भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय त्यांच्या खेळण्याच्या परिस्थितीतीजन्य नियमात मोठा बदल केला आहे. बीसीसीआय येत्या देशांतर्गत हंगामापासून एक नवीन नियम लागू करणार आहे, ज्यामुळे जर एखादा खेळाडू अनेक दिवस चालणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेत किंवा सामन्यात गंभीर दुखापतग्रस्त झाला तर संघाला त्याच्या जागी पर्यायी खेळाडूला परवानगी दिली जाईल. अलीकडेच, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान रिषभ पंत आणि ख्रिस वोक्स जखमी झाले होते, त्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने सर्व स्टेट क्रिकेट असोशिएन्स अर्थात राज्य संघटनांना नवीन नियमाची जाणीव करून दिली आणि म्हटले आहे की, जर एखाद्या खेळाडूला संबंधित सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली तर खालील परिस्थितीत पर्यायी खेळाडूला परवानगी दिली जाऊ शकते. ही गंभीर दुखापत खेळादरम्यान आणि कलम 1.2.5.2 मध्ये वर्णन केलेल्या खेळण्याच्या क्षेत्रात झाली पाहिजे. दुखापत बाह्य आघातामुळे झाली पाहिजे आणि परिणामी फ्रॅक्चर किंवा खोल जखम असं झाले पाहिजे व या दुखापतीमुळे, संबंधीत खेळाडू उर्वरित सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरूंस्त नसल्याने अनुपलब्ध असावा.
सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर हा नियम देशांतर्गत हंगामापासून लागू होईल. हा नियम वरिष्ठ आणि ज्युनियर देशांतर्गत स्पर्धांच्या बहु-दिवसीय सामन्यांमध्ये लागू असेल. २८ ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी आणि १९ वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीसह त्याची सुरुवात होईल. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान रिषभ पंतला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता, तर पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ते दोघेही पूर्णतः फिट नव्हते व त्यांच्या बदली फलंदाजी अथवा गोलंदाजीला बदली खेळाडू मिळाले नव्हते. पंत व वोक्स संघाच्या गरजेपोटी स्वतःच्या दुखापती विसरून फलंदाजीला आले होते. हा भाग त्यांच्या खेळापोटी असलेल्या प्रेमाचा होता, पण यामुळे त्यांचे दुखणे विकोपास जाऊन पुढील अनर्थ वाढू शकत होता. सुदैवाने तसे काही झाले नाही. मात्र यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा तीव्र झाली होती की, जर एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली असेल तर संघाला बदली खेळाडू मिळायला हवा. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या बाजूने होते, तर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने त्याला विरोध केला. तथापि या नव्या नियमाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यता घेणे आवश्यक आहे.
प्रस्तुत लेखात आपण बीसीसीआयने केलेल्या गंभीर दुखापतींच्या बदलीचे नियम सविस्तर पणे जाणून घेऊया.
१.२.८.१: जर एखाद्या खेळाडूला संबंधित सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली असेल, तर खालील परिस्थितीत गंभीर दुखापतींच्या बदलीचा खेळाडू खेळादरम्यान आणि वरील परिच्छेद १.२.५.२ मध्ये वर्णन केलेल्या खेळण्याच्या क्षेत्रात गंभीर दुखापत झाली असावी. दुखापत बाह्य आघातामुळे झाली पाहिजे आणि फ्रॅक्चर किंवा खोल कट (जखम) इत्यादीमुळे झाली पाहिजे. दुखापतीमुळे खेळाडू उर्वरित सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.
१.२.८.१.२: गंभीर दुखापतीची व्याप्ती आणि गंभीर दुखापतीच्या बदलीसाठी परवानगी देण्याचा अंतिम अधिकार मैदानावरील पंचांकडे असेल. ते बीसीसीआय मॅच रेफरी किंवा मैदानावर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
१.२.८.१.३: संघ व्यवस्थापक बीसीसीआय मॅच रेफरींना गंभीर दुखापतीच्या बदलाची विनंती एका फॉर्मवर सादर करेल ज्यामध्ये -
१.२.८.१.३.१: गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूची ओळख पटवावी लागेल.
१.२.८.१.३.२: गंभीर दुखापत झालेल्या घटनेचे वर्णन करून दुखापतीचा वेळ देखील समाविष्ट करावा लागेल.
१.२.८.१.३.३: खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे आणि दुखापतीमुळे तो पुढे सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही याची पुष्टी करावी लागेल. त्यासोबत त्याच्या झालेल्या मेडिकल टेस्टचा रिपोर्ट जोडावा लागेल.
१.२.८.१.३.४: गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूची जागा घेणारा खेळाडू त्याच्या समकक्ष असावा. उदा. फलंदाजा बदली फलंदाज, वेगवान गोलंदाजा बदली वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाजा बदली फिरकी गोलंदाज, व यष्टीरक्षक फलंदाजांबदली यष्टीरक्षक फलंदाजच असेल.
१.२.८.२: गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूला परवानगी द्यायची असल्यास, कलम १.२.८.१.३.२ मध्ये निर्दिष्ट केलेल्या घटनेनंतर बीसीसीआय मॅच रेफ्रीला गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूची विनंती शक्य तितक्या लवकर सादर करावी. त्यामुळे संबंधीतांना बदली योग्य खेळाडू पाचारण करणे पंचांना सोपे जाईल व त्याच्या संघाचे नुकसान होणार नाही.
सध्या आयसीसी कन्कशन नियम खेळाडूस डोक्याला / हेल्मेटवर चेंडू लागल्यास व सदर खेळाडू पुढे खेळण्यास असमर्थ असल्यास बदली खेळाडू देते. मात्र काही संघ याचा गैरफायदा घेत असल्याने बरेच विवादही झाले आहेत. त्यामुळे सामन्या दरम्यान तणाव वाढू शकतो. असे काही घडू नये म्हणून सध्यातरी बीसीसीआयला जास्तच सतर्क राहावे लागेल व येथे जर हा नियम यशस्वी झाला तर आयसीसीही भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर हा नियम लागू करू शकते.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.