shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशिया चषकात नेत्रदिपक गोलंदाजी करणारे गोलंदाज

 भारताच्या यजमान पदाखाली युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषक २०२५ ची उलटी गिणती सुरू झाली आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. क्रिकेट हा नेहमी फलंदाज व गोलंदाजांच्या अविस्मरणीय कामगिरीला ध्यानात ठेवून सन्मान मिळवून देणारा खेळ आहे. फलंदाज व गोलंदाजांच्या जुगलबंदीत सर्वात जास्त आनंद मिळतो तो क्रिकेटच्या असंख्य चाहत्यांना. मग ते सामन्याचा आनंद प्रत्यक्ष मैदानात येऊन घेत असो अथवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात टिव्हीवर त्याचा आस्वाद घेत असो. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात नेहमीच बॅट आणि बॉलमध्ये तीव्र स्पर्धा राहिली आहे. या स्पर्धेत काही गोलंदाज असे होते ज्यांच्यासमोर जगातील महान फलंदाज धावांची भीक मागताना दिसले. त्यामध्ये अनेक देशांचे एकाचढ एक वेगवान गोलंदाज होते, तर काही बोटांच्या जादूवर आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नृत्य करायला लावणारे फिरकी गोलंदाजही होते. अशाच काही महान गोलंदाजांच्या नेत्रदिपक कामगिरीचा आढावा आपण प्रस्तुत लेखात घेणार आहोत.

                आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा विचित्र शैलीचा व भयावह भावमुद्रा असलेला ऑफस्पिन गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचे नाव अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत मुरलीधरनच्या फिरकीची जादू अद्भुत होती. त्याने आशिया कपमध्ये खेळल्या गेलेल्या २४ सामन्यांमध्ये एकूण ३० गडी बाद केले. श्रीलंकेच्या या महान फिरकी गोलंदाजाने ३१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या, जे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन देखील होते. हाच मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे हे आपणास ठाऊक असेलच.

               श्रीलंकेचा आगळी वेगळी गोलंदाजी अॅक्शन असलेला व आशिया चषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे वेगवान लसिथ मलिंगा. मलिंगाने या स्पर्धेत फक्त १४ सामने खेळले आहेत, पण त्याने एकूण २९ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठविले आहे. मलिंगाने तीन वेळा डावात ५ बळी घेतले आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी ३४ धावांत ५ बळी ही होती.

                सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर देखील श्रीलंकेचाच गोलंदाज आहे. तो आहे मिस्ट्री स्पिनर म्हणून जाणारा अजंथा मेंडिस. त्याने ८ सामन्यांमध्ये एकूण २६ बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी १०.४२ होती. मेंडिसने सदर स्पर्धेत खेळताना दोनदा एकाच सामन्यात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

              आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या पाकिस्तानचा वादग्रस्त शैलीचा फिरकी गोलंदाज सईद अजमल हा आहे. अजमलने या स्पर्धेत खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये एकूण २५ बळी घेतले आहेत.  त्याचा इकॉनॉमी रेट १९.४० इतका होता.

              आशिया कपमध्ये भारताकडून रविंद्र जडेजा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या स्पर्धेत खेळलेल्या १८ सामन्यांमध्ये जडेजाने एकूण २५ बळी घेतले आहेत. विद्यमान आशिया चषक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही, कारण त्याने टी-२० प्रारूपातून निवृत्ती जाहीर केली आहे.

               टी-२० आशिया चषकामध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत भुवनेश्वर कुमार अव्वल आहे. भुवीने ६ सामन्यांमध्ये १३ बळी घेतले आहेत. आशिया कप टी-२० मध्ये एका डावात पाच बळी घेणारा भुवनेश्वर कुमार हा एकमेव गोलंदाज आहे. 

              आता होऊ घातलेल्या या स्पर्धेत सहभागी होत आठ संघांकडून अनेक मातब्बर जलदगती, मध्यमगती, ऑफस्पिन, लेगस्पीन, चायनामन, मिस्ट्री स्पीन करणारे गोलंदाज आपल्या दिसतील. वास्तविक टी२० क्रिकेट हे धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचे वर्चस्व असणारा खेळ असून त्यात गोलंदाज कोणताही असो त्याच्यावर सर्वच फलंदाज तुटून पडतात. अशा मारझोडीच्या प्रसंगी बरेचसे गोलंदाज कुटले जातात. मात्र काही जिगरबाज गोलंदाज अशा उधळू पाहणाऱ्या फलंदाजांना निव्वळ आवरण्याचेच नाही तर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. सदर स्पर्धेतही बॅट व चेंडूच्या जुगलबंदीत गोलंदाज आपला जलवा दाखवतील व क्रिकेट रसिकांना मोहित करतील अशी आशा करूया.

@ डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close