shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशिया चषकात नव्या विक्रमांचा बाजार सजणार ?

   

                  भारताच्या यजमानपदात युएईच्या संयोजनात आशिया कप २०२५ च्या तयारीने क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ही स्पर्धा मंगळवारी सुरू झाली तर अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवली जाईल. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात होत आहे, त्याचे सर्वात मोठे कारण पुढील वर्षी होणारा आयसीसी टी२० विश्वचषक आहे. आशिया कपमध्ये ही परंपरा राहिली आहे की त्याचे स्वरूप पुढील मोठ्या आयसीसी स्पर्धेनुसार ठरवले जाते.

                  या स्पर्धेत भारताचा विक्रम खूप प्रभावी राहिला आहे. आशिया कप टी२० चा हा तिसरा हंगाम असेल. पहिला हंगाम २०१६ मध्ये खेळविण्यात आला होता, जेव्हा टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर २०२२ मध्ये, ही स्पर्धा दुसऱ्यांदा टी२० स्वरूपात खेळवण्यात आली होती, जी श्रीलंकेने जिंकली होती. भारताने आतापर्यंत आशिया कप टी-२० मध्ये एकूण १० सामने खेळले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने ८ सामने जिंकले आहेत. त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे आणि हे दोन्ही पराभव २०२२ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध होते.

                  सन २०२५ च्या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ खेळत आहेत. यापैकी भारताने २०१६ आणि २०२२ मध्ये आशिया कप टी-२० मध्ये इतर सहा संघांविरुद्ध खेळले आहे. भारताने बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, हाँगकाँग आणि यूएई सारख्या संघांविरुद्ध मैदानात उतरले आहे. या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच ओमानविरुद्ध खेळणार आहे.


                आशिया कप टी-२० मध्ये आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दोन जिंकले आणि एक गमावला. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध एक सामना खेळला आणि तोही जिंकला. हाँगकाँग आणि यूएईविरुद्ध खेळलेल्या प्रत्येकी एका सामन्यात भारताने विजय मिळविला. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी एक जिंकला आणि एक गमावला.

                  आशिया कप वगळता एकूण टी-२० आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड पाहिल्यास, भारतीय संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. भारताने  पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग आणि यूएई या सात संघांविरुद्ध एकूण ७३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी ५५ मध्ये भारत विजयी झाला, १३ मध्ये पराभव पत्करावा लागला, तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.

                  भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध तर क्रिकेट चाहत्यांना १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वाधिक उत्सुकता आहे. सन २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच या स्वरूपात एकमेकांसमोर येतील. एकदिवसीय स्वरूपात, यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडले होते, ज्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला.

             आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली. सुरुवातीच्या वर्षांपासून २०१४ पर्यंत ही स्पर्धा फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळवली जात होती. २०१६ मध्ये पहिल्यांदाच ती टी२० स्वरूपात खेळवली गेली, जी भारताने जिंकली. त्यानंतर २०२२ मध्ये श्रीलंकेने दुसऱ्यांदा टी२० स्वरूपात आयोजित स्पर्धा जिंकली. सन २०१८ आणि २०२३ मध्ये ती एकदिवसीय स्वरूपात खेळवली गेली. भारत आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी संघ आहे. एकदिवसीय आणि टी२० दोन्ही स्वरूप एकत्रित करून, भारताने एकूण आठ वेळा विजेतेपद जिंकले आहे. श्रीलंका सहा वेळा चॅम्पियन राहिला आहे, तर पाकिस्तानने दोनदा ट्रॉफी जिंकली आहे.

                 यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवला जाणार आहे आणि या आवृत्तीत अनेक विक्रम मोडता येतील. भारतीय संघ आणि विराट कोहलीच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. विराट कोहली हा टी२० आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १० सामन्यांमध्ये ४२९ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रानने १९६ धावा केल्या आहेत. जर तो यावेळी फॉर्ममध्ये राहिला तर तो विराट कोहलीला मागे टाकू शकतो.


                  भुवनेश्वर कुमार टी२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने ६ सामन्यांमध्ये १३ विकेट घेतल्या आहेत. राशिद खान आणि हार्दिक पंड्या त्याच्या जवळ आहेत, त्यांनी ११-११ विकेट घेतल्या आहेत. हरिस रौफ आणि मोहम्मद नवाज यांनी ८-८ विकेट घेतल्या आहेत.

                 टी-२० फॉरमॅटच्या आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. टी-२० आशिया कपमध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध १२२ धावांची खेळी खेळली. बाबर हयातने हाँगकाँगसाठी १२२ धावाही केल्या आहेत. यावेळी कोणताही फलंदाज हा विक्रम मोडू शकतो.

               आशिया कप आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. त्याने २००८ मध्ये ३७८ धावा केल्या होत्या, तर मोहम्मद रिझवानने टी-२० स्वरूपात २८१ धावा केल्या आहेत. यापैकी रिझवानचा एक विक्रम मोडता येऊ शकतो.

                 भारत आणि श्रीलंकेला दोन टी-२० आशिया कप जिंकण्याची संधी आहे. भारताने २०१६ मध्ये आणि श्रीलंकेने २०२२ मध्ये टी-२० आशिया कप जिंकला. जर भारत आणि श्रीलंकेतील कोणत्याही संघाने यावेळी टी-२० आशिया कप जिंकला, तर तो एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपात एकापेक्षा जास्त आशिया कप जिंकणारा संघ बनेल.

                  सध्या तरी आशिया चषकात नव्या विक्रमांचा बाजार सजणार असेच दिसत आहे. तर बघूया बाजारात कोणाला काय भाव मिळतो व कोण करंडकाचा वेध घेतो ?     

@ डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close