पुण्यात "वर्ल्ड सामना" दिवाळी अंकाचा
मोठ्या दिमाखात प्रकाशन सोहळा संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
महाराष्ट्राला दिवाळी अंकाची वैभवशाली परंपरा असून त्या परंपरेतील "वर्ल्ड सामना" चा दिवाळी अंक वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन वाङ:मयीन मेजवानी देणारा दर्जेदार अंक आहे. साहित्याच्या सर्वांगाला न्याय देण्यासाठी, वाचकांना दिवाळीचा आनंद आणि दर्जेदार साहित्याचा आस्वाद मिळवून देण्यासाठी कुलथे परिवाराने घेतलेले परिश्रम यामध्ये दिसून येतात. श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागातून एवढा दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित होतो हे खरे वाटत नाही. वर्ल्ड सामनाने महाराष्ट्राची वाड्:मयीन संस्कृती जोपासत २०२५ च्या "वर्ल्ड सामना" दिवाळी अंकाचे प्रकाशन करून माझाही आनंद द्विगुणित केला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
पुणे येथे "वर्ल्ड सामना" या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, उद्योजक प्रसाद सोनार, श्री. वायंदेशकर, पराग सोनार आदि उपस्थित होते.
यावेळी ना.मोहोळ म्हणाले, वर्ल्ड सामना दिवाळी अंकाने गेल्या ३४ वर्षापासून मराठी भाषेला साजेसे काम केले आहे. दिवाळी या सणाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. तितक्याच किंबहुना त्याहून अधिक आतुरतेने वाचक त्यांच्या आवडत्या दिवाळी अंकाची वाट पाहू लागले आहेत. दिवाळी अंक जसे वाचकप्रिय होत होते ते लेखकप्रिय होत होते. कारण अशा लेखकांना आणि विशेष करून ज्या लेखकांना स्वतःची पुस्तके प्रकाशित करणे शक्य नव्हते त्या लेखकांना वाचकांपर्यंत पोहोचवण्याची नामी संधी वर्ल्ड सामना दिवाळी अंकाने प्राप्त करून दिली. अनेक दिग्गज लेखक, कवींचे कथा आणि कविता या दिवाळी अंकांमधूनच साकारले गेले. या दिवाळी अंकांनी अनेक लेखक कवींना ओळख मिळवून दिले आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यात वर्ल्ड सामना दिवाळी अंकाचे मोठे योगदान आहे.
प्रमुख पाहुणे कविटकर म्हणाले, दिवाळीत लावले जाणारे दिवे, पणत्या जसे घर अंगण प्रकाशित करतात तसाच दिवाळीत प्रकाशित होणारा वर्ल्ड सामना दिवाळी अंक वाचकांचे आयुष्य प्रकाशमान करतो, या दिवाळी अंकामध्ये असणारे लेखकांचे लेख, कथा आणि कविता, व्यंगचित्रे, चारोळ्या दिवाळीत खाल्ल्या जाणाऱ्या चविष्ट फराळा सारख्याच आहेत. कारण ते लेख, कथा, कविता हे सर्व प्रकारचे साहित्य, वाचक म्हणून आपली बौद्धिक भूकही भागवत असतात. आपल्या देशात दिवाळीची परंपरा फार जुनी आणि समृद्ध आहे. तशीच आपल्या देशातील दिवाळी अंकांनाही समृद्ध अशी परंपरा आहे मराठी भाषेतील दिवाळी अंक ही त्याच समृद्ध परंपरेचा एक भाग आहे.
कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांनी, मराठी भाषेच्या प्रवासात दिवाळी अंकांची भूमिका खूप मोठी राहिली आहे. वर्ल्ड सामना दिवाळी अंकाने लेखक आणि वाचकांच्या वाटा उजळून टाकल्या आहेत. शंभरहून अधिक वर्ष सुरू असलेल्या मराठी दिवाळी अंकांच्या परंपरेचा गेल्या ३४ वर्षापासून दिवाळी या सणाच्या निमित्ताने दिवाळीतील एका महत्त्वाच्या घटकाचा आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत असे सांगत आभार मानले.
यावेळी सिने अभिनेते रमेश परदेशी, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विनोद सातव आदित्य इंगळे, दिपक टाक, सोहम महाडीक, वेदांत काजरेकर, साहिल सदावर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

