एरंडोल (प्रतिनिधी)
जीवन किती क्षणभंगुर असते याचे हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पाहायला मिळाले. पिंपरी बुद्रुक फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास (वय ३५) यांचे जागीच निधन झाले, तर त्यांच्यासोबत असलेले दुचाकी चालक प्रवीण नारायण पाटील (वय २३) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची धक्कादायक घटना...
महंत प्रियरंजनदास हे बंगलोर येथे पार पडलेल्या कबीरपंथी धार्मिक कार्यक्रमात पंधरा दिवस सहभागी होऊन पिंपरी बुद्रुक येथे परतत होते. ते चारचाकी वाहनातून पिंपरी फाट्यावर उतरले. त्यांना पुढे मठात नेण्यासाठी गावातीलच प्रवीण पाटील हा युवक दुचाकी घेऊन आला होता. महंत दुचाकीवर बसले, इतक्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की महंतांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक प्रवीण हा गंभीर जखमी झाला.
सेवाभावी जीवनाचा अकस्मात अंत...
गेल्या चार वर्षांपासून महंत प्रियरंजनदास हे पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून कार्यरत होते. साधेपणा, अध्यात्मिक विचार आणि समाजासाठी झटणारी त्यांची वृत्ती यामुळे त्यांना ग्रामस्थ व कबीरपंथीयांमध्ये विशेष मान-सन्मान होता. अचानक आलेल्या या अपघाताच्या बातमीने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून श्रद्धाळूंमध्ये शोककळा पसरली आहे.
प्रशासनाची तत्परता...
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड तसेच त्यांचे सहकारी अनिल पाटील, गणेश पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, अमोल भोसले व विलास पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.