विद्यार्थ्यांच्या लेझीम, नृत्य, पारंपरिक वेशभूषेने शहरात वारकरी रंग...
एरंडोल, प्रतिनिधी –
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आयोजित आषाढ वृक्ष संवर्धन वारी आनंदात व उत्साहात एरंडोल शहरात पार पडली. पारंपरिक वेशभूषा, लेझीम पथक आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहरात भक्तिरस निर्माण केला.
या वारीची सुरुवात रा.ती. काबरे विद्यालयाच्या मैदानावरून करण्यात आली. सर्वप्रथम पालखीतील पांडुरंग परमात्म्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजन समारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र काबरे, सचिव श्री. राजीव मणियार, शालेय समिती अध्यक्ष डॉ. नितीन राठी, सदस्य अनिल बिर्ला, धीरज काबरे, सतीश परदेशी, परेश बिर्ला, शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन आणि व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
वारीत मित्रा चव्हाण आणि भाग्यश्री महाजन यांनी पांडुरंगाचे, तर हर्षाली पाटील आणि हर्षिता पाटील यांनी माता रुक्मिणीचे वेश परिधान करून सहभाग घेतला. इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नृत्य सादर करून उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. "विठू माऊली"च्या गजरात सर्व विद्यार्थी वारकरी बनून सहभागी झाले.
कार्यक्रमानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र काबरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना उपासाचा चिवडा, तर शाळेच्या वतीने राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. या दिंडीमध्ये शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांचीही उपस्थिती होती.
वारकरी संप्रदायाच्या परंपरेत रुजलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत झाली, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली.