अमळनेरात तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा विशेष उपक्रम.
अमळनेर (प्रतिनिधी) –जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे कॅमेरा पूजन व वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम आज (१९ ऑगस्ट) सकाळी १० वाजता पत्रकार भवन येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत यांनी भूषविले. जेष्ठ पत्रकार संजय पाटील, जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे आणि मुक्तार अली सय्यद यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. त्यानंतर भगवान वारुळे यांच्या हस्ते पत्रकार भवन परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी अध्यक्ष चेतन राजपूत म्हणाले,
“फोटोग्राफी ही केवळ छायाचित्र घेण्याची कला नाही तर समाजाचा आरसा आहे. प्रत्येक घडामोड, प्रत्येक घटना, प्रत्येक भावना फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतो. पत्रकार आणि फोटोग्राफर बांधव हे नेहमीच खांद्याला खांदा लावून कार्य करतात. फोटोग्राफर बांधवांना जी काही मदत लागेल, तेव्हा आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू. अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने सामाजिक जाणीव ठेवून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला, हे विशेष कौतुकास्पद आहे.”
जेष्ठ पत्रकार संजय पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले,
“कॅमेऱ्यातून टिपलेला प्रत्येक क्षण हा इतिहासाचा दस्तऐवज असतो. छायाचित्रकार समाजातील अनेक घटनांना आवाज देतात. पत्रकारांप्रमाणेच त्यांचाही समाजमन घडविण्यात मोठा वाटा असतो. म्हणूनच त्यांच्या कार्याचे महत्त्व अमूल्य आहे. फोटोग्राफर बांधवांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांत सहभाग घेत राहावा.”
जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले,
“छायाचित्रण ही माझ्यासाठी साधना आहे. आज आपण कॅमेऱ्याला पूजून त्याचे महत्व अधोरेखित केले. तसेच वृक्ष लागवडीमुळे निसर्गाशी असलेले आपले नाते दृढ झाले. कॅमेरा हा आपला व्यवसाय, कला आणि समाजासाठी सेवेचे साधन आहे. पुढील पिढ्यांना छायाचित्रणाची प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा.”
या कार्यक्रमास पत्रकार जितेंद्र ठाकूर,किरण पाटील, चंद्रकांत पाटील, महेंद्र रामोशे, डॉ. विलास पाटील, मुन्ना शेख,विजय पाटील,तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सचिव दिपक बारी, खजिनदार मनोज चित्ते, डॉ. युवराज पाटील, जयवंत ढवळे, अनंत पाटील, सचिन बडगुजर, किरण बागुल, विक्की जाधव, घनशाम पाटील, गणेश पाटील, फारुख पठाण, इक्बाल शेख, प्रवीण पाटील, नितीन भावसार, सागर चित्ते, भास्कर पाटील, जिजावराव महाजन, पप्पू पाटील, गणेश नाईक, अजय भोई, गुलाब पाटील, किशोर पाटील, कल्पेश पाटील, ज्ञानेश्वर देशमुख, मकसूद अली सय्यद, गजानन पाटील, दिपक सोनार, गौरव शुक्ल, विशाल चौधरी, अरविंद महाजन, नितीन पाटील, नारायण मिस्त्री आदींसह असंख्य फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युवराज पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन महेंद्र पाटील यांनी मानले.