📰 शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा
अंबरनाथ (प्रतिनिधी): जगदिश काशिकर
अंबरनाथ पूर्व व पश्चिम नगरपरिषद हद्दीत बेकायदेशीर व विनापरवाना उभारलेल्या ढाबे, पानटपऱ्या, जुगार अड्डे, क्रिकेट-फुटबॉल टर्फ शेड यांसारख्या अनधिकृत बांधकामांविरोधात तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा समाजसेवक केवल विकमनी यांनी दिला आहे.
या संदर्भात मुक्त पत्रकार आणि कायदे सल्लागार जगदीश का. काशिकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना सविस्तर अंतिम निवेदन सादर केले असून, अंबरनाथ परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा गंभीर मुद्दा पुढे आणला आहे.
निवेदनानुसार, अंबरनाथच्या पालेगाव, बारकुपाडा, शिवमंदिर परिसर, चिखलोली पाडा, टी-जंक्शन, डिमार्ट जवळ, NMRL नेवल कंपनी व लोकनगरी परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना ढाबे, टपऱ्या, टर्फ शेड आणि जुगार अड्डे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी काही ठिकाणी दारू, हुक्का, चरस, गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
विकमनी यांनी म्हटले आहे की,
“रात्री उशिरापर्यंत हे टर्फ शेड आणि ढाबे सुरु असतात. तरुण मुले-मुली येथे व्यसनाधीन होत आहेत. नगरपरिषद अधिकाऱ्यांनी हफ्ते घेऊन या अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याचे दिसून येते.”
तसेच, या बांधकामांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी ठाणे जिल्हाधिकारी आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्यावर राहील, असा ठाम इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
विकमनी यांनी पुढे सांगितले की,
“जर पुढील १५ दिवसांत या अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. तसेच ३००-५०० सामाजिक कार्यकर्त्यांसह शांततामय आंदोलन आणि उपोषण छेडण्यात येईल.”
पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की,
“नंतर दुर्घटनेनंतर मदत रक्कम देण्यापेक्षा आधीच प्रशासनाने दक्षता घेऊन सर्व बेकायदेशीर बांधकामे तोडून साफसफाई अभियान राबवावे.”
या निवेदनानंतर अंबरनाथ परिसरात नागरिकांमध्येही प्रशासनाच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह
(भ्रष्टाचारविरोधी आवाज — जनतेसाठी लढणारे माध्यम)
००००

