मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांची काव्याने भारलेली अनोखी त्रिसंधी!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे सायंकाळी ४:३० ते ७:३० या वेळेत सतराव्या कविसंमेलनाने रसिकमनावर अविस्मरणीय ठसा उमटवला. "श्रद्धेच्या सुरांनी भारलेली त्रिसंधी – भक्ती, कृतज्ञता आणि श्रावणाचा काव्यसाज" या संकल्पनेवर आधारित हे संमेलन रसिकांच्या मनात खोलवर ठसणारा अनुभव ठरला.
या विशेष संमेलनाची वैशिष्ट्यपूर्ण रचना तीन सत्रांत करण्यात आली होती. पहिलं सत्र "भक्तिरसाने भारलेली काव्यसंध्या" – विठोबा, हरिपाठ, वारकरी संप्रदाय आणि आषाढी एकादशीच्या भक्तिभावपूर्ण पार्श्वभूमीवर आधारित होतं. टाळ-मृदंगाच्या आभासी नादात साकारलेले काव्य नुसते ऐकायला नाही, तर अंतःकरणाने अनुभवायला मिळाले.
दुसऱ्या सत्रात "गुरुचरणी नतमस्तक" या गुरुपौर्णिमा विशेष सत्रात गुरु-शिष्य नात्याचं गूढ, आदर, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा भाव कवितांमधून प्रकट झाला. अनेकांनी आपल्या गुरूंप्रतीच्या भावना अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मांडल्या.
तिसऱ्या सत्रात "मनातला श्रावण" या विषयावर निसर्ग, आठवणी, विरह, ओलसर भावना, पावसाच्या सरी आणि नात्यांची उब अशा नाजूक तरलतेचा सुरेख काव्याविष्कार झाला. मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आपल्या श्रावण विषयाला अनुसरून अभिवाचन करणार्या चंद्रकांत दढेकर यांनी उपस्थितांना दाखवून दिले. त्यांनी निवडलेला उतारा, त्यातील लालित्यपूर्ण भाषा सौंदर्य आणि आरोह अवरोह घेत संयतपणे केलेलं अभिवाचन एका उत्कृष्ट अभिवाचनाचा उत्तम नमूना होतं.
कार्यक्रमाची रंगत वाढवणारा एक विशेष क्षण म्हणजे ओमकार गणेश खाडे या लहानशा बालकाने अत्यंत स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने सादर केलेली प्रार्थना. त्याच्या निरागसतेनं आणि आवाजातील माधुर्याने सर्व रसिकांची मने जिंकली.
या कविसंमेलनात डॉ. मानसी पाटील, अशोक (भाई) पुंडलीक नार्वेकर, कल्पना दिलीप मापूसकर, विक्रांत मारूती लाळे, संतोष धर्मराज मोहिते, आश्विनी सोपान म्हात्रे, वैभवी विनीत गावडे, उत्तम कुलकर्णी, अनिल विनोद भोईर, नंदन भालवणकर, सुचिता बागडे-खाडे, प्रा. नागेश सोपान हुलवळे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, प्रमोदिनी अनिल देशमुख, सरोज लट्टू, प्रीती तिवारी, राजेश साबळे ओतूरकर, अक्षता रणजित गोसावी, डॉ. स्नेहा समीर राणे, छाया धर्मदत्त पाटील, मेघना दीपक सावंत, रविंद्र शंकर पाटील, नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून श्री. लट्टू, दिलीप राणे, गणेश खाडे आणि डॉ. अनुज केसरकर यांनी प्रत्येक कवितेचा रसग्रहणपूर्ण अनुभव घेतला. सर्व कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि कार्यक्रमानंतर एकत्रित छायाचित्र घेतलं गेलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेमक्या शब्दांत विक्रांत लाळे यांनी केले. तांत्रिक बाजू रविंद्र पाटील यांनी संभाळली.
कार्यक्रमात गरमागरम चहा, बिस्किटांचा आस्वाद रसिकतेला गोडवा देऊन गेला. नंदन भालवणकर, नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांनी त्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले.
गुरुदत्त दिनकर वाकदेकर (संस्थापक/अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा), नितीन सुखदरे (अध्यक्ष – शोध आनंदाचा फाऊंडेशन), आणि सनी आडेकर (सचिव – शोध आनंदाचा फाऊंडेशन) यांची संयोजनातील तळमळ आणि सातत्य हाच या संमेलनाच्या यशाचा खरा पाया ठरला. सहभाग प्रमाणपत्रावर सर्वांची नावं आपल्या सुंदर हस्ताक्षरात वैभवी गावडे यांनी लिहून दिली, त्यांना मनःपूर्वक सलाम!
या यशस्वी कविसंमेलनानंतर, पुढील अठरावे कविसंमेलन येत्या ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर निवेदन लवकरच प्रसारित केले जाईल. आपली कविता, आपली ओळख – पुन्हा एकदा साहित्याच्या व्यासपीठावर उमटवण्यासाठी सज्ज व्हा!