*प्रा.धनंजय देशमुख यांचा शिक्षकदिना निमित्त सन्मान*
इंदापूर: वडापुरी (ता. इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनंजय देशमुख यांना व्यसनमुक्तीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक ज्येष्ठ कीर्तनकार,युवकमित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन प्रा. देशमुख त्याचबरोबर उत्कृष्ट सूत्रसंचालक विजय फलफले,योगाचार्य विजल नवल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्त युवक संघाचे राज्याध्यक्ष दिपक जाधव, माजी अध्यक्ष शहाजी काळे(दौंड), मार्गदर्शक बाळासाहेब शेरेकर(कराड), नंदकुमार देशमुख (जेजुरी),समाधान पराडे ,सुनील पाटिल,विजय पराडे (सोलापूर जिल्हाध्यक्ष)आदी उपस्थित होते.
प्रा.धनंजय देशमुख यांनी व्यसनमुक्तीचे उल्लेखनीय कार्य करत असताना विधायक ३१ डिसेंबर-दारू नको,दूध प्या या उपक्रमाचे मागील १७ वर्षांपासून आयोजन करून अनेक युवकांना व्यसनांपासून परावृत्त केले आहे. त्याचबरोबर १ जानेवारी व्यसनमुक्त संकल्प दिन, पारंपरिक पद्धतीने होळी न करता चला व्यसनांची होळी करूया - निरोगी जीवन जगूया असे उपक्रम राबवतात. वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय,मंडळ या ठिकाणी ते व्यसनमुक्तीचे प्रबोधन करतात. योगशिक्षक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्राणायाम शिबिराच्या माध्यमातून अनेक युवकांना त्यांनी व्यसनमुक्त केले आहे. श्रीनाथ परीवार या सामाजिक समूहाच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेऊन त्यांना करिअर मार्गदर्शनही ते करतात. प्रा.देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रदान करून आजपर्यंत ३९ वेळा रक्तदान केले आहे. शालेय उपक्रमामध्ये व्यवसाय मार्गदर्शन शिबिर नोकरी भरती मिळावे याचे ते आयोजन करतात. प्रा. धनंजय देशमुख यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल इंदापूर तसेच वडापुरी परीसरातील अनेक जेष्ठ नागरिक ,मित्र परिवार यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याध्यक्ष दिपक जाधव यांनी तर सुत्रसंचलन व आभार जगन्नाथ शिंदे यांनी केले.