जळगाव – महानगरपालिकेतील अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकासह कंत्राटी शहर समन्वयकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जळगाव युनिटने रंगेहात पकडले. ही कारवाई आज, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सापळा रचून करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कर सल्लागार असून त्यांनी एका संस्थेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या जळगाव बसस्थानकावरील वातानुकुलीत सार्वजनिक शौचालय पे अँड युज तत्वावर चालवण्यासाठी टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी ४ एप्रिल रोजी ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे महानगरपालिकेकडे भरली होती. मात्र टेंडर मंजूर न झाल्याने त्यांनी २९ जुलै रोजी अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला.
या अर्जासंदर्भात लिपिक आनंद जनार्दन चांदेकर यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी रक्कम परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराने तत्काळ ACB कार्यालयात धाव घेत तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान चांदेकर यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, त्यांनी ही रक्कम थेट स्वतःकडे न घेता शहर समन्वयक राजेश रमण पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानंतर ACB पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची नोटांची रक्कम घेताना आरोपी लिपिक चांदेकर यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात राजेश पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
संपूर्ण कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या सापळा कारवाईत GPSI सुरेश पाटील, पोना बाळू मराठे व पोकॉ भूषण पाटील यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे जळगाव महानगरपालिकेत लाचखोरीविरोधात जनतेतून समाधान व्यक्त होत असून भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.