जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
ही घटना २०१० च्या जानेवारी महिन्यातली आहे. ख्यातनाम मराठी लेखिका गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नागपुरात आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या धनवटे दालनात आयोजित या प्रकाशन समारंभ समारंभात डॉ. मंगेश कश्यप यांनी गिरीजाताईंची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी डॉ. कश्यप यांनी गिरीजा ताईंना एक प्रश्न विचारला. "तुम्ही मूळच्या कोल्हापूरच्या, त्यानंतर तुम्ही शिक्षणासाठी आणि लग्न करून मुंबईत स्थायिक झाल्या. तिथेच तुमची साहित्यिक वाटचाल झाली, आणि आतापर्यंतची पुस्तकेही तिथेच प्रकाशित झाली. आता हे शंभरावे पुस्तक कोल्हापूर आणि मुंबई सोडून ८०० किलोमीटर दूर नागपुरात प्रकाशित होते आहे. याकडे तुम्ही कसे काय बघता?". 
त्यावर गिरीजाताईंनी तात्काळ उत्तर दिले " मी जरी आधी कोल्हापूरची आणि मग मुंबईची असले, तरी नागपूर हे माझे वांङमयीन माहेर आहे. नागपुरात दोन घरे अशी आहेत की ज्यांना मी माहेर मानते. त्यातले एक विख्यात ज्येष्ठ साहित्यिक कै. वामनराव चोरघडे यांचे घर, वामनरावंनी मला आपली वांङमयीन मुलगी मानले होते. शेवटपर्यंत त्यांनी माझ्यावर तसेच प्रेम केले. आजही त्याच्यानंतर त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत आणि सर्वच चोरघडे कुटुंबीय मला तेच माहेरवाशीणीचे प्रेम देतात. त्यामुळे ते माझे एक माहेर आहे, आणि दुसऱे माहेर नागपुरातलाच एक पत्रकार अविनाश पाठक यांचे घर, अविनाशला मी माझा धाकटा भाऊ मानते. अविनाशने आणि त्याच्या परिवाराने देखील मला तेच प्रेम आणि तोच मान दिला आहे. त्यामुळे ते देखील माझे एक माहेरच आहे, आणि आज हा प्रकाशन समारंभ आटोपल्यावर मी माझ्या या दोन्ही माहेरी जाणारही आहे." 
गिरीजाताईंचे हे उत्तर ऐकून त्या सभागृहात असलेले सर्वच मान्यवर चमकले. त्यातले अनेक जण मला ओळखणारे होते. त्यात प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक सुरेश  द्वादशीवार होते, समाजसेवक गिरीश गांधी होते, आणि इतर अनेक मान्यवर मंडळी होती. त्यादिवशी रात्री अनेक पत्रकार मित्रांनी मला फोन करून "तू गिरिजाताईंचा भाऊ कसा?" हा प्रश्न विचारला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी गिरिजाताई आणि मंगेश कश्यप माझ्या घरी यायचे होते. हे कळल्यावर अनेक पत्रकार मित्रांनी "आम्ही तुझ्याच घरी येतो आणि त्यांची मुलाखत घ्यायची आहे, तेवढे तू मॅनेज करून दे" म्हणूनही गळ घातली होती. 
गिरीजाताई या मराठीतल्या नामवंत साहित्यिकांपैकी एक होत्या. अपघातानेच त्यांची माझी ओळख झाली आणि कसे काय तर स्नेहबंध जुळले. ते स्नेहबंध तब्बल ४३ वर्ष टिकले होते. अजूनही त्या परिवाराशी माझे संबंध आहेत. मला आठवतंय २००८ मध्ये माझ्या "दाहक वास्तव" या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. त्यावेळी गिरीजाताईंनी प्रमुख अतिथी यावे म्हणून मी त्यांना आग्रह धरला होता. माझ्या आग्रहाचा मान ठेवत त्या आवर्जून आल्या. त्यावर्षीच गिरिजाताई ७५ वर्षांच्या झाल्या होत्या. माझ्या या पहिल्या पुस्तक प्रकाशनाला नितीन गडकरी, प्राचार्य राम शेवाळकर ,पत्रकार सुधीर पाठक असे सर्वच मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हे निमित्त साधून गिरिजाताई ७५ वर्षांच्या झाल्यानिमित्ताने आम्ही पाठक परिवारातर्फे त्यांना साडीचोळी देऊन आणि खणा नारळाने ओटी भरून त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी बोलताना देखील गिरिजाताईंनी "हा माहेरचा सत्कार आहे, त्यामुळे ही माहेरची साडी मी निश्चितच नेसणार" असे जाहीरही केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मुंबईहून येताना त्यांनी माझ्यासाठी पॅन्ट पीस  माझी पत्नी सौ अनुरूपासाठी साडी आणि माझ्या मुलीसाठी एक भेटवस्तू अशीही आणली होती. "हे कशासाठी?" असे मी म्हणताच "मी तुझ्याहून मोठी आहे. तू मला ताई म्हणतोस आणि मी तुला लहान भाऊ म्हणते, मग लहान भावाच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाचे मी कौतुक करायला नको का?" असे म्हणून त्यांनी तो अहेर घ्यायलाही लावला होता.
आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज ३१ ऑक्टोबर. आज गिरिजाताईंचा सहावा स्मृतिदिवस. त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या होणे हे सहाजिकच आहे. गिरिजाताईंवर आजवर मी अनेक लेख लिहिले आणि त्यांच्या अनेक आठवणी देखील लिहिल्या आहेत. त्यामुळे नवीन काय लिहायचे हा प्रश्नच होता. तरीही माझ्या "आयुष्यातले सांगाती" या मालिकेत मी गिरिजाताईंवर लिहिले नाही तर ही मालिकाच अपूर्ण राहील असे वाटल्यानेच आज काही जुन्या तर काही नव्या आठवणी लिहायचे ठरवले आहे.
गिरीजा ताईंची आणि माझी ओळख झाली ती १९७६ ला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झालेल्या पहिल्या वैदर्भीय लेखिका साहित्य संमेलनात या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्या आल्या होत्या. तर त्यावेळी मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून विदर्भात नुकताच कार्यरत झालो होतो. मला मुंबई दूरदर्शन कडून या संमेलनाचे वृत्तचित्रण करून पाठवण्याचे निर्देश आले होते. म्हणून मी तिथे गेलो होतो. 
अर्थात गिरिजा कीर हे नाव मला अगदी शालेय जीवनापासून परिचित होते. लहानपणी आमच्या घरी आईच्या आवडीची मराठी मासिके एका फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून यायची. त्यात दर महिन्याला अनुराधा हे मासिकही यायचे. त्यावेळी गिरीजा ताई अनुराधाच्या संपादिका होत्या. त्यातला बालविभाग हा आम्हा भावंडांच्या फार आवडीचा. विशेष म्हणजे त्यात एक बाल नाट्य देखील असायचे. ते गिरिजाताईंनीच लिहिलेले असायचे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे साहित्य वाचत वाचतच मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. वणीला उद्घाटक म्हणून गिरीजा ताई येणार आल्या आहेत हे कळल्यावर मला विशेष आनंद झाला. योगायोगाने तिथल्या शासकीय विश्रामगृहात त्यांची आणि माझी राहण्याची सोय करण्यात आली होती. आजूबाजूलाच आमच्या खोल्या होत्या. मग तिथे आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्या दोन दिवसातच आमची खूप जुनी ओळख असल्यासारखे आम्ही जवळ आलो. वणीहून नागपूरला परत आल्यावर दोन दिवस त्यांचा मुक्काम मामा गंधेंच्या घरी होता. तिथेही त्यांची माझी भेट झाली होती. त्यांनी मला मुंबईचा त्यांच्या घरचा पत्ता दिला आणि मुंबईत आल्यावर तू मला भेट असे सुचवले होते. 
त्यानंतर अवघ्या दहा-बारा दिवसातच मला कामाने मुंबईला जावे लागले. त्यावेळी आवर्जून मी गिरीजा ताईंच्या वांद्रे येथील निवासस्थानी गेलो. त्या घरीच होत्या. सोबत त्यांचा मुलगा प्रफुल्ल आणि त्यांचा आवडता बोका ठबू हा देखील होता. माझे त्यांनी अगदी छान स्वागत केले. त्या भेटीत त्यांनी मला त्यांचा "देवखुणा" हा नवा कथासंग्रह देखील सप्रेम भेट दिला होता. 
त्यानंतर माझा आणि गिरीजाताईंचा नियमित पत्रव्यवहार तर सुरू झालाच, पण आमच्या भेटी देखील सुरू झाल्या. दरवेळी मी मुंबईला गेलो की हमखास त्यांना भेटत असे. त्या देखील तितक्याच आपुलकीने माझे स्वागत करायच्या आणि पाहुणचार देखील करायच्या. नागपूरला आल्या की त्यांचा फोन यायचा आणि मग आमची भेट होत असे. एकदा त्या माझ्याच घराजवळ असलेल्या डॉ. सुनील सुभेदार यांच्या निवासस्थानी मुक्कामी होत्या. मग तिथून त्या माझ्या घरी देखील आल्या होत्या. त्यावेळी माझी आई माझ्या बहिणी माझे वडील सगळ्यांशी त्यांनी आवर्जून परिचय करून घेतला होता. 
गिरीजाताई माझ्या तुलनेत वयाने बऱ्याच ज्येष्ठ होत्या. एकदा अनुराधाच्या ऑफिसमध्ये मी त्यांना भेटायला गेलो. तिथे त्यांच्या एक लेखनिक देखील सोबत होत्या. थोड्याच वेळात त्या तिथून वांद्रेला जायला निघाल्या. मी सुद्धा त्यांच्याबरोबर यावे असा आग्रह केला. त्यामुळे मी देखील त्यांच्याबरोबर बसमध्ये चढलो. नंतर माझा बेत बदलला आणि मी मध्येच उतरून जाईन असे त्यांना बोललो. त्यानुसार रस्त्यात दादरला एका सिग्नलवर बस थांबली  तसा मी पटकन उतरून गेलो. गडबडीत गिरीजा ताईंना सांगायचे विसरलो. काही वेळाने त्यांच्या ते लक्षात आले असावे. मग त्या अस्वस्थ झाल्या. त्यावेळी आजच्या तुलनेत मुंबईत मी नवीनच होतो. त्यामुळे त्यांना काळजी वाटू लागली. मी कुठे उतरलो, कुठे गेलो असेल, हे प्रश्न त्यांना भेडसावू लागले. नंतर त्यांनी मला घरी पत्र टाकावे असा विचार केला. मात्र त्यांनी तोही विचार रद्द केला. कारण हा नागपूरला पोहोचला नसेल तर घरचे उगाचच काळजीत पडतील असे त्यांना वाटले. नंतर नागपूरहून मी त्यांना पत्र टाकले. ते पत्र मिळाल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला होता. महिनाभरानेच नागपुरात मामा गंधेंच्या मुलाच्या लग्नाला गिरिजाताई आल्या असताना त्यांनी मला "तू अचानक कुठे हरवला होतास?" म्हणून चांगलेच धारेवर धरले होते. त्यावेळी त्यांच्या रागावण्यातही एक आपुलकी जाणवत होती.
कितीही प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध असले तरी गिरीजाताई या व्यवहाराला अतिशय  चोख होत्या. त्यांचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. एका वर्षी त्या एका दिवाळी अंकासाठी काही मुलाखती घ्यायला म्हणून नागपुरात आल्या होत्या. त्यात त्यांनी वामनराव चोरघडे आणि डॉ. सुनील सुभेदार या दोघांच्याही मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलाखतींचे त्यांना फोटो काढून हवे होते. त्यांनी मला बोलावले. त्यावेळी मी व्यावसायिक फोटोग्राफर म्हणूनही काम करत असे. दोन्ही ठिकाणचे दोन्ही मुलाखतींचे फोटो काढले आणि नंतर त्याचे प्रिंट त्यांना मुंबईला पोस्टाने पाठवले. फोटो काढले तेव्हाच त्यांनी मला फोटो पोस्टाने पाठव आणि सोबत बिल सुद्धा पाठव असे कळवले होते. मात्र मी संकोचापोटी फोटो सोबत बिल काही पाठवले नाही. नंतर सुमारे दोन महिन्यांनी एक दिवस  गिरिजाताईंचे पत्र आले. त्यावेळी लोकमत मध्ये आबा डोंगरे नामक संपादक होते. ते गिरीजा ताईंचे मुंबईतले शेजारी होते. आबा डोंगरे नागपूरला येत असून त्यांच्याबरोबर तुझ्यासाठी काही साहित्य पाठवले आहे, ते त्यांना भेटून घेशील असे त्यांनी कळवले होते. त्यानुसार मी आबा डोंगरे यांच्या घरी गेलो. तर सोबत दिवाळी अंक आणि एका लिफाफ्यात एक पत्र आणि त्यांनी अंदाजाने लावलेली बिलाची रक्कम टाकली होती. पत्रात त्यांनी लिहिले देखील होते. "तुला मला बिल  पाठवायला संकोच वाटला असेल, त्यामुळे माझ्याच मनाने मी तुला काही रक्कम पाठवते आहे. कमी वाटल्यास तसे कळवशील" असे त्यांनी लिहिले होते. नंतर प्रत्यक्ष भेटल्यावर मी बिल का पाठवले नाही म्हणूनही त्या रागावल्या होत्या. 
बरोबरीच्या व्यक्तीच्या चांगल्याच फिरक्या घ्यायच्या हा गिरीजा ताईंचा आवडता उद्योग होता. एकदा अकोल्यात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होते. त्याचे चित्रीकरण करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. गिरिजाताई देखील तिथे आल्या होत्या. तिथे विख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यादेखील होत्या. दुसऱ्या दिवशी एका परिसंवादात रोहिणी ताईंचे भाषण झाले. त्याचे चित्रीकरण करताना माझ्या लक्षात आले की रोहिणी ताईंच्या गालावर बोलताना सुरेख खळी पडते आहे. दुपारी जेवणाच्या वेळी योगायोगाने मी आणि गिरीजाताई शेजारीच बसलो. तितक्यात तिथे रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी अशी सगळी मंडळी आमच्याच समोर येऊन बसली. मी बोलता बोलता सहजच कॅमेरातून पाहिलेल्या त्या खळीचा उल्लेख गिरिजाताईंकडे केला. जेवणानंतर आम्ही निघालो तेव्हा रस्त्यात रोहिणीताई आणि जयदेव दोघेही भेटले. गिरीजाताईंनी माझी आणि रोहिणीची ओळख करून देत सांगितले, "रोहिणी हा अविनाश पाठक, नागपूरचा टीव्ही कॅमेरामन आहे आणि माझा चांगला मित्र आहे. आत्ताच त्याने मला सांगितले की तू बोलताना तुझ्या डाव्या गालावर खळी छान पडते. त्याला तुझी खळी खूप आवडली आहे." हे ऐकून मी एकदमच  गोरामोरा झालो होतो. तर रोहिणीताईंनाही काय उत्तर द्यावे हे कळले नव्हते. त्या हसतच पुढे निघून गेल्या आणि गिरीजाताई आम्हा दोघांचीही कशी फिरकी घेतली म्हणून मजेत हसत होत्या.
१९८४-८५ च्या दरम्यान मी दूरदर्शन साठी कार्यक्रम निर्मिती करण्याच्या हेतूने एक नवा प्रकल्प उभा करण्याचे ठरवले. त्यावेळी दूरदर्शनवर विविध लेखकांच्या कथावर आधारित मालिका प्रसारित होत होत्या. मी देखील गिरीजाताईंच्या साहित्यावर आधारित काही मालिका तयार करण्याचे ठरवले. त्या विषयावर आमची चर्चा देखील झाली. मात्र तो प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. 
त्या प्रकल्पासाठी कर्ज हवे म्हणून स्टेट बँकेकडे प्रस्ताव प्रलंबित होता. प्रकल्प पूर्णतः नवीन असल्यामुळे तिथे त्या विषयाचे कोणीच कन्सल्टंट नव्हते. मला आठवले, पुरुषोत्तम बावकर नामक एक कन्सल्टंट मुंबईत कार्यरत आहेत. योगायोगाने ते गिरिजाताईंचे शेजारी होते. मग आठवले की एका अंकात गिरीजा ताईंनी त्यांची मुलाखतही प्रकाशित केली होती. त्यामुळे गिरिजाताईंनाच विनंती केली आणि बावकरांशी बोलून त्यांनी माझ्या प्रकल्पाबद्दल बँकेत अहवाल द्यावा यासाठी त्यांना बोलावे असा आग्रह धरला.  गिरिजाताई लगेच माझ्याबरोबर बावकरांकडे आल्या आणि त्यांना सांगितले. बावकर बँकेतही आले होते. मात्र तो प्रकल्प फलद्रूप झाला नाही.
१९८४ मध्ये गिरिजाताईंचा मोठा मुलगा विजय याचा विवाह ठरला. त्याचे त्यांनी मला निमंत्रण पाठवले. मात्र पोस्टाच्या घोळात ते उशिरा पोहोचले. योगायोगाने आठवडाभरानेच मी मुंबईत गेलो होतो. मग त्यांची भेट झाली. लग्नाला न आल्याबद्दल त्या रागावल्या होत्या. त्यानंतर वर्षभरानेच त्यांचा धाकटा मुलगा प्रफुल्ल याचे लग्न ठरले होते. त्याच्या दोनच दिवस आधी मुंबईतील माझे स्नेही मनोहर पिंगळे यांची मुलगी मोना हीचे लग्न होते. त्या लग्नासाठी मी गेलो होतो. मग दोन दिवस थांबून प्रफुलच्या लग्नाचे रिसेप्शन देखील मी अटेंड केले. त्या दिवशी रात्री मी हॉलवर पोहोचलो आणि स्टेजवर हातात बुके घेऊन गेलो. गिरिजाताई पाठमोऱ्या होत्या. मी त्यांना आवाज देत मी आलोय असे सांगितले. माझ्याकडे बघून त्यांना खूपच आनंद झाला. लगेचच त्यांनी मला नवदांपत्यासोबत उभे करून फोटो देखील काढून घेतला.
१९९० मध्ये माझे लग्न ठरले साखरपुडा आटोपून लगेचच मी काही कामाने मुंबईत गेलो होतो. गिरीजाताईंच्या घरी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना फोन केला. लगेच त्या म्हणाल्या," तू घरी कधी येतोस? मला तुझं केळवण करायचं आहे" मात्र माझे त्यावेळी घरी जाणे झाले नाही. पुढल्या खेपेला नक्की येतो असं सांगितले. दरम्यान मी लग्नाची पत्रिका त्यांना पाठवली. मग केळवणाला घरी न आल्याबद्दल रागवणारे आणि लग्नासाठी शुभेच्छा देणारे पत्र आणि सोबत अहेराचा चेक असेही त्यांच्याकडून आले होते. नंतर वर्षभर आम्ही वर्षभराने मी आणि माझी पत्नी असे दोघेही मुंबईत त्यांच्या घरी गेलो. तेव्हा देखील त्यांनी खूप प्रेमाने स्वागत केले होते. 
मधल्या काळात आमच्या भेटीगाठी जरा कमी झाल्या होत्या. २००२ मध्ये मी एक नियतकालिक सुरू केले. त्याचा पहिलाच दिवाळी अंक काढायचा ठरला. त्यावेळी गिरीजा ताईंना तुम्ही कथा पाठवा म्हणून पत्र पाठवले. त्यांचे लगेचच अभिनंदनाचे पत्र आले आणि कथा नक्की पाठवते असे त्यांनी कळवले. त्यांना मानधनाची अपेक्षा विचारली होती. मात्र तुझा पहिलाच प्रयोग आहे तेव्हा जे काही शक्य होईल ते दे असे त्यांनी कळवले आणि मी जो काही चेक पाठवला तो त्यांनी आनंदाने स्वीकारला होता. 
योगायोगाने त्या दिवाळी अंकाला त्यावर्षी एक पुरस्कार देखील मिळाला. ही बातमी मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये वाचताच पहिल्याच बॉलला तू सिक्सर मारलास असे म्हणत त्यांनी अभिनंदनचे पत्र पाठवले. त्यानंतर प्रत्येक दिवाळी अंकासाठी मी त्यांना साहित्य मागत असे. त्यादेखील न चुकता पाठवायच्या. 
शुद्धलेखनाच्या बाबतीत मी काहीसा कच्चाच होतो. अगदी सुरुवातीपासून मी त्यांना जी मराठी पत्र पाठवायचो. त्यात मी भेटलो की त्या शुद्धलेखनाच्या चुका काढून मला सांगायच्या. कधी कधी त्या खूप रागवायच्या सुद्धा. जेव्हा मी दिवाळी अंक काढायचे ठरवले तेव्हा त्यांनी शुद्धलेखन नीट तपासत जा म्हणून दम भरणारे पत्र देखील पाठवले. मात्र मी सुधारलो नाही. दरवेळी त्या मला माझे अंक बघून मला दम द्यायच्या. माझे दुसरे पुस्तक पुर्णांक सुखाचा ही एक लघु कादंबरी होती. त्याला गिरीजा ताईंनी प्रस्तावना द्यावी अशी मी त्यांना विनंती केली, आणि स्क्रिप्ट पाठवले त्यांनी त्यात शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या अक्षरशः ढिगभर चुका काढल्या. पुस्तकाला प्रस्तावना तर त्यांनी पाठवली. मात्र सोबत दम भरणारे पत्र देखील पाठवले होते. "आता तू लेखक म्हणून पुढे येतो आहेस, जुना फोटोग्राफर राहिला नाहीस, आता तुझी जबाबदारी वाढली आहे" असे त्यांनी ठाणकावले होते.
२०१० मध्ये माझ्या मराठी वाङमय व्यवहार चिंतन आणि चिंता या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. योगायोगाने त्याच वर्षी गिरिजाताईंच्या एका पुस्तकाला देखील राज्य शासनाचा पुरस्कार होता. आम्ही सर्वच त्यानिमित्ताने सांगली येथे पुरस्कार वितरण समारंभात एकत्र आलो होतो. पुरस्कार वितरणानंतर आयोजित स्नेहभोजनाचे वेळी मी वेगवेगळ्या साहित्यिकांना भेटत होतो. त्यामुळे आम्हाला जेवायला उशीर होत होता. माझी पत्नी अनुरूपा आणि मुलगी दिव्येशा माझी वाट बघत जेवायच्या थांबल्या होत्या. गिरिजाताई तिथे माझी थट्टा करत त्या दोघींना म्हणाल्या "आता हा चांगलाच गरजलेला आहे. त्याच्या नादी लागू नका. तुम्ही दोघी आपले जेवण आटोपून घ्या. आज पुरस्कारानेच त्याचे पोट भरले आहे" मात्र त्याचवेळी अनेक मान्यवर साहित्यिकांना त्यांनी "हा माझा भाऊ आहे" म्हणून ओळख देखील करून दिली होती.
२०१० मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक गिरीजा ताईंनी लढवली होती. त्यांचा विदर्भातला प्रचार मीच सांभाळला होता. त्या दरम्यान प्रचारासाठी त्या नागपूरला आल्या असताना तीन दिवस माझ्याच कारने त्यांना सोबत घेऊन मी सर्वत्र फिरलो होतो. तो श्रावण महिना होता. त्यावेळी श्रावणातल्या शुक्रवारची सव्वाष्ण म्हणून त्या आमच्या घरी भोजनाला सुद्धा आल्या होत्या. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभूतच व्हावे लागले. नंतरच्या आयुष्यात त्या सक्षम असूनही त्यांना साहित्य संमेलन अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही.
२०१५ च्या दरम्यान एका सकाळी गिरिजा ताईंचा मला फोन आला. त्यांनी आदल्या रात्री माझी दोन पुस्तके वाचून काढली होती. ती दोन्ही पुस्तके वैचारिक लेखनाचीच होती. तू वैचारिक लेखन देखील खरंच चांगले करतोस असे म्हणत त्यांनी माझे कौतुक केले. नंतर एका दिवाळीनंतर अंकात त्यांनी माझ्या दोन पुस्तकांवर एकही लिहिला. नंतर तो लेख त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी समाविष्ट केला होता. त्या पुस्तकाची प्रतही त्यांनी मला पाठवली होती. 
त्याआधी माझी सर्वच पुस्तके नागपुरातील आणि संभाजीनगर मधील प्रकाशकांनी प्रकाशित केलेली होती. तुझी पुस्तके आता मुंबई पुण्यातील प्रकाशाकांकडून प्रकाशित व्हायला हवी. म्हणजे तुला या परिसरात चांगली ओळख मिळेल, असा त्यांनी आग्रह धरता. मग पुढच्या दोन पुस्तकांचे स्क्रिप्ट मी त्यांना पाठवले. त्यांनी भरारी प्रकाशनच्या लता गुठे यांच्याशी बोलणे करून माझे पुस्तक त्यांना प्रकाशित करायला सांगितले. त्यानुसार आठवणीतले नेते हे माझे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले होते. त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करायचे ठरले होते. मात्र फडणविसांची वेळ मिळाली नाही. मग गडबडीत आम्ही तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे हस्ते प्रकाशन करून घेतले. त्यावेळी मी आणि लता कुठे असे दोघेच उपस्थित होतो. गडबडीत गिरीजाताईंना देखील कळवू शकलो नाही. त्याबद्दल त्या मला चांगल्याच रागावल्या होत्या. 
ही घटना डिसेंबर २०१८ मध्ये घडली. त्यानंतर नागपुरात मी परत आलो, आणि माझा स्कूटर अपघात झाला. दोन महिने मी घरातच होतो. हे कळल्यावर गिरीजाताईंचा चौकशी करणारा फोनही आला होता. नंतर लगेचच आधी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुका आल्या. त्या धावपळीतच मी लागलो. परिणामी मुंबईला जाताच आले नाही. मधल्या काळात गिरीजा ताईंची प्रकृती वारंवार बिघडते आहे असे कानावर आले. मी अधून मधून फोन करून प्रफुल्ल आणि त्याची पत्नी शुभदा यांच्याकडून माहिती घेत होतो. मात्र व्यस्ततेमुळे माझे मुंबईला जाणे झाले नाही. 
आणि त्याच दरम्यान ३१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी एका पत्रकार स्नेह्याचा फोन आला त्याने गिरिजा कीर गेल्याची बातमी सांगितली. मी लगेच मुंबईला फोन केला तर दुर्दैवाने बातमी खरी होती. ३१ ऑक्टोबर २०१९ ला ८६ वर्षाचे समृद्ध आयुष्य जगून त्यांनी शांत मनाने इहलोकीची यात्रा संपवली होती. 
आधी सांगितल्यानुसार गिरिजाताईंची माझी ओळख अपघातानेच झाली, आणि त्याचे स्नेहबंधात कधी रूपांतर झाले ते कळलेच नाही. त्यातूनच पुढे आमचे कौटुंबिक स्नेहाचे संबंध निर्माण झाले. वस्तूतः मी त्यांच्या तुलनेत सर्वच अर्थाने लहान माणूस होतो. मात्र त्यांनी अक्षरशः धाकट्या भावावर करावे तसे माझ्यावर प्रेम केले. अनेकदा मोठ्या बहिणीच्या अधिकाराने कान देखील ठरला धरला, आणि तितकीच कौतुकाने पाठ देखील  थोपटली. त्यांनी माझ्याशी हे स्नेहबंध जपावे हे मी पूर्वजांनी जन्मीचे सुकृतच समजतो.

 
 
 
 
 
 
