पर्यावरणपूरक हरित वारी आणि प्लास्टिक मुक्त वारी अशी ओळख व्हावी - ह.भ.प माणिक महाराज मोरे
इंदापूर शहर श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्सव समिती पदाधिकारी निवड जाहीर.
इंदापूर:
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या देहू ते पंढरपूर मार्गावर दुतर्फा झाडे लावून त्यांचे संगोपन होणे आवश्यक आहे या माध्यमातून आगामी काळात पालखी सोहळ्याची अध्यात्मासह पर्यावरण पूरक हरित वारी आणि प्लास्टिक मुक्त वारी अशी ओळख व्हावी असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी केले.
इंदापूर शहरातील ऐतिहासिक इंद्रेश्वर मंदिरात इंदापूर शहर श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी माजी मुख्याध्यापक ह.भ.प.दत्तात्रय गुजर, ह.भ.प.मिनिनाथ कुंभार, ह.भ.प.विशाल वाघमारे,ह.भ.प.प्रकाश मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आजरेकर फडाचे प्रमुख हरिदास महाराज बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी बोलताना माणिक महाराज मोरे म्हणाले की, "इंदापूर प्रमाणेच प्रत्येक पालखी मुक्काम स्थळी स्थानिक पालखी सोहळा समिती असावी. त्यामध्ये स्वागत, अल्पोहर, नियोजन व मुक्काम व्यवस्था या संदर्भात चार उपसमित्या असणे आवश्यक आहे. यासह पालखी मार्गावर फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, त्यांचे संगोपन होणेही आवश्यक आहे. वारी हरित आणि पर्यावरणपूरक असावी, देशी वृक्षांची लागवड व्हावी.याबरोबरच प्लास्टिक बंदी, झाडे लावणे, तुकोबाराय अभ्यासक व्यासपीठ, वारकरी भवन, उद्यान, तुकोबारायांचे शिल्प त्यासमोर नांदरुकीचा वृक्ष, प्रत्येक ठिकाणी तुकाराम बीज उत्सव व्हावा यांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.तर प्रत्येक महिन्याच्या वारी करणाऱ्या वारकऱ्यांवरही समितीसह सरकारनेही लक्ष देणे आवश्यक आहे. आता योग्य काळ आला असून, या सर्व विषयांचा सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही माणिक मोरे महाराज यांनी सांगितले.
यावेळी दत्तात्रय गुजर, मिनीनाथ कुंभार,महादेव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास सामसे यांनी प्रास्ताविक संतोष आटोळे यांनी तर आभार संदीप वाशिंबेकर यांनी मानले.
-
नवनियुक्त समिती खालील प्रमाणे
इंदापूर शहर श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी खुशाल महाराज कोकाटे, उपाध्यक्षपदी मिनीनाथ महाराज कुंभार, खजिनदारपदी विशाल महाराज वाघमारे, सचिव पदी ओंकार महाराज जोंजाळ, सहसचिव पदी महादेव चव्हाण, उपसचिव पदी धीरज शहा, कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड.रुद्राक्ष मेनसे, ॲड.राजीव करडे, लोकल ऑडिटर पदी संदीप वाशिंबेकर तर सदस्यपदी भागवत घनवट, संतोष आटोळे, पांडुरंग व्यवहारे हरिदास सामसे व प्रशांत सीताफ यांची नियुक्ती करण्यात आली.
-