शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी सुरू केलेले “बहिष्कृत भारत” हे एक प्रेरक पाक्षिक होते. स्वतः डॉ. आंबेडकर साहेब या पाक्षिकाचे संपादक होते आणि त्यांनी आपल्या लेखनातून अस्पृश्य समाजाला सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली.
दुसऱ्या अंकापासूनच ‘बहिष्कृत भारता’वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या ओव्या उद्धृत केल्या जात होत्या. उदाहरणार्थ:
"आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी। देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने। जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी। इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे। आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई। एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम। संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।"
या ओव्या वाचून स्पष्ट होते की, डॉ. आंबेडकर साहेब आपल्या लेखनातून अस्पृश्य समाजाला युद्धप्रेरणा देत होते आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्यास प्रोत्साहित करत होते.
सर्व वृत्तपत्रे डॉ. आंबेडकरांनी मराठी भाषेत प्रकाशित केली, कारण ती त्या काळातील सामान्य जनता सहज समजू शकत असे. त्यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते आणि मराठी ही तिथली लोकभाषा होती. इंग्रजीत ते प्रकांड विद्वान होते, परंतु दलित जनता इंग्रजी भाषा समजू शकत नव्हती. या कारणास्तव त्यांनी लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी मराठी भाषा निवडली.
त्याच वेळी, महात्मा गांधी आपले ‘हरीजन’ नावाचे वृत्तपत्र इंग्रजीत प्रकाशित करत होते, जे साधारणपणे दलित जनता वाचू शकत नव्हती. या तुलनेत, “बहिष्कृत भारत” हे वृत्तपत्र दलित समाजासाठी वास्तव आणि प्रभावी माध्यम ठरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे पाक्षिक केवळ बातमीपत्र नव्हते, तर सामाजिक क्रांतीसाठी आणि न्यायासाठी आवाज होते. त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील वंचित घटकांना जागृत केले आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची दिशा दाखवली.
000