प्रतिनिधी - एरंडोल तालुका व परिसरात तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दोन दिवस सतत झालेल्या संततधार पावसामुळे शेतात, घरात, दुकानांत, व्यापारी संकुलात व नविन वसाहतींमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.
गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या चिंतेत होते. शेतातील खरीप पिकांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची भीती होती. मात्र १५ व १६ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने ही चिंता दूर केली; पण त्याचवेळी प्रचंड नुकसान ओढवले.
नवीन वसाहतींमध्ये नगरपालिका तर्फे नुकतेच तयार केलेले रस्ते पावसाचे पाणी सहन करू शकले नाहीत. पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठलीही व्यवस्था न केल्याने गुडघाभर पाणी साचले. नागरिकांना रस्ताच सापडत नसल्याने त्यांचे हाल झाले. याबाबत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी कळवले असता, “आज रविवार सुट्टी आहे” असे उत्तर मिळाले. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “वेळेवर कर भरूनही असे उत्तर मिळणे लाजिरवाणे आहे” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.
रात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरगुती वस्तू, व्यापारी माल व शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांकडून शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान आमदार अमोल पाटील यांनी नुकसानीग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. टोळी येथे ३० ते ३५ घरे, भातखेडे येथे १५ ते २० घरे पाण्याखाली गेली असून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तालुक्यातील जनावरांनाही मोठा फटका बसला आहे. एरंडोल येथे एक गाय, एक म्हैस, सहा कोंबड्या, खडकेसीम येथे एक म्हैस व एक रेडकू, जवखेडेसीम येथे एक बैल, एक बकरी व एक कोंबडी, जवखेडे खुर्द येथे दोन गायी, रवंजे खुर्द येथे दोन बैल व एक गाय, निपाणे येथे एक बैल व एक वासरू, खडके बु. येथे एक बैल व पाच म्हशी, उमरदे येथे दोन बकऱ्या, धारगीर खडके खुर्द येथे एक म्हैस व एक रेडकू, तर टोळी खुर्द येथे दोन बकऱ्या पाण्यात वाहून गेल्या.
तसेच तालुक्यातील अंजनी प्रकल्प, भालगाव, खडकेसीम, पद्मालय येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जोरदार पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन व कडधान्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी तीव्र होत आहे.