तसे आम्हाला दिवाळीचे वेध दिवाळीच्या आधी महिना पंधरा दिवस अगोदरच लागून जायचे. मग सगळ्यांची आकाश कंदील तयार करण्याची जय्यद तयारी चालू व्हायची, त्यासाठी बांबू आणून त्याच्या कामट्या करणे मग त्या एकमेकांना दोऱ्याने बांधून सुंदर आकाशकंदील तयार व्हायचा. त्यावेळी त्यात लाईट लावला जात नसे तर आतमध्ये पणती ठेवायला एक चौकोन तयार केला जात असे . अशा तऱ्हेने निरनिराळ्या आकाराचे आकाशकंदील जसे विमान, पंचकोनी चांदणी, षटकोनी चांदणी तयार केले जायचे. त्यानंतर त्याला पारदर्शक रंगीत कागद किंवा ताव चिकटवला जाई. अशा घरी केलेल्या आकाशकंदील यामुळे मुलांची कलात्मकता वाढीस लागत होती. आणि त्यामुळे एक आत्मिक समाधान मिळायचे.त्यात खूपच मजा यायची आणि आनंद मिळायचा. जसजशी दिवाळी जवळ येऊ लागते तसतसे फटाक्यांचे दुकाने थाटली जात, त्यावेळी दिवाळीची सुटी एकवीस दिवस असायची. मग खिशात अगदी एक आणा असला तरी टिकल्याची डबी घेऊन टिकल्या फोडत बसायचा छंद लागायचा. त्यावेळी टिकल्याचा रोल अस्त्वित्वात आलेला नव्हता टिकल्या ची एक छोटी गोल डबी असायची त्यावर खारुताईचे चित्र असायचे. आत लाल कुंकवाच्या टिकलीच्या आकाराऐवढ्या टिकल्या असायच्या ह्या टिकल्या फोडण्यासाठी एक सपाट पट्टिसारखी एक बंदूक असायची. काही जण स्वयंपाक घरातील चिमट्यात टिकली ठेवून तो चिमटा दगडावर जोरात आपटला की टिकली फुटायची, नाहीतर सगळ्या टिकल्या एका कागदावर ओतून तो कागद पेटवून द्यायचो मग सगळ्या टिकल्या एका मागोमाग पटापट फुटायच्या. काही शूर वीर बोटाच्या चिमटीत टिकली ठेवून फरशीवर जोरात घासून टिकल्या फोडायचे, त्याचे मात्र खूपच अप्रूप वाटायचे. दिवाळी आणखी जवळ येवू लागली की घरात बायकामुलींची धांदल उडायची. आई चकलीचे पीठ करण्याची तयारी करायची , संजोर्याचे सारण तयार करणे अशी कामे सुरू व्हायचे.
संपूर्ण वातावरण दिवाळी येणार या कल्पनेने भारावून जात असे. कुंभार पणत्या करण्यात मग्न होत असत. त्यावेळी रंगीबेरंगी कलात्मक पणत्यांचा जन्म झालेला नव्हता. कुंभार दारोदार फिरून साध्याचं पणत्या अगदी शेकड्याने विकत असतं. हळू हळू दिवस पुढे सरकत जायचे, तसतशी दिवाळी कधी येईल असे होऊन जायचे. बहिणी, मुली रांगोळ्यांची पुस्तके शोधून कोणत्या दिवशी कोणती रांगोळी काढायची हे ठरवून ठेवीत.त्यावेळी आजसारखे रांगोळीचे छापे नव्हते त्यामुळे मुलींच्या कलेचे कसब पणाला लावले जाई. शेजारच्या अंगणातील रांगोळीचे सुद्धा कौतुक केले जायचे. " भला तेरी रांगोळी मे रांगोलीसे अच्छी कैसे? असा प्रश्न कधीच पडत नसे. रांगोळीचे ठिपके सरळ रेषेत यावे म्हणून एका चौकानी कागदाला सरळ उभे आडवे ठिपके उदबत्ती ने छिद्रे पाडून एक ठिपक्यांच्या कागद तयार केला जायचा, बहुतेक हे काम भावांवर सोपवले जायचे. बहीण भाऊ मित्र अगदी खेळीमेळीने दिवाळीच्या तयारीला लागत.सर्व मिळून किल्ले बनवले जाई. वाट पाहता पाहता दिवाळी जवळ यायची. प्रथम गाय गोहऱ्यांची बारस ,त्या दिवशी दारापुढे गाय आणि वासरू आणून त्याची पूजा केली जायची. त्यानंतर धन त्रयोदशी ही बहुतेक व्यापारी मंडळी वही पूजन, दागिने ठेवून पूजा करत असत. आणि मग त्यानंतर लक्ष्मीपूजन त्या दिवशी मुलांच्या उत्साहाला उधाण आलेले असायचे. पहाटे अभ्यंग स्नानापास न सुरवात व्हायची. आई सर्वांना पहाटे उठवून देई, काही वेळ पहाटे उठायचे जीवावर यायचे कारण पांघरूण काढताच अंगात थंडी भरायची, पण उठल्यावर मात्र खूप मजा यायची. जो कोणी सूर्योदय झाल्यावर अंघोळ करेल तो नरकात पडेल ही समजूत मनावर पक्की ठसलेली असायची. त्यावेळी आमचे मन खूपच निष्पाप, निर्मळ होते. मीठ सांडायचे नाही, सांडले तर डोळ्याच्या पापणीने भरावे लागते, दिवाळीत सूर्योदयापूर्वी अंघोळ केलीच पाहिजे नाहीतर नरकात जाणार ह्या समजुती वर ठाम विश्वास होता. पापणी ने सांडलेले मीठ कसे उचलता येईल हा विचार सुद्धा मनाला कधीच शिवला नाही. मग पहाटेच्या त्या कडाक्याच्या थंडीत गरम पाण्याने अंघोळी व्हायच्या. आंघोळीच्या अगोदर आम्हाला पाटावर बसवून पाटाभोवती रांगोळी काढून अंगाला तेल लावले जाई. तेल म्हणजे खोबरेल तेलात चार थेंब अत्तर किवा सुगंधी तेल मिसळले जाई. आई आम्हाला पाटावर बसवून हाता पायांना तेल लावून पाठीला, छातीला तेल लावून देई, छातीला तेल चोळताना खूपच गुदगुल्या होऊन आम्ही हसत राहायचो तेव्हा मात्र " गप्प बैस" हे ऐकावे लागायचे. मग त्यानंतर अंघोळीला बसायचे, अंगाला उटणे लावल्याशिवाय अंघोळ होतं नसे, अर्धी अंघोळ झाली की आई ताम्हणात निरांजन घेऊन आम्हाला कुंकू लावून ओवळत असे, त्यावेळी थंडीने दात कडकड वाजत असे. बाथरूम बाहेर एखादे लहान भावंड हातात फुलबाजी लावून ओवाळत म्हणत असे ", दिन दीन दिवाळी गाय म्हशी ओवाळी, गाइम्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या....." असे गाणे म्हणत बसे.पण अभ्यंग स्नान फक्त मुले आणि पुरुष यांनाच करणे बंधनकारक असे, मुलींना मात्र सूट असायची त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडे मग मुली का नरकात जातं नाही ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. अंघोळ करून बाहेर येताच शेव, चकली तळण्याचा खमंग वास घरात दरवळत असे, मग काय फराळावर ताव मारायला सूरवात व्हायची. शेव, चकल्या भरभर संपवून शंकरपाळी खिशात कोंबून आम्ही बाहेर धूम ठोकायची. बाहेर कालचे न फुटलेले फटाके वेचून दारू काढणे अन् टिकल्या फोडण्यात दिवस भरकन निघून जायचा.मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी मजा यायची. सर्व बहीण भावांडाना समोर बसवून फटाके वाटले जायचे. त्यात जास्त करून लवंगी फटाके, फुलबाज्या, कोठ्या, भुईचक्कर जास्त असायचे. लवंगी फटाक्याची लड आम्हीच कधीच लावली नाही, तर त्यातले सगळे फटाके मोकळे करून एक एक फ टाका फोडण्यात मजा यायची. मोठे भावंड मात्र सुतळी बॉम्ब, रॉकेट फोडायचे. सुतळी बॉम्ब लावताना उदबत्ती ने पेटवयचा कारण फुलबाजीने तो पेटला आहे की नाही हे समजायचे नाही. सुतळी बॉम्ब फोडतांना सर्व चिल्ले पिल्ले कानावर हात घट्ट धरून ठेवीत, अन् तो फुटेपर्यंत सस्पेन्स असायचा. लवकर फुटला नाही तर दादा हळूच दबक्या पावलाने एक एक पाऊल पुढे जायचा अन् वात विझली आहे ना ? याची खात्री करूनच पुन्हा पेटवायचा. रॉकेट एका काचेच्या बाटलीत ठेवून उडविले जाई पण ते नेमके तिरपे उडून समोरच्या घराच्या भिंतीवर धडकायचे. लक्ष्मी पूजेनंतर दुसरा दिवस पाडव्याचा. तरीही त्या दिवशी सकाळी फुसके फटाके वेचून त्यातली दारू कागदावर काढून ती पेटवायची हा उद्योग असायचाच. पाडव्याला आई ठेवणीतल्या साडीतील एखादी छान साडी नेसून, गजरा माळून तयार व्हायची, त्यावेळी मला ती साक्षात लक्ष्मीचं भासायची. संध्याकाळी बाबांना ओवाळताना त्यांनी तबकात टाकलेले शंभर रुपये पाहून तिच्या ओठावर जे स्मित हास्य उमटायचे ते मी आयुष्यात कधीच विसरू शकलो नाही. आता जाणवते किती अल्पसंतुष्ट आणि समाधानी होती नाही तेव्हाची पिढी! आज आम्हाला खंडीभर मिळाले तरी समाधान होतच नाही. त्यानंतर भाऊबीज यायची . खणाचे परकर पोलके घालून ताई मला ओवालायची तिच्या तबकात बाबांनी दिलेली दहाची नोट टाकायची, मग दुसऱ्या भावाने तीच नोट परत तबकात टाका यची. ते पैसे घेऊन ती आनंदाने पळायची, त्यावेळी तिला त्या दहा रुपयाचे मोल किती आहे हे देखील समजायचे नाही. किती साधे, सोपे अन् सरळ दिवस होते नाही ते! नव्हती स्पर्धा, नव्हता दिखावा होते फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम...... आज मात्र मला माझ्या मुलांच्या, नातवांच्या हरवलेल्या बालपणाची खंत वाटते.आज आपण प्रत्येक सणातला आनंद ,उत्सुकता ,मजा घालवून बसलो आहे. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा किती आनंद भरलेला असतो हे आपण शोधतच नाही. असो कालाय तस्मै नमः
प्रा दिलीप आ. जाधव
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.