एरंडोल :- तालुक्यात झालेल्या विक्रमी संततधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तब्बल ८ हजार १३९ शेतकऱ्यांचे सुमारे ६ हजार ५३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे २०० हून अधिक घरांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार प्रदिप पाटील यांनी दिली. सध्या सर्वत्र पंचनाम्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
🌾 पिकांचे मोठे नुकसान...
कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आणि कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पावसामुळे ३० पशुधन मृत्युमुखी, तर पाच गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने चाऱ्याचे नुकसान झाले आहे.
🏠 गावोगावी नुकसानीची पाहणी...
तहसीलदार प्रदिप पाटील यांच्यासोबत गटविकास अधिकारी दादाजी जाधव, मंडळ अधिकारी दिपक ठोंबरे, ग्राम महसूल अधिकारी ए. एस. तागडे व ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. पाटील यांनी टोळी खु., एरंडोल, खडके बु., रवंजे बु., खर्ची खु. आदी गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. या वेळी शेतकरी भावनिक होऊन व्यथित झाले.
🗣️ आमदारांचाही हस्तक्षेप...
आमदार अमोल पाटील यांनीही विविध गावांना भेट देऊन अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
🌧️ विक्रमी पावसाची नोंद...
शनिवार-रविवारी झालेल्या विक्रमी पावसात रिंगण गावात १०० मिमी पाऊस, तर संपूर्ण तालुक्यात सरासरी ६६ मिमी पावसाची नोंद झाली. परिसरातील बहुतांश पाण्याचे स्रोत भरल्याने ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर झाली असली तरी शहरातील नविन वसाहतींमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेने त्वरित सांडपाण्याची समस्या सोडवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.