शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
मंडल आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी झाली, तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला आमदार व खासदारकीच्या जागांसाठीही २७ टक्के आरक्षण द्यावे लागेल, असा ठाम दावा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रचारक प्रा. संतोष वीरकर यांनी केला. ते रविवारी राहाता येथे संत सावता महाराज मंदिर प्रांगणात झालेल्या ओबीसी नेत्यांच्या आढावा बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
राहाता तालुका समता परिषदेच्या वतीने आयोजित या बैठकीस पद्मकांत कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली बारा बलुतेदार संघटना तसेच परिसरातील सर्व ओबीसी नेते उपस्थित होते. या वेळी प्रा. वीरकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्द्यावर आक्रमक भूमिका मांडली.
"ओबीसींच्या हक्काच्या महाज्योती महामंडळाला गेल्या दहा वर्षांत अवघे १५० कोटी रुपये अनुदान मिळाले. तर दुसरीकडे मराठा समाजासाठीच्या विविध महामंडळांना तब्बल २५,००० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. १० टक्के आर्थिक आरक्षण आणि ईएसबीसी अंतर्गत स्वतंत्र सवलती मिळवूनही मराठा समाजाला केवळ राजकीय घुसखोरीसाठीच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे," असे ते म्हणाले.
याविरोधात सर्व ओबीसी पोटजातींनी एकत्र येऊन छगन भुजबळ यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मंत्रिमंडळात १२ ओबीसी मंत्री असूनही केवळ मंत्री छगन भुजबळ एकटेच लढा देत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
धनंजय गाडेकर म्हणाले, "हक्काच्या मागण्या मांडण्यासाठी आणि हक्काच्या जागेवरील अतिक्रमण थांबवण्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र लढा उभारला पाहिजे. तसेच जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे."
पद्मकांत कुदळे म्हणाले, "हे कुणबीतून ओबीसीतून दिले जाणारे आरक्षण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व नोकरीवर प्रतिकूल परिणाम करणारे आहे. त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन 'हम भी कुछ कम नहीं' असे दाखवून द्यायला हवे."
यावेळी व्यासपीठावर समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, सचिव ताजणे, राहाता तालुका अध्यक्ष किशोर बोरावके, शहराध्यक्ष संतोष लोंढे, धनंजय गाडेकर, भागुनाथ गाडेकर, साहेबराव निधाने, भगवान टिळेकर, अॅड. विक्रांत वाकचौरे, बद्रीनाथ लोखंडे, बापूसाहेब वैद्य, दशरथ तुपे, हरिभाऊ गाडेकर, मनीष चितळकर, पाथरकर, भाऊसाहेब जेजुरकर यांच्यासह विविध समाजातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत संत सावता महाराज देवस्थानचे अध्यक्ष मच्छिद्र बनकर यांनी केले. संतोष लोंढे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष किशोर बोरावके यांनी केले.

