जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मतः ऐकू न येणाऱ्या अमळनेर येथील २२ महिन्यांच्या बालिकेवर महागडी समजली जाणारी “कॉंक्लेअर इंप्लांट” शस्त्रक्रिया मोफतपणे यशस्वी करण्यात आली. खानदेशात ही अशा प्रकारची पहिली मोफत शस्त्रक्रिया असून, तिचे व्यापक स्वागत होत आहे.
ही जटिल शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली. विशेष म्हणजे ‘कॉंक्लेअर इंप्लांट’ची यंत्रणा देखील अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या प्रयत्नातून मोफत उपलब्ध झाली.
नागपूर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. कांचन तडके यांच्या नेतृत्वाखाली कान-नाक-घसा विभागाचे डॉ. राजश्री चोरपगार, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. ललित राणे, डॉ. विनोद पवार आणि अन्य तज्ज्ञांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर आता बालिकेला ऐकू येणे शक्य होणार आहे.
यामध्ये ऑडिओलॉजिस्ट राजश्री वाघ व मुनज्जा शेख यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. तसेच बालरोग, बधिरीकरण व परिचारिका विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या उल्लेखनीय यशामुळे रुग्णालयाच्या कार्यक्षमतेचे आणि सामुदायिक आरोग्यसेवेतील योगदानाचे जोरदार कौतुक होत आहे. अधिष्ठाता डॉ. ठाकूर व अधिसेविका संगीता शिंदे यांनी रुग्णालयीन पथकाची भेट घेऊन विशेष अभिनंदन केले. बालिकेच्या कुटुंबियांनी सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.