shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजभवनातील गोरखचिंच


उमेश काशीकर, माजी जन संपर्क अधिकारी, राजभवन यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मलबार हिल येथील राजभवनातील ऐतिहासिक अश्या 'जल विहार' सभागृहाबाहेर एक मोठ्या बुंध्याचा वृक्षराज अनेक वर्षांपासून शांतपणे उभा आहे. 
देशविदेशातील प्रमुखांसाठी याच 'जल विहार' सभागृहात 'शाही भोज' (State Banquet) आयोजित केले जाते, त्यामुळे या सभागृहात समारंभासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हा वृक्षराज एखाद्या तपस्व्यासारखा ध्यानस्थ बसलेला दिसतो. हा वृक्षराज म्हणजे  बाओबाब किंवा गोरखचिंच. 
      बाओबाब मूळचा मादागास्कर - आफ्रिकेचा ! काहींच्या मते तो अरबांनी भारतात आणला तर काहींच्या मते तो सिद्दी लोकांनी आणला. आणखी काहींच्या मते पोर्तुगीझांनी त्याला भारतात आणले. राजभवनात तो केंव्हा आला व त्याला कुणी आणले हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही.आपल्या बुंध्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवत असल्याने कदाचित याला 'जीवन वृक्ष' (Tree of life) देखील म्हणतात. त्यामुळे पाणी कमी असले तरीही हा वृक्ष बराच काळ तग धरून राहतो. त्याचे आयुष्य १००० वर्षे देखील असते. अनेकदा हा वृक्ष निष्पर्ण झालेला पाहिला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी निष्पर्ण असताना काढलेले चित्र दिले आहे. इतक्यात मात्र पाऊस पडल्यामुळे त्याला हिरवीगार पालवी आली आहे.   

गोरखचिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले होते, म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते.  राजभवनातील या वृक्षराजाचे निश्चित वय तज्ज्ञच सांगू शकतील. परंतु सन १९६४ सालच्या एका प्रतिमेत तो बऱ्यापैकी प्रौढ दिसत आहे, त्याअर्थी त्याने सन १९४७ साली राजभवनातील ध्वज स्तंभावरील युनिअन जॅक उतरताना आणि तिरंगा फडकताना पाहिला असण्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. 

दिनांक १ मे १९६० रोजी राजभवनात झालेल्या राज्यनिर्मितीच्या सोहळ्याचा तर  तो नक्कीच साक्षीदार असणार. 'जल विहार' सभागृहाबाहेर सन १९६१ साली राणी एलिझाबेथ यांच्या उपस्थितीत फॅशन परेडचे आयोजन झाले होते. याच सभागृहात राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत व्हॅटिकनचे प्रमुख पॉप पॉल सहावे यांच्या सन्मानार्थ स्वागत समारोह आयोजित करण्यात आला होता. सन १९६९ साली या सभागृहात चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग यांनी सपत्नीक चंद्राच्या आकाराचा केक कापला होता. 

किमान दिडशे वर्षे जुने असलेल्या या सभागृहात देशविदेशातील अनेक राष्ट्रप्रमुखांचे सन्मान झाले असल्याने, सभागृहाबाहेर उभा असलेला हा  बाओबाब उर्फ गोरखचिंच अनेक सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचा मूक साक्षीदार आहे, हे नक्की !
close