचा प्रभावी वापर केला जाणार आहे.