भारताचा संघ तीन वनडे व पाच टि२० सामन्यांच्या मालिकेसाठी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या मालिकेची सुरुवात वनडे मालिकेने झाली असून पर्थ येथे नाणेफेकीने सामन्याला सुरुवात झाली. मात्र नाणेफेकीची भारतीय संघावर असलेली नाराजी कायम दिसली.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेऊन सकाळच्या ढगाळ व पावसाळी वातावरणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व त्याच्या वेगवान गोलंदाजांनी तो निर्णय रास्त असल्याचे सिद्धही केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा हा पहिलाच एकदिवसीय सामना आहे. निवडकर्त्यांनी मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त केले असले तरी टिम इंडियाचे नाणेफेक जिंकण्याचे स्वप्न या सामन्यातही पुरे होऊ शकले नाही. नाणेफेक मागील काही दिवसांपासून टिम इंडियाकडे किमान वनडे सामन्यात तरी पाठ फिरवून आहे.
भारतीय संघाची नाणेफेकीत वाईट कामगिरी होत आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नाणेफेक गमावण्याची मालिका मालिका आशिया कपमध्ये खंडित झाली. तथापि, एकदिवसीय क्रिकेटमधील नाणेफेक हसण्याची मालिका सुरूच आहे. सन २०२३ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने शेवटची एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकली होती. तेव्हापासून, संघाने १६ सामने खेळले आहेत आणि एकाही सामन्यात नाणेफेक त्यांच्या बाजूने गेलेली नाही.
क्रिकेटमध्ये नाणेफेकीला अनन्यसाधारण महत्व असते. अनेकदा नाणेफेकच सामन्याची दिशा ठरवते. परंतु मागील अनेक सामन्यात टिम इंडियाने नाणेफेकी गमावूनही प्रतिकूल परिस्थितीत तेही प्रथम व नंतर फलंदाजी किंवा गोलंदाजी करूनही मैदान मारले आहे. एकही नाणेफेक न जिंकता भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. त्याआधी, त्यांनी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केले होते. तथापि, गेल्या वर्षी भारताने श्रीलंकेत खेळलेली एकमेव एकदिवसीय मालिका गमावली.सन २०२३ च्या विश्वचषकानंतर, भारताने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय सामने खेळले. टीम इंडियाने ती मालिका जिंकली. तेथेही नाणेफेक भारतावर रुसली होती. मागील दिवसांपासून एक बाब स्पष्टपणे दिसते की, टिम इंडियाचा खेळ अथवा विजय नाणेफेकीच्या कौलावर अजिबात अवलंबून नाही. संघातील प्रत्येक घटक परिस्थितीनुसार आपली जबाबदारी ओळखून खेळत असल्याने संघाच्या कामगिरावा फारसा प्रभाव पडलाच नाही.
टि२० व कसोटीतून निवृत्त झालेले माजी कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली सध्या खेळत असलेल्या व वनडे प्रारूपात आपल्या बॅटचा जलवा दाखवून समस्त टिकाकार व निवड समितीला खोटं ठरवतील असा सर्वांचाच कयास होता. मात्र या सामन्यात दोघांच्याही बॅटने धावा करण्यास साफ नकार दिल्याने टिम इंडियाला मात्र अडचणीचा सामना करावा लागला. इतकेच नाही तर भविष्याचा वेध घेत रोहितला कर्णधार पदावरून पदच्युत करून मोठ्या कौतुकाने ज्या शुभमन गिलच्या गळ्यात नेतृत्वाची माळ घातली त्या गिलच्या बॅटनेही असहकार पुकारल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता.
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक विरोधात गेली तर तीन रोहीत, विराट, गिलसारखे अव्वल फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने भारतासारखा अव्वल संघ अडचणीत आला असला तरी टिम इंडियाकडे खोलवर फलंदाजी आहे. पाऊस थांबला व खेळ पुढे सुरू झाल्यानंतर टिम इंडिया फलंदाजी व गोलंदाजीत कशी कामगिरी करते यावरच भारताची यशोमालिका अबाधित राहिल का खंडीत होईल हे अवलंबून असेल.
या सामन्यात अंतिम अकरा जणांचे दोन्ही संघ असे आहेत : -
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नाथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.