shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संयोजकांचा आडमुठेपणा ; तिकीट विक्री रखडली



                सन २०२५ च्या आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महास्पेशल सामना सध्या जास्तच चर्चेत आहे. एक तर ऑपरेशन सिंदूर नंतर असंख्य भारतीय चाहते टिम इंडियाने पाकिस्तानविरूध्द खेळूच नाही या मताचे आहेत, तर त्या उलट भारत सरकार व बीसीसीआय खेळ व राजकारण यांच्यात गफलत होणार नाही याची दक्षता घेत आहे. याचे कारण म्हणजे आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करून आयसीसीचा रोष व कारवाई टाळणे हे होय. शिवाय भारत या स्पर्धेचे संयोजक आहे. त्यामुळे टिम इंडियासमोर पाकविरुध्द खेळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. दरम्यान दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आहे की, १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याची तिकिटे अद्याप पुर्ण विकली नाहीत, याचा अर्थ सध्या तरी स्टेडियम हाऊसफुल्ल झालेले नाहीत. क्रिकेट प्रेमींसाठी हा सामना केवळ एक खेळ नसून भावनांचा संघर्ष आहे. म्हणूनच दरवेळी भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली जातात. पण यावेळी चित्र थोडे वेगळे आहे. आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, क्रिकेट जगतातील सर्वात मोठा सामना आतापर्यंत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये आणण्यात अपयशी का ठरला आहे ?

                याचे महत्वाचे कारण म्हणजे यावेळी आयोजकांनी तिकीट प्रणालीत मोठा बदल केला आहे. पूर्वी चाहते भारत-पाकिस्तान सामन्यासाठी थेट तिकिटे खरेदी करू शकत होते, परंतु यावेळी त्यांना संपूर्ण गट साखळीतील पॅकेज खरेदी करावे लागेल. याचा अर्थ असा की भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांना एकूण सात सामन्यांची तिकिटे एकत्र खरेदी करावी लागतील. क्रिकेटप्रेमींना ही प्रणाली आवडली नाही. अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांना फक्त भारत-पाकिस्तान सामना पहायचा आहे आणि इतर सामन्यांमध्ये रस नाही. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आयोजकांनी हे पॅकेज फक्त गट साखळीचे सामने पाहण्यासाठीच मर्यादित केले आहे. म्हणजेच, सुपर-४ आणि अंतिम सामने त्यात समाविष्ट नाहीत. चाहत्यांचा असा विश्वास आहे की जर पॅकेजमध्ये नॉकआउट सामने देखील समाविष्ट केले असते तर हा खर्च योग्य ठरला असता, परंतु सध्या ही प्रणाली एक अतिरिक्त भार असल्यासारखे दिसते आहे.

                यावेळी तिकिटांच्या किमतीही चर्चेचा विषय आहेत. सामान्य प्रवेश तिकिटाचे मूल्य ४४० दिरहम (सुमारे ₹ १०,५६५) पासून सुरू होते. त्याच वेळी, प्रीमियम हॉस्पिटॅलिटी पॅकेज ६०,५०० दिरहम (सुमारे ₹ १४.५ लाख) पर्यंत पोहोचत आहे. इतकेच नाही तर, ट्रॅव्हल एजन्सींनी या सामन्यासाठी विशेष पॅकेजेस तयार केल्या आहेत, ज्यामध्ये तिकिटे आणि हॉटेल्सचा समावेश आहे. या पॅकेजेसची किंमत ₹ ५१,००० ते ₹ १.५७ लाखांपर्यंत आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमींसाठी इतका जास्त खर्च करणे शक्य नाही. यामुळेच अनेक लोक सोशल मीडियावर मागणी करत आहेत की, आयोजकांनी एकाच सामन्याची तिकिटे लवकरात लवकर जारी करावीत.

               माध्यमांच्या वृत्तानुसार, विमान आणि हॉटेल्सच्या किमतीही गगनाला भिडत आहेत. दुबईला पोहोचण्याचा खर्चही चाहत्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. १३ आणि १४ सप्टेंबरच्या आसपासच्या विमानांची मागणी इतकी वाढली आहे की भाडे दुप्पट झाले आहे. मुंबई ते दुबई विमानाचे भाडे ₹११,००० पासून सुरू होते. दिल्ली ते दुबई तिकीट सुमारे ₹१५,००० पर्यंत पोहोचले आहे. सामना जवळ येताच परतीच्या विमानाच्या तिकिटाची किंमत ₹२५,००० ते ₹४०,००० पर्यंत पोहोचू शकते.

                 हॉटेल्सची परिस्थितीही वेगळी नाही. बजेट हॉटेल्स प्रति रात्र सुमारे ₹५,००० मध्ये उपलब्ध आहेत. ३ ते ४ स्टार हॉटेल्स ₹९,००० ते ₹१२,००० दरम्यान आहेत. ५ स्टार लक्झरी हॉटेल्स ₹१८,००० आणि त्याहून अधिक किमतीत मिळतात, विशेषतः दुबईच्या डाउनटाउनसारख्या भागात. अनेक ट्रॅव्हल एजन्सींनी हॉटेल आणि मॅच तिकिटांचे संयोजन करणारे पॅकेजेस तयार केले आहेत, ज्यांच्या किमती प्रति व्यक्ती ₹७६,००० ते ₹८८,००० पर्यंत आहेत (३ ते ४ दिवसांसाठी).

                संयोजकांना एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की, कोणतीही स्पर्धा म्हंटली की, त्यातील भारत -पाक सामन्यांचे तिकीटे हातोहात विकले जातात. मात्र इतर संघाच्या सामन्यावेळी स्टेडियम्स मोकळेच असतात. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा होतो. तो होऊ नये म्हणून त्यांनी हा पर्याय वापरला आहे. मात्र सध्या त्यांचा डाव त्यांच्यावरच सध्या तरी बुमरँग झालेला दिसतो. संयोजकांनी तिकीट विक्रीत आडमुठेपणा कायम ठेवला तर ही स्पर्धाच संकटात येऊ शकते. त्यामुळे त्यांना आपला आडमुठेपणा सोडून सर्वांना सुखकर मार्ग शोधावाच लागेल.

@ डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close