लहानपणी आमच्या गव्हाणीत सहा बैल होते. आठ-दहा गडी, मोठं बारदाना आणि बैलांभोवतीचे आयुष्य. पोळा आला की घरातल्या अडगळीला ठेवलेल्या पितळी तोड्या, घोगरमाळा बाहेर येत. आठ दिवस घासून त्यांना चमक आणली जाई. चामडे जरासं फाटलं असेल तर दुरुस्ती व्हायची, कधी नवीन साजही आणला जाई.
पिठोरी अमावस्या म्हणजे बैलपोळा. पोळ्याच्या आठवडाभर आधीच गावात गजबजलेला बाजार भरत असे. कासरे, माठवठ, वेसन, केसरी, चवर, गेरू, हिंगूळ, रंगीबेरंगी झुल, छंबी पितळाची, गजरे, गोंडे, फुगे – काय नाही मिळायचं त्या बाजारात!
पोळ्याच्या आठ दिवस आधीपासूनच बैलांना औत्यापासून सुट्टी. रोज चरायला नेणं, रात्री तेलाने खांदे मळणं, शिंगांना साळणं, शेपटीला गोंडे कापणं – खरंच नवरदेवासारखीच सेवा.
पोळ्याच्या दिवशी बैलांना गोदावरीत स्नान घालायचं. नदी दुथडी वाहत असे. नाना-बाळांसारखी उत्साही माणसं गावभर बैलं घेऊन नदीच्या धारीवर जात. काहीजण बैलांचे शिंग धरून त्यांना पाण्यात उलटे करायचे – एक वेगळीच कला.
स्नानानंतर बैल सजवले जायचे. पितळी तोडे, घोगरमाळा, रंगीत झुल, गोंडे – आणि त्या सजलेल्या बैलांमधला तो औढ, आनंद वेगळाच. घराघरांत पुरणाचा मोठा घाट चुलीवर चढायचा. सगळ्या गड्यांना खास आमंत्रण असे.
बैलांना घेऊन मारुतीचे दर्शन घ्यायचं. मनाचे बैल गुडघे टेकवून देवाला वंदन करायचे. गावभर फिरून घरोघरी बैलांचे पूजन व्हायचं. घरी येताना दारात औत्याचं जु ठेवलं जायचं. येताना बैलांच्या चालीनं पुढील पावसाची नक्षत्रं ठरवायची. आजी भविष्य सांगायची – एखाद्या बैलाने अंगणात मुत्र विसर्जन केलं तर त्या नक्षत्राचं कोसळणं ठरलेलं.
संध्याकाळी मोठी पंगत व्हायची, रात्री अंगणात वा खळ्यावर मैफिल रंगायची. खरं सांगायचं तर ते दिवस आठवले की आज आर्थिक सुबत्ता असूनही मनाला पोकळी जाणवते. त्या काळचं बैलांवरचं प्रेम, जिव्हाळा आज कुठे दिसतो?
माझे वडील रात्री उशिरा आले तरी बैलं उठून उभी राहायची. वडील प्रत्येकाला वैरण टाकायचे, त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचे आणि मगच झोप घ्यायचे.
आज पोळ्याच्या निमित्तानं त्या सगळ्या आठवणी मनातल्या कॅलेंडरवर उमलल्या. त्या आठवणी मनाला गोड चटका देऊन गेल्या.
हो, एक सांगायचं राहिलं – पोळ्याच्या दिवशी आम्ही उपवासही धरायचो...
✍️ संजय बबुताई भास्करराव काळे
०००००