दिवाळी हा आपल्या सर्वांचा आवडता आणि महत्त्वाचा सण. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिव्यांचा झगमगाट, लखलखते आकाश कंदील, सर्वत्र रोषणाई म्हणजे दिवाळी सण.पणत्या, रांगोळ्या, दारावरील तोरणे, नवीन कपडे, तिखट - गोड फराळ आणि सर्वांचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी.
हिंदू धर्मात या सणाचे खूप मोठे महत्त्व आहे. भगवान श्रीराम जेव्हा रावणाचा पराभव करून अयोध्येला परतले तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन काळापासून साजरा होत असलेला दीपोत्सव आजही सर्वत्र तितक्याच जोमाने साजरा होताना आपण पाहतो.
दसरा साजरा झाला की लगेचच सर्वजण दिवाळीच्या तयारीला लागतात. घर सजवणे, नवीन वस्तू, कपडे खरेदी करणे, एक ना अनेक गोष्टींची लगबग सुरू होते. आता तर या सणाला जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातील आपले भारतीय लोक आपापल्या ठिकाणी दिवाळी साजरी करताना दिसून येत आहेत. अमेरिका, लंडन मलेशिया, म्यानमार, सिंगापूर ऑस्ट्रेलिया, मॉरिशस इत्यादी व अन्य काही देशांमध्ये दिवाळी साजरी होत आहे. दिवाळीच्या सुट्टीत भारतीय संस्कृतीवर आधारित काही कार्यक्रम सादर होतात. काही प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते. आपल्याकडे तर साहित्य क्षेत्रात देखील दिवाळी अंक प्रकाशित करून दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळी साजरी करत असताना प्रत्येक दिवसाचे असे विशेष महत्त्व सांगितले जाते. वसुबारस पासून दिवाळी साजरी करायला सुरुवात होते. या दिवशी गायीची पूजा केली जाते. गाईला गोग्रास दिला जातो. गाईच्या शेणापासून गवळणी घातल्या जातात, गवळणी भोवती रांगोळी काढली जाते, फुलांनी सजवले जाते. पाचव्या दिवशी पाच पांडव तयार केले जातात. बळीराजा पण तयार केला जातो. वेगवेगळ्या आकारात गवळणी तयार केल्या जातात. परंतु; सध्या ही प्रथा लोप होत चाललेली आहे.अगदी क्वचितच खेडोपाड्यात ही प्रथा जोपासताना पहावयास मिळत आहे.
धनत्रयोदशी दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते. हळूहळू थंडी वाढत असते. अशावेळी उटणे दुधात किंवा तेलात मिसळून त्याचा सुगंधी लेप लावून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केले जाते. अभ्यंग स्नान होताच कणकेपासून तयार केलेल्या मुटक्यांनी दृष्ट काढून ओवाळले जाते.
लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा केली जाते. आपल्या घरातील संपत्ती पूजनीय मानली जाते. धनाचा अधिपती कुबेर व देवी लक्ष्मी यांची पूजा म्हणजे घरातील मंगलमय वातावरणाची बरसातच असते.
भगवान विष्णूंची बळीराजाच्या अवतारातील पूजा म्हणजेच बलिप्रतिपदा. याला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो ",असे म्हटले जाते.
भाऊ - बहिण यांचे नाते दृढ करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. " दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ...."असे म्हणत बहीण भावाला ओवाळत असते.
असा हा पाच दिवसांचा दिवाळी सण नवचैतन्य निर्माण करत असतो. सर्व कुटुंबीयांना आनंदाने एकत्रितरित्या एकमेकांच्या नात्यांची जाणीव करून देणारा हा सण. प्रत्येक नात्यातील गोडवा जपणारा हा सण. परंतु हल्लीच्या या ऑनलाइनच्या जमान्यात थोडासा धावताच झाला आहे. हौस - मौज करणे, हुल्लडबाजी करणे, पैशाचा दिखावा करणे, पैशांची उधळपट्टी करणे अशा प्रकारे सण साजरा करणारा एक वर्ग समाजात तयार झालेला पहावयास मिळत आहे.
दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणारी मंडळी आता सुट्टी कमी आहे, यावेळी गावाकडे यायला जमणार नाही असे सांगून बाहेर पर्यटन स्थळी फिरायला जायचे नियोजन करत असते. फिरायला हरकत नाही. वर्षभराच्या कामातून तेवढाच थोडासा विरंगुळा,पण; गावाकडे असणाऱ्या आपल्या आई-वडिलांनाही त्यात सामील करून घेतले तर हा आनंद द्विगुणीतच असणार आहे. नाही सामील करून घेता आले तरी निदान एक दिवस तरी गावाकडे दिवाळीला जाऊ शकतोच ना! पण हल्ली आम्हांला अशा प्रकारची धावपळ नको असते. तसेच मित्र मैत्रिणींना देखील भेटायचे असते. घरातील फराळापेक्षा मिठाईच्या दुकानातील मिठाई एकमेकांना भेट देणे आम्हाला प्रतिष्ठेचे वाटते. गावाकडची मंडळी मात्र लाडू , चिवडा, करंजी एकमेकांना देऊनच गोडवा जपते. आणि त्यांचा हा गोडवाच एकमेकांचा आधार असतो.
जो - तो आपापल्या परिस्थितीप्रमाणे हा सण साजरा करत असतो. परंतु; यंदाचे काय? आपला गरीब मायबाप शेतकरी यंदाच्या पावसाने पुरता बुडाला आहे. पुराचे पाणी शेतात आल्याने सर्व पिके वाहून गेली आहेत. तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला आहे. पिकांबरोबरच काही शेतकऱ्यांची घरे देखील भुई सपाट झाली आहेत. पुढे काय होणार? हीच आशा प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत आहे.पाणी जरी ओसरलं असलं तरी शेतात बघायला पीकच उरलं नाही. घोर निराशा मनामध्ये दाटून आली आहे.सर्व आशेचे बांध फुटले आहेत.नव्याने सर्व संसार उभा करावा लागणार आहे. अशावेळी आपल्या शेतकरी मित्राला,पूरग्रस्तांना खचू न देता त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम आपण केले पाहिजे. आता गरज आहे त्यांना सावरण्याची, मानसिक आधार देण्याची, त्यांचे मनोबल वाढवण्याची. त्यांचे पीक, वाहून गेलेले सामान आपण कोणीच परत करू शकत नाही. पण ; अशावेळी शाब्दिक आधार तरी नक्कीच देऊ शकतो.दिवाळीच्या तोंडावर आज अशी परिस्थिती ओढवली आहे.
मित्रांनो जरा विचार करा. आज अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे.याचे कारण आहे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. याला कारणही तसेच आहे. आपण मनुष्य प्राणी स्वतःच्या स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहोत, शेती तर बुडीतच होत चालली आहे, अनेक ठिकाणी शेतीच्या जागी मोठ-मोठे कारखाने उभे करत आहोत, धुराचे नळकांडे जागोजागी वाढवत आहोत. फटाक्यांची आतषबाजी, त्यांचा तो नकोसा धूर प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत. मग का नाही निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळणार.
" दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी" या ओव्या जर म्हणायच्या असतील तर निसर्गाला साथ द्या. निसर्गाच्या उलटे जाऊ नका. मानवी स्वार्थ साधाल तर निसर्ग संकटातून कोणाची सुटका नाही हे लक्षात ठेवा. सर्वांनाच दिवाळीचा आनंद लुटू द्या.
*शब्दांकन
सौ.मिनल अमोल उनउने - सातारा
*प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111